Travel

चला पर्यटनाला : कुटुंबासाठी पुरेपूर… पर्यटनासाठी कोल्हापूर

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  तीनतीन दिवस फुल्ल एन्जॉय करता येईल, असे सर्वच बाबींनी पुरेपूर, कोल्हापूर हे पर्यटनाचे राज्यातील परफेक्ट डेस्टिनेशन आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक, दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री जोतिबा यामुळे धार्मिक पर्यटन करत दोन-तीन दिवस सहजपणे कोल्हापूर आणि परिसरात घालवता येतील, इतकी ठिकाणे आहेत.

अंबाबाईचे प्राचीन मंदिर म्हणजे वास्तुकलेचा अद्भूत नमुना. अंबाबाईचे दर्शन, मंदिर परिसराची पाहणी करत भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरातही दर्शन घेता येते. याच परिसरात ऐतिहासिक महत्त्व असलेला, 1857 च्या उठाव आणि स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असलेला आणि युगपुरुष छत्रपती शिवराय आणि लोकराजा राजर्षी शाहूंच्या आठवणी जागविणारा जुना राजवाडा प्रेक्षणीय आहे.
जुना राजवाड्यासह कोल्हापुरातील नवीन राजवाडा आणि त्यातील वस्तुसंग्रहालय ऐतिहासिक कोल्हापूरची साक्ष देतात. या संग्रहालयासह टाऊन हॉल येथील शासकीय वस्तुसंग्रहालय हडप्पा, मोहेंजोदडोसारखीच काहींसे जमिनीखाली गाडलेल्या कोल्हापूरच्या संस्कृतीचे दर्शन घडवते. या वस्तुसंग्रहालयात उत्खनानात सापडलेल्या अनेक गोष्टी आहेत. यामध्ये सर्वाधिक आकर्षक आहे ते म्हणजे उत्खननात सापडलेला ग्रीक समुद्रदेवतेचा पुतळा. या वस्तुसंग्रहालयासह चंद्रकांत मांडरे कलादालनही पर्यटकांना पाहता येते.

                                                     पन्हाळा गड 

राजर्षी शाहूंचे जन्मस्थळ, शाहू समाधी स्थळ, पंचगंगा घाट ही स्थळेही पर्यटकांना साद घालत असतात. राजर्षी शाहू जन्मस्थळीही आकर्षक वस्तुसंग्रहालय तयार होत आहे. राजर्षी शाहूंचे जीवनातील अनेक प्रसंग चित्र-शिल्प रूपाने या ठिकाणी पाहता येतात.
रंकाळा तलाव हे पर्यटनांचे प्रमुख आकर्षण आहे. सायंकाळी रंकाळा चौपाटीवर फेरफटका आणि तलावात नौकानयनाचा वेगळाच आनंद आहे. यामुळे कोल्हापूरकरांसह पर्यटकांनी रंकाळा तलाव सदैव गजबजलेलाच असतो. कोल्हापुरात देवदर्शन करत, पर्यटन करतच झणझणीत कोल्हापुरी मिसळ, मांसाहारी जेवणात तांबडा-पांढरा रस्सा, सायंकाळी भेळ अशा वेगळ्या चवीच्या आणि कोल्हापूरची खासियत असलेल्या खाद्यसंस्कृतीचाही आनंद पर्यटकांना घेता येतो. कोल्हापूरपासून सुमारे 20 कि.मी.अंतरावर असलेले समृद्ध ग्राम जीवनाचे दर्शन घडवणारे, आयुर्वेद, सेंद्रिय शेती, गो पालनाचे महत्त्व सांगणारे कणेरीमठ हे देखील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणीही पर्यटकांना संपूर्ण दिवसभर घालवता येतो. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि आजही त्यांच्या पराक्रमांची साक्ष देत दिमाखात उभ्या असलेल्या वास्तूनी नटलेला पन्हाळा किल्ला, त्याच्या शेजारीच असणारा पावनगड पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच आहे. छतासह पूर्णपणे शाबूत असलेल्या ऐतिहासिक इमारती इतक्या मोठ्या प्रमाणात असणार्‍या किल्ल्यांपैकी पन्हाळा आहे. पन्हाळा दर्शन आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जोतिबा मंदिरात दर्शन एका दिवसात होऊ शकते.

कोल्हापूरला कसे याल

रस्ते मार्गे : पुणे-बंगळूर महामार्गावरील आणि कोकण, कर्नाटकच्या सीमेवरील प्रमुख शहर यामुळे राज्यभरातून राज्य परिवहनच्या बस, खासगी प्रवासी बस, खासगी वाहनांद्वारे येता येते. मुंबईपासून 450 कि.मी., पुण्यापासून 250 कि.मी., सोलापूरपासून 250 कि.मी. अंतर आहे.

रेल्वे मार्गे : मध्य रेल्वेवरील प्रमुख स्थानक. दिल्ली, अहमदाबाद, धनबाद, तिरूपती, नागपूर, गोंदिया, कलबुर्गी यासह पुणे, मुंबईवरून कोल्हापूरसाठी थेट रेल्वेगाड्या आहेत.

हवाई मार्गे :  कोल्हापूर हवाईमार्गेही जोडलेले आहे. मुंबई, हैदराबाद, बंगळूर, तिरूपती आणि अहमदाबाद या मार्गावर थेट विमानसेवा. देशातील कोणत्याही भागातून कनेक्टिंग फ्लाईट्सद्वारे कोल्हापुरात येणे शक्य आहे.

SCROLL FOR NEXT