नवी दिल्ली : ज्या नोकरीसाठी लाखो भारतीय तरुण दिवस-रात्र मेहनत करतात, ती सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी आता एका आर्टिफिशियल इंटेलिजन्सला (AI) मिळाली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सने (Goldman Sachs) 'डेविन' (Devin) नावाच्या AI सॉफ्टवेअर इंजिनिअरला कामावर घेतले असून, या निर्णयामुळे जगभरातील, विशेषतः भारतीय आयटी क्षेत्रातील नोकरीच्या बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे.
हा AI इंजिनिअर ना कधी थकणार, ना सुट्टी घेणार आणि ना कधी पगारवाढीची मागणी करणार. तो २४ तास अविरतपणे काम करू शकतो. या एका निर्णयाने भविष्यातील इंजिनिअरींगच्या नोकरी स्वरूपावर आणि विशेषतः एंट्री-लेव्हल इंजिनिअर्सच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
'डेविन' हे एक अत्याधुनिक AI सॉफ्टवेअर आहे, जे एका मानवी सॉफ्टवेअर इंजिनिअरप्रमाणेच कोडिंग, टेस्टिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची कामे करू शकते. लंडनच्या एका स्टार्टअप कंपनीने हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. गोल्डमन सॅक्ससारख्या मोठ्या वित्तीय संस्थेने या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे, हे सूचित करते की आता तंत्रज्ञान कंपन्या आणि बँकांमध्ये कामाची पद्धत वेगाने बदलत आहे.
गोल्डमन सॅक्सचे मुख्य माहिती अधिकारी (CIO) मार्को अर्जेंटी यांनी सांगितले की, "डेविन आमच्यासाठी एका नवीन कर्मचाऱ्याप्रमाणेच काम करेल." बँकेत सध्या १२ हजार मानवी डेव्हलपर्स कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीसाठी सुरुवातीला काही 'ऑटोमॅटिक कोडर्स' वापरले जातील आणि नंतर त्यांची संख्या वाढवली जाईल, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.
मार्को अर्जेंटी यांच्या मते, जुन्या AI टूल्सच्या तुलनेत 'डेविन' कामाची उत्पादकता तीन ते चार पटींनी वाढवू शकतो. जुना कोड अपडेट करणे किंवा सॉफ्टवेअरमधील लहान-सहान चुका शोधून दुरुस्त करणे यांसारखी किचकट आणि वेळखाऊ कामे आता 'डेविन'कडे सोपवली जातील. अनेकदा मानवी इंजिनिअर्सना ही कामे कंटाळवाणी वाटतात. अर्जेंटी यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, "हे AI मॉडेल कोणत्याही सामान्य डेव्हलपरइतकेच चांगले काम करू शकते."
अमेरिकेतील वित्तीय बँक गोल्डमन सॅक्सचा हा निर्णय भारतीय आयटी क्षेत्रासाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा आयटी सेवा पुरवठादार देश आहे आणि दरवर्षी लाखो तरुण इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असतात. अशा परिस्थितीत, जर कंपन्यांनी नियमित कोडिंग आणि रिसर्चसारख्या कामांसाठी AI चा वापर सुरू केला, तर एंट्री-लेव्हल (फ्रेशर्स) इंजिनिअर्सच्या नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात.
ब्लूमबर्ग इंटेलिजन्सने जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, AI तंत्रज्ञानामुळे बँकिंग क्षेत्रात पुढील तीन ते पाच वर्षांत जागतिक स्तरावर तब्बल २ लाख नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे.
गोल्डमन सॅक्सचे हे पाऊल म्हणजे केवळ एक नोकरी कमी होण्याचा विषय नाही, तर तंत्रज्ञानामुळे कामाचे स्वरूप कसे बदलत आहे, याचे हे एक मोठे उदाहरण आहे. भविष्यात नियमित आणि पुनरावृत्तीची कामे AI कडे सोपवली जातील, तर मानवी कौशल्याची गरज अधिक गुंतागुंतीच्या आणि सर्जनशील कामांसाठी लागेल. त्यामुळे, भारतीय तरुणांना आणि आयटी व्यावसायिकांना आता केवळ कोडिंगच नव्हे, तर नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःला अधिक कुशल बनवण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.