आजच्या काळात स्मार्टफोन हा केवळ फोन उचलन्यापुरता मर्यादित राहिला नसून तो मल्टीटास्किंगचे साधन बनला आहे. ऑनलाइन गेमिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंगपासून ते फोटो एडिटिंगपर्यंत सर्व कामांसाठी आपण फोनवर अवलंबून असतो. पण नवीन फोन घेताना अनेकांचा असा समज असतो की, 'जेवढी जास्त रॅम, तेवढा चांगला फोन'. परंतु, हे पूर्णपणे सत्य नाही. तुमच्या गरजेपेक्षा जास्त रॅम असलेला फोन घेणे म्हणजे पैशांचा अपव्यय ठरू शकतो.
स्मार्टफोनची रॅम ही तुमच्या वापराच्या पद्धतीवर अवलंबून असते. मोटोरोलाच्या एका ब्लॉग पोस्टनुसार, युजर्संनी त्यांच्या गरजेनुसार खालीलप्रमाणे निवड करावी;
3 GB ते 4 GB रॅम: जर तुमचा वापर मर्यादित असेल, म्हणजे फक्त कॉल करणे, मेसेज पाठवणे, इंटरनेट सर्फिंग आणि फेसबुक-व्हॉट्सअॅपसारखे सोशल मीडिया वापरणे, तर तुमच्यासाठी ४ GB रॅम पुरेसा आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेले स्वस्त फोन ही गरज उत्तमरीत्या पूर्ण करतात.
6 GB ते 8 GB रॅम: जर तुम्ही एकाचवेळी अनेक अॅप्स वापरता (मल्टीटास्किंग), व्हिडिओ स्ट्रीमिंग करता किंवा थोडे जड गेम्स खेळता, तर ८ GB रॅम असलेला फोन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल.
12 GB किंवा त्याहून अधिक: प्रोफेशनल्स, हाय-एंड गेमर्स किंवा जे लोक फोनवरच मोठे व्हिडिओ एडिट करतात, त्यांच्यासाठीच इतक्या जास्त रॅमची गरज भासते. सामान्य वापरासाठी इतकी रॅम असणे म्हणजे अतिरिक्त खर्च करण्यासारखे आहे.
अहवालांनुसार, येणाऱ्या दिवसात रॅमच्या किमती वाढल्यामुळे स्मार्टफोनच्या किमतीही वाढू शकतात. त्यामुळे, "जास्त रॅम म्हणजे उत्तम परफॉर्मन्स" या भ्रमात न राहता, तुमच्या प्रत्यक्ष गरजेचा विचार करूनच फोन निवडा. यामुळे तुमची कामेही सुरळीत होतील आणि खिशाला विनाकारण कात्रीही लागणार नाही.