आज देशातील प्रत्येक गल्लीबोळात आणि चौपाटीवर 'शॉर्मा' खवय्यांची पहिली पसंती ठरत आहे. उभ्या सळईवर फिरणाऱ्या मांसाची ही टेस्टी डिश नेमकी आली कुठून आणि तिला हे नाव कसे पडले, हे अनेकांना माहिती नाही. आज आपण जो मसालेदार आणि मेयोनीजने भरलेला शॉर्मा खातो, त्याची मूळ चव आणि नाव याची कहाणी थेट १९ व्या शतकातील तुर्कीपर्यंत जाते. तुर्कीचा पारंपरिक पदार्थ भारतीय खवय्यांच्या जिभेवर कसा रूळला, अगदी शेवटपर्यंत नक्की वाचा!
शॉर्मा नाव कसं पडंल?
१९ व्या शतकात ओटोमन साम्राज्यात म्हणजेच आजचे तुर्की उभ्या सळईवर (vertical rotisserie) मांस फिरवून भाजण्याची पद्धत उदयास आली. तुर्कीमध्ये याला 'डोनर कबाब' (Doner Kebap) म्हणतात आणि 'फिरवणे' याला 'चेविर्मे' म्हणतात. याच शब्दांवरून अरबी भाषेत त्याचे 'शॉर्मा' असे नामकरण झाले.
तुर्कीची मूळ चव:
मूळ तुर्की व अरबी पद्धतीत मटण किंवा लॅम्बच्या पातळ थरांमध्ये चरबी मिसळून मंद आचेवर भाजले जाते. त्यात जिरे, कोथिंबीर, लसूण, दालचिनी, वेलची, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल यांसारखे मसाले असतात. तेथील सुगंधी मसाले या कबाबमध्ये वापरले जातात. सोबत तीळ पेस्ट ज्याला तुर्कीमध्ये ताहिनी असे म्हटले जाते. हम्मस, गार्लिक सॉस आणि लोणच्यातील भाज्या असतात.
भारतात असा झाला चवमध्ये बदल:
भारतात शॉर्मा आल्यानंतर अल्पावधीतच तो लोकप्रिय झाला. अनेक मांसाहारी लोकांनी त्याला प्रसिद्धी दिली. जागोजागी लोखंडी सळीच्या मशीनवर लटकवेलेल चिकन आणि खालून गॅसद्वारे भाजण्यात आलेले मांस हे खवय्यांसाठी नवआकर्षण होतं. आता भारतात त्यात आवडीनुसार बदल झाले. उदाहरणार्थ, मटणाऐवजी चिकन, पनीर किंवा फालाफेल असे पर्याय वापरले जाऊ लागले.
हलक्या सुगंधी मसाल्यांऐवजी लाल तिखट, गरम मसाला, काळी मिरी आणि आले-लसूण वाढल्याने चव अधिक तिखट व मसालेदार झाली.
सॉस व रॅप
तीळ पेस्ट आणि हम्मसऐवजी भारतीय स्ट्रीट फूडमध्ये मेयोनीज, तिखट/शेजवान सॉस, कोबी-कांद्याचे सॅलड आणि पिटा ब्रेडसोबत रुमाली रोटी किंवा सॉफ्ट रॅपचा वापर वाढला.
ज्यामुळे मूळची चव फारशी राहिली नाही. देशात जे स्थानिक मसाले उपलब्ध होऊ लागले व्यावसायिकांनी तेच वापरून शॉर्मामध्ये चव आणली.
चटपटीत चवीमुळे तरुणाईपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा बनलेला 'शॉर्मा' मूळचा भारतीय पदार्थ नाही. आता त्याला 'देशी शॉर्मा'ची ओळख मिळाली आहे.
तुर्कीच्या राजेशाही स्वयंपाकघरातून जन्माला आलेल्या या पदार्थाचा भारतपर्यंतचा प्रवास आणि बदललेली चव अत्यंत रंजक आहे.