Dr. Babasaheb Ambedkar Charitra Sadhane Samiti
नागपूर: राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समिती'चे पुनर्गठन केले असून, यावरून आता वैचारिक आणि साहित्यिक वर्तुळात वादळ निर्माण झाले आहे. या नव्या समितीमध्ये 'समरसतेच्याच कार्यकर्त्यांचा भरणा' असल्याचा आरोप ज्येष्ठ साहित्यिक आणि आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे.
ही समिती त्वरित बरखास्त करून त्याऐवजी आंबेडकरी प्रमाणशास्त्र मानणाऱ्या खऱ्या अभ्यासकांची नवी समिती स्थापन करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. ज्या समितीवर बाबासाहेबांचे चरित्र आणि साधने प्रकाशित करण्याची जबाबदारी आहे, त्या समितीचे सदस्य हे केवळ सरकारी निष्ठा असणारे नव्हे, तर बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणारे असावेत. सध्याच्या समितीच्या रचनेतून शासनाचा विशिष्ट अजेंडा राबविला जात असल्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे. समरसतावाद्यांचा भरणा असलेली समिती रद्द करून नवी समिती स्थापन करावी, हीच माझी स्पष्ट सूचना आहे.
या संदर्भात त्यांनी पर्यायी नावांची यादीही सुचवली आहे. यामध्ये ज. वि. पवार, अर्जुन डांगळे, जयदेव गायकवाड, उमेश बगाडे, उत्तम कांबळे, विजय खरे, प्रल्हाद लुलेकर, केशव वाघमारे, लक्ष्मण माने, अरविंद सुरवाडे, सुधीर गव्हाणे, प्रकाश बनसोड, रमेश जीवने, नागोराव कुंभार, विजय सुरवाडे, सुधाकर गायकवाड, रमेश इंगळे चावरेकर, मनोहर नाईक, अनमोल शेंडे आणि प्रकाश राठोड यांसारख्या चळवळीतील सक्रिय अभ्यासकांचा समावेश असावा, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, सल्लागार म्हणून गोपाळ गुरु, प्रदीप गोखले, सतीश कुलकर्णी आणि सुहास पळशीकर यांसारख्या जागतिक दर्जाच्या प्रज्ञावंतांची नावे त्यांनी सुचवली आहेत. महाराष्ट्र शासन हे संविधाननिष्ठ असून, त्यांनी स्थापन केलेली ही समिती खरोखरच 'आंबेडकर चरित्र आणि साधने' प्रकाशित करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे जाणत्या लोकांना वाटले पाहिजे, अशी माफक अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.