Travel

चला पर्यटनाला : आध्यात्मिक पर्यटनासाठी पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर

दिनेश चोरगे

सोलापूर; संजय पाठक :  हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात मनःशांतीसह पर्यटन असा दुहेरी संगम म्हणजे आध्यात्मिक ठिकाणांचे पर्यटन. यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोटसह जवळच असणार्‍या गाणगापूर येथे भेट देण्याकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे.

तीर्थक्षेत्र पंढरपुरात काय पाहाल…

पंढरीत श्री विठुराय व श्री रुक्मिणी मातेच्या दर्शन घेता येऊ शकते. हे एकमेव असे ठिकाण आहे की याठिकाणी दुरून नव्हे तर थेट देवाच्या पायावर डोके ठेवून दर्शन मिळते. याठिकाणी चंद्रभागा नदीचे दर्शन होते. नदी पात्रातील विविध मंदिरे पाहाता येतात. याठिकाणी नौकानयन करण्याची संधीही उपलब्ध आहे. त्याचबरोबर याठिकाणी संत तनपुरेमहाराज मठ, संत रामदासमहाराज जाधव (कैकाडी महाराज) मठ हे खूप पाहाण्याजोगे मठ होत. प्राचीन भारतीय हिंदू संस्कृतीसह ऋषिमुनींच्या परंपरेची शिल्पे असणारा कैकाडी महाराज मठ पाहात पर्यटकाचे तीनचार तास कसे गेले हे लक्षातही येत नाही. याशिवाय तुळशी वृंदावन हे पंढरीतील खूप प्रेक्षणीय स्थळ आहे.

मुक्काम कुठे कराल…

तीर्थक्षेत्र पंढरपुरात राहण्यासाठी पंढरपूर देवस्थानचे चार भक्त निवास आहेत. तसेच श्री संत गजानन महाराज मठामध्येही मुक्कामासाठी अल्पदरात रूम्स उपलब्ध आहेत. त्याशिवाय स्थानिक नागरिकांच्या घरामध्ये साध्या, एसी रूम्स राहाण्यासाठी उपलब्ध आहेत.

विशेष सुविधा…

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वेबसाईटवरून श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन ऑनलाईन पद्धतीने बुक करता येते. त्यानंतर आपल्या रजिस्ट्रर्ड मोबाईल नंबरवर दर्शन कोणत्यादिवशी, किती वाजता आहे याचा संदेश येतो. त्यामुळे मंदिरात न जाता, वेळ वाचवत दर्शनाचा लाभ घेता येऊ शकतो.

खरेदी काय कराल…

फिक्के पेढे, मसाला ओली अगरबत्ती, अतिशय शुद्ध हळदीचे कुंकू, हळद, सुगंधी बुक्का, सुवासिक अष्टगंध, गोपीचंदन, गळ्यात घालण्याची तुळशीची माळ, देवादिकांचे फोटो, मूर्ती, टाळ-मृदंग, भागवत पताका, घोंगडी, सोवळे, उपरणे, पंचा आदी अस्सल वस्तू माफक दरात खरेदी करता येतात.

तीर्थक्षेत्र अक्कलकोट

स्वामीनगरी अक्कलकोटमध्ये वटवृक्ष श्री स्वामीसमर्थ मंदिरात स्वामींचे दर्शन घेऊन मठ पाहू शकता. हल्ली या मठाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याशिवाय श्री स्वामी समर्थांचा समाधी मठ, श्री स्वामी समर्थ सर्वात प्रथम ज्या मंदिरात आले ते श्री खंडोबा मंदिर, अग्निहोत्र नगरी शिवपुरी, भोसले संस्थानचे शस्त्रागार, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची शिवसृष्टी आदी ठिकाणे याठिकाणी पाहाता येतात.

मुक्काम कुठे कराल…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे भक्तनिवास आहे, त्याशिवाय श्री वटवृक्ष देवस्थान ट्रस्टचे मैंदर्गी रोडवर भक्तनिवास आहे. अक्कलकोटपासून जवळच शिवपुरी याठिकाणीही मुक्कामाची सोय आहे.

श्री क्षेत्र गाणगापूर

सोलापूर-गुलबर्गा मार्गावर भीमा-अमरजा या दोन नद्यांच्या संगमातिरी श्री क्षेत्र गाणगापूर येथे श्री दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नृसिंहसरस्वती महाराजांची सुमारे 23 वर्षे वास्तव्य केले. याठिकाणी श्री दत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकांचे मंदिर आहे. या क्षेत्राच्या ठिकाणी नद्यांचा संगम, निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी महात्म्य, संगमेश्वर मंदिर आदींचे दर्शन घेता येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT