TikTok news Pudhari Photo
तंत्रज्ञान

TikTok news: TikTokचे भारतात पुन्हा कमबॅक? इंटरनेटवर गोंधळ, जाणून घ्या काय आहे संपूर्ण सत्य

TikTok India return latest news: TikTok पुन्हा भारतात सुरू होणार याबाबत कंपनी, चीन किंवा भारत सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारे अधिकृत दुजोरा मिळालेला नसल्याचेही समजते

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली: एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या (TikTok) भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. काही युझर्सना अचानक टिकटॉकची वेबसाईट ॲक्सेस करता येऊ लागल्याने सोशल मीडियावर उत्साहाचे वातावरण आणि प्रश्नांचे मोहोळ उठले आहे.

२०२० मध्ये बंदी घातल्या गेलेल्या या शॉर्ट-व्हिडिओ ॲपचे चाहते पुन्हा एकदा आपल्या आवडत्या प्लॅटफॉर्मवर परतण्यासाठी उत्सुक आहेत, पण या चर्चांमध्ये तथ्य किती आणि अफवा किती, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

चर्चेला का फुटले धुमारे?

गेल्या काही दिवसांपासून अनेक भारतीय युझर्सनी दावा केला आहे की, ते आपल्या मोबाईल आणि लॅपटॉप ब्राउझरवरून टिकटॉकची अधिकृत वेबसाईट (TikTok.com) उघडू शकत आहेत. यानंतर, 'X' (पूर्वीचे ट्विटर) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्क्रीनशॉट शेअर करत टिकटॉक परत आल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, या दाव्यांमध्ये पूर्ण सत्यता नाही. अनेक युझर्सनी वेबसाईट ॲक्सेस होत नसल्याचेही म्हटले आहे. यावरून काही प्रमुख गोष्ट समोर येते ती म्हणदजे, शक्य आहे की ही वेबसाईट काही ठराविक इंटरनेट नेटवर्कवर किंवा मर्यादित स्वरूपात चाचणीसाठी सुरू केली गेली असावी. याला 'सॉफ्ट लाँच' किंवा 'टेस्टिंग फेज' म्हटले जाऊ शकते.

ॲप अजूनही गायब

वेबसाईट काही जणांसाठी सुरु झाली असली तरी, टिकटॉक ॲप अद्यापही गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) किंवा ॲपल ॲप स्टोअरवर (Apple App Store) उपलब्ध नाही. ॲपशिवाय केवळ वेबसाईटचा वापर मर्यादित स्वरूपाचाच असेल.

तांत्रिक अडचण?

काहीवेळा तांत्रिक बदलांमुळे किंवा सर्व्हरमधील त्रुटींमुळेही अशा घटना घडू शकतात. त्यामुळे केवळ वेबसाईट दिसू लागल्याने ॲप परत येणार, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल.

सरकारी भूमिका आणि नियम काय सांगतात?

भारत सरकारने २०२० मध्ये टिकटॉकसह ५९ चिनी ॲप्सवर बंदी घालताना डेटा प्रायव्हसी (Data Privacy) आणि राष्ट्रीय सुरक्षेचा (National Security) मुद्दा उपस्थित केला होता. सरकारने घातलेली ही बंदी अजूनही कायम आहे. टिकटॉकला भारतात परतण्यासाठी केवळ तांत्रिकदृष्ट्या सज्ज होणे पुरेसे नाही, तर त्यांना भारत सरकारच्या कठोर नियमांची पूर्तता करावी लागेल. यामध्ये भारतीय युझर्सचा डेटा भारतातच संग्रहित करणे आणि सुरक्षेच्या सर्व मानदंडांचे पालन करणे यांसारख्या अटींचा समावेश असेल. जोपर्यंत सरकारकडून हिरवा कंदील मिळत नाही, तोपर्यंत टिकटॉकचे पुनरागमन अशक्य आहे

अद्याप चीन किंवा भारताकडून अधिकृत दुजोरा नाही

सध्या तरी टिकटॉकच्या पुनरागमनाची बातमी केवळ एक चर्चा आहे, ज्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कंपनीकडून किंवा भारत सरकारकडून यावर कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. वेबसाईटचा मर्यादित ॲक्सेस हा आशेचा किरण असला तरी, तो पुनरागमनाची हमी देत नाही. त्यामुळे, जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत या केवळ चर्चाच राहतील. टिकटॉकच्या चाहत्यांना आणि कंटेंट क्रिएटर्सना यासाठी अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT