नवी दिल्ली: YouTube आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने व्हिडिओची गुणवत्ता आपोआप सुधारणार आहे. कंपनी लवकरच 'सुपर रेजोल्यूशन' नावाचं एक नवीन फीचर आणत आहे. ज्यामुळे कमी क्वालिटीचे (SD) व्हिडिओ देखील HD किंवा 4K गुणवत्तेत (Up-scale) बदलले जातील. हे फीचर सुरुवातीला पुढील काही आठवड्यांत मोबाइल युजर्संसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
जर कोणताही व्हिडिओ 1080p पेक्षा कमी रिझोल्यूशनमध्ये अपलोड झाला असेल, तर YouTube चा AI मॉडेल त्याला ओळखेल. हा AI मॉडेल व्हिडिओची गुणवत्ता वाढवून त्याला अधिक स्वच्छ (साफ) आणि शार्प बनवेल. सुरुवातीला SD व्हिडिओ HD मध्ये बदलण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, नंतर 4K पर्यंत अपग्रेड करण्याची योजना आहे. विशेष म्हणजे, युजर्स 'सुपर रेजोल्यूशन' वापरून सुधारलेला व्हिडिओ पाहू शकतील किंवा मूळ (Original) क्वालिटी निवडू शकतील. ज्या कंटेंट क्रिएटर्सना त्यांचे व्हिडिओ मूळ गुणवत्तेतच ठेवायचे आहेत, त्यांना हे फीचर 'बंद' (Off) करण्याचा पर्याय मिळेल. हे फीचर लाखो जुन्या व्हिडिओ कंटेंटला 'नवीन जीवन' देईल, ज्यामुळे युजर्संना यूट्यूबवर उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव मिळेल.
AI फीचरसोबतच YouTube ने शॉर्ट व्हिडिओ क्रिएटर्ससाठी एक मोठी घोषणा केली आहे. YouTube ने Adobe सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे आता शॉर्ट्स व्हिडिओ प्रीमियर प्रो आणि Adobe च्या इतर टूल्समध्ये अधिक सहजपणे एडिट करता येतील. iOS वापरकर्ते थेट 'प्रीमियर प्रो' ॲपच्या मदतीने शॉर्ट्स एडिट करू शकतील. यामुळे शूटिंगपासून ते एडिटिंगपर्यंतची प्रक्रिया क्रिएटर्ससाठी खूप सोपी होणार आहे.
YouTube चा हा नवा प्रयोग केवळ व्हिडिओ क्वालिटी सुधारणार नाही, तर जुन्या कंटेंटला पुन्हा पाहण्यायोग्य बनवेल. तसेच, Adobe सोबतची भागीदारी शॉर्ट्स क्रिएटर्सना अधिक चांगली साधने पुरवून TikTok आणि Reels सारख्या प्रतिस्पर्धकांशी स्पर्धा करण्यासाठी YouTube ला अधिक मजबूत करेल.