ओपनएआय (OpenAI) कंपनीने भारतात स्वतःचे डेटा सेंटर (Data Center) उभारण्याची योजना आखली आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात डेटाचा वापर खूप वाढला आहे, पण अनेकांना डेटा सेंटर म्हणजे काय, हे माहिती नसते. चला तर जाणून घेऊया त्याविषयी...
सोप्या भाषेत सांगायचं तर, डेटा सेंटर म्हणजे इंटरनेटच्या जगातील एक मोठी 'लायब्ररी'. इथे इंटरनेटवरील सर्व प्रकारचा डेटा, जसे की वेबसाइट्स (Websites) , ॲप्लिकेशन्स (applications), फोटो (Photo), व्हिडिओ (videos) आणि ईमेल (emails), मोठ्या सर्व्हरमध्ये सुरक्षित ठेवला जातो.
आपण जेव्हा मोबाईलवर यूट्यूबवर व्हिडिओ पाहतो, गुगलवर काहीतरी सर्च करतो, किंवा नेटफ्लिक्सवर सिनेमा पाहतो, तेव्हा ही सर्व माहिती डेटा सेंटरमधील सर्व्हरमधूनच आपल्यापर्यंत पोहोचते. समजा, तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असाल, तर तुम्ही पाहिलेल्या वस्तूंची माहिती डेटा सेंटरमध्येच साठवलेली असते. या केंद्रांतील सर्व्हर २४ तास कार्यरत असतात, जेणेकरून तुम्ही दिवसा किंवा रात्री कधीही काहीही शोधल्यास तुम्हाला त्वरित माहिती मिळेल. आपल्या फोनमधील डेटा गूगल ड्राइव्ह (Google Drive) किंवा गूगल फोटोजमध्ये (Google Photos) सेव्ह होतो, पण प्रत्यक्षात तो डेटा याच डेटा सेंटरमध्ये सुरक्षित असतो.
डेटा (Data) सेंटर्स चालवण्यासाठी प्रचंड प्रमाणात विजेची आवश्यकता असते. यामुळे, आता ग्रीन डेटा सेंटर्स (Green Data Centers) तयार करण्यावर भर दिला जात आहे, जे सौर किंवा पवन ऊर्जेवर चालतील. डेटा सेंटर्समधील सर्व्हरला थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. एका संशोधनानुसार, १ मेगावॉट क्षमतेचे छोटे डेटा सेंटर दरवर्षी जवळपास २.६ कोटी लिटर पाणी वापरते. ओपनएआय (OpenAI) भारतात जे डेटा सेंटर उभारणार आहे, त्याची क्षमता १ गिगावॅटपर्यंत असू शकते. त्यामुळे, भविष्यात पाण्याचा वापर मोठा मुद्दा ठरू शकतो.
ओपनएआयचा हा निर्णय भारतासाठी तंत्रज्ञानामध्ये एक मोठी संधी आहे. यामुळे डेटा साठवणुकीची स्थानिक क्षमता वाढेल आणि इंटरनेट सेवा अधिक वेगवान व सुरक्षित होतील. मात्र, यासोबतच पाणी आणि ऊर्जेचा वापर नियंत्रित ठेवणे हे एक मोठे आव्हान असणार आहे.