टेक न्यूज: यूट्यूबने आपल्या दशकभर जुन्या 'ट्रेंडिंग' पेजला (Trending Page) गुडबाय करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक यूट्यूब क्रिएटर्ससमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. कारण ट्रेंडिंग (Trending) टॅबद्वारेच अनेकांना लोकप्रिय कंटेंटचे ट्रेण्ड्स कळत असत आणि त्यावर आधारित व्हिडीओ तयार करून ते सहज व्हायरल होण्याची शक्यता वाढत असे.
'Trending Page' हे यूट्यूबवर 2015 मध्ये सुरू झाले होते. त्याद्वारे व्हायरल व्हिडीओ, म्युझिक रिलीज, ब्रेकिंग न्यूज आणि लोकप्रिय ट्रेंड्स युजर्संना एका क्लिकवर उपलब्ध होत होते. मात्र आता ही सुविधा हळूहळू बंद केली जाणार आहे.
YouTube ने नुकताच 15 जुलै 2025 पासून नवीन मोनेटायजेशन पॉलिसी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार केवळ ओरिजिनल व नावीन्यपूर्ण कंटेंट असलेल्या क्रिएटर्सनाच कमाईची संधी मिळेल. या धोरणानंतर आता ट्रेंडिंग टॅबही बंद होत असल्याने अनेक क्रिएटर्ससाठी कंटेंट तयार करणे आणि कमाई करणे अधिक अवघड होणार आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, यापुढे ट्रेंडिंग टॅबऐवजी ‘Category Specific Charts’ दाखवले जातील. यात साप्ताहिक टॉप म्युझिक व्हिडीओज, पॉडकास्ट शोज, ट्रेंडिंग मूव्ही ट्रेलर्स अशा श्रेणींतील कंटेंट असतील. तसेच युजर्सना वैयक्तिक आवडीनुसार सुचवलेले व्हिडीओही दिसत राहतील.
YouTubeने स्पष्ट केलं आहे की, क्रिएटर्सना त्यांच्या ऑडियन्समध्ये काय लोकप्रिय आहे, हे समजून घेण्यासाठी विशिष्ट टूल्स यापुढेही दिले जातील. यूट्यूबचा हा निर्णय एकीकडे लोकप्रिय ट्रेंडिंग कंटेंटसाठीची पारंपरिक पद्धत बंद करतो आहे, तर दुसरीकडे नव्या श्रेणींमधून अधिक टार्गेटेड व रिच कंटेंट दाखवण्याच्या दिशेने पाऊल टाकतो आहे. मात्र, याचा मोठा परिणाम क्रिएटर्सच्या स्ट्रॅटेजीवर नक्कीच होणार आहे.