तंत्रज्ञान

Technology In Literature: साहित्यातील तंत्रज्ञान क्रांती

मोनिका क्षीरसागर

आधुनिक माहिती तंत्रज्ञानाने साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. संगणक, इंटरनेट आणि इतर तंत्रज्ञानाने लेखकांना नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या तंत्राला शत्रू न मानता मित्र माना. अनेकविध पर्याय उपलब्ध होतील. पूर्वी लेखक हस्तलिखित वापरत होते. त्यात काही चुका आढळल्या तर सर्व मजकूर पुन्हा लिहावा लागत असे. 2000 नंतर डेस्क टॉप पब्लिशिंग (संगणकीय डेटा एंट्री) मुळे या प्रक्रियेत क्रांती झाली आणि सर्व घटकांना फायदा झाला (लेखक, प्रकाशक, टंकलेखक).

आता यापुढील पायरी 2025 नंतर येईल. चॅट बॉट्सशी संवाद साधून आपण मजकूर त्वरित संगणकीय फॉरमॅटमध्ये आपोआप तयार करू शकाल. ना हाताने लिहिणे, ना संगणकावर टाईप करणे. इंटरनेटमुळे (विशेषतः सोशल मीडिया) लेखकांना त्यांच्या साहित्य निर्मितीचा प्रचार आणि प्रसार करणे सोपे झाले आहे.

लेखक आता त्यांच्या साहित्य निर्मितीला जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचवू शकतात. इतर तंत्रज्ञानांनीही साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात मोठा बदल घडवून आणला आहे. उदाहरणार्थ, 3-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून लेखक आता त्यांच्या साहित्य निर्मितीची भौतिक प्रतिकृती तयार करू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग ही अलीकडच्या वर्षांत साहित्य निर्मितीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम करणारी दोन महत्त्वाची तंत्रज्ञाने आहेत. तंत्रज्ञानाचा वापर साहित्य निर्मितीच्या विविध पैलूंमध्ये केला जात आहे, जसे की लेखन, भाषांतर, संपादन आणि प्रकाशन.

तंत्रज्ञान साहित्य निर्मितीच्या पारंपरिक पद्धतींना आव्हान देत आहे आणि साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून लेखन प्रक्रिया स्वयंचलित केली जाऊ शकते. तंत्रज्ञानाचा वापर करून लेखकांना साहित्य निर्मितीसाठी आवश्यक असलेली माहिती आणि संसाधने उपलब्ध करून दिली जाऊ शकतात. तंत्रज्ञानाचा वापर करून लेखकांना त्यांच्या साहित्य निर्मितीमध्ये सर्जनशील होण्यास मदत केली जाऊ शकते.

काही लोकांचा असा विश्वास आहे की, तंत्रज्ञान साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणार आहे आणि साहित्य निर्मितीच्या पारंपरिक पद्धतींना आव्हान देणार आहे. तर काही लोकांचा असा विश्वास आहे की, तंत्रज्ञान साहित्य निर्मितीच्या क्षेत्रावर नकारात्मक परिणाम करेल आणि साहित्य निर्मितीच्या गुणवत्तेवर परिणाम करेल. तंत्रज्ञानाचा साहित्य निर्मितीच्या क्षेत्रावर होणारा परिणाम हा एक चर्चेचा विषय आहे; परंतु हे निश्चित आहे की, तंत्रज्ञान साहित्य निर्मितीच्या क्षेत्रावर मोठा प्रभाव पाडणार आहे. कुठलेही तंत्रज्ञान आपण थांबवू शकणार नाही. यामध्ये कटपेस्ट पेरणारे भोंदू नक्कीच बळी पडतील. चॅट जीपीटी विषय आणि साहित्यप्रकार व शैली सांगितली की, आपोआप कविता करतो. याचा दर्जा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

उदाहरणादाखल पावसावर कविता एआयद्वारे अशी सादर झाली.
पाऊस पडतो, पाणी वाहते,
जमीन ओली होते, झाडे हिरवी होतात.
पक्षी गातात, फुले उगवतात,
वातावरण ताजेतवाने होते.
पाऊस पडतो, हवा शुद्ध होते,
तापमान कमी होते,
मानवांसाठी आरोग्यदायी बनते.
पाऊस पडतो, जीवन सुरू होते,
पृथ्वी तजेलदार होते,
सृष्टी उज्ज्वल होते.
पाऊस पडतो, आनंद होतो,
सर्व काही नवीन दिसते,
जग चांगले बनते.
काहींना वरील कविता अगदी बाळबोध वाटेल; पण लक्षात ठेवा, हे 2023 आहे. 2025 नंतर याचा दर्जा खूपच सुधारेल. कदाचित 2030 नंतर कविसंमेलनात रोबो कवी सहभागी होतील व कविता सादर करतील. त्यांना बक्षीस मिळाले तर ते कोणी घ्यायचे, यावर वादही होतील.
– डॉ. दीपक शिकारपूर

SCROLL FOR NEXT