Year Ender 2025: वर्ष २०२५ हे तंत्रज्ञानाच्या जगासाठी क्रांतीकारी ठरले आहे. या वर्षात केवळ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) प्रगत झाले नाही, तर अशा काही उपकरणांची निर्मिती झाली ज्यांनी कल्पनाशक्तीच्या सर्व सीमा ओलांडल्या. मानवी भावनेला साद घालणारी 'रोबोट गर्लफ्रेंड' असो किंवा उन्हात गेल्यावर रंग बदलणारे 'फोन कव्हर', या उपकरणांनी सर्वांनाच चकित केले आहे. चला पाहूया, २०२५ मधील ७ भन्नाट गॅजेट्स....
१. निओ (NEO): घराचा नवा 'सुपर' मदतनीस
१X कंपनीने बनवलेला 'निओ' हा ह्युमनॉइड रोबोट या वर्षातील सर्वात चर्चेचा विषय ठरला. हा केवळ यंत्र नसून घराची कामे करणारा एक हुशार सहकारी आहे. निओ कपड्यांच्या घड्या घालणे, कपाटे साफ करणे आणि घर व्यवस्थित ठेवण्यात माहिर आहे. तुम्ही व्हॉईस कमांड किंवा ॲपद्वारे याला सूचना देऊ शकता.
२. वूफवूफ लक्स: कुत्र्यांसाठी 'वॉशिंग मशीन'
प्राणीप्रेमींसाठी हे एक मोठे सरप्राईज ठरले आहे. 'वूफवूफ लक्स' हे कुत्र्यांसाठी बनवलेले खास वॉशिंग मशीन आहे. हे मशीन कुत्र्याची जात आणि त्यांच्या अंगावरील लव (Fur) ओळखून पाणी आणि शॅम्पूचा वापर करते. सध्या हे अमेरिकेतील काही डॉग जिम्समध्ये वापरले जात आहे.
३. मिरुमी: बॅगेवरचा लाजाळू सोबती
जपानच्या युकाई इंजिनीअरिंगने 'मिरुमी' नावाचा एक छोटा आणि गोंडस रोबोट तयार केला आहे. हा रोबोट तुमच्या बॅगेवर किंवा पट्ट्यावर बसू शकतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे, जेव्हा तुम्ही याला स्पर्श करता, तेव्हा हा रोबोट लाजून आपले तोंड लपवतो.
४. रोपेट (Ropet): खिशातला डिजिटल पाळीव प्राणी
जर तुम्हाला पाळीव प्राणी आवडत असतील पण त्यांची काळजी घेणे कठीण वाटत असेल, तर 'रोपेट' तुमच्यासाठी आहे. हा छोटा रोबोट चेहरे ओळखतो आणि हाताच्या इशाऱ्यांवर काम करतो. हा कधीही जेवण मागत नाही, पण त्याला तुमची सोबत हवी असते.
५. स्किनकेस: सनबर्नची आठवण देणारे फोन कव्हर
O2 कंपनीने बनवलेले 'स्किनकेस' हे सिलिकॉन फोन कव्हर मानवी त्वचेसारखे वाटते. जेव्हा तुम्ही कडक उन्हात जाता, तेव्हा हे कव्हर लाल पडते (जसे की सनबर्न झाले आहे). याद्वारे युजर्सला आठवण करून दिली जाते की, आता सनस्क्रीन लावण्याची वेळ आली आहे.
६. स्मार्ट लिपस्टिक: ब्युटी आणि एआयचा संगम
ग्रुपो बोटिकारियोने जगातील पहिली 'स्मार्ट लिपस्टिक' मशीन बनवली आहे. ज्यांना शारीरिक व्याधींमुळे स्वतःहून लिपस्टिक लावणे कठीण जाते, त्यांच्यासाठी हे वरदान आहे. ही मशीन केवळ दोन मिनिटांत अचूकपणे लिपस्टिक लावून देते.
७. आरिया (Aria): एआय गर्लफ्रेंड
Realbotix कंपनीने 'आरिया' नावाची इमोशनल रोबोट लाँच केली आहे. ही रोबोट केवळ बोलत नाही, तर समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करते. एकटेपणा दूर करण्यासाठी बनवलेल्या या 'एआय गर्लफ्रेंड'ची किंमत सुमारे १० हजार डॉलर्सपासून सुरू होते.