जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिलिकॉन व्हॅलीतील टेक कंपन्यांमध्ये वर्क कल्चर वेगाने बदलत आहे. गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांचा आरामशीर कामाचा पॅटर्न आता मागे पडत असून, स्टार्टअप्समध्ये ‘996’ नावाचा नवा वर्क कल्चर क्रेझ जोर धरत आहे. याचा अर्थ सकाळी 9 ते रात्री 9 अशा 12 तासांचा कामाचा दिवस आणि आठवड्यात तब्बल 6 दिवस ऑफिस! म्हणजेच आठवड्याला तब्बल 72 तास काम.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) शर्यतीत झपाट्याने आघाडी घेण्यासाठी अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांकडून या पद्धतीने काम करवून घेत आहेत. "आता जो जिंकेल, तोच भविष्यातील बाजार काबीज करेल" अशी धारणा निर्माण झाल्याने विशेषत: स्टार्टअप्स आणि AI टीम्स यात आघाडीवर आहेत.
हा वर्क कल्चर सिलिकॉन व्हॅलीत पहिल्यांदा उदयास आलेला नाही. अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांनी चीनमध्ये ‘996’ ची संकल्पना पुढे आणली होती. मात्र, त्यावर “आधुनिक गुलामगिरी” अशी टीका झाली आणि 2021 मध्ये चीनच्या सर्वोच्च न्यायालयानेच कामाची ही पद्धत बेकायदेशीर ठरवली होती. तरीदेखील आज अमेरिकन कंपन्या चीनशी स्पर्धा करण्यासाठी त्याच पद्धतीकडे पुढे वळन घेताना दिसत आहेत.
Wiredच्या अहवालानुसार, काही स्टार्टअप्समध्ये तर उमेदवारांनी मुलाखतीपूर्वीच “996” पद्धतीने काम करण्याची तयारी दाखवणे बंधनकारक झाले आहे. ‘रिल्ला’ या AI स्टार्टअपने तर नोकरीच्या जाहिरातीतच आठवड्याला 70 तासांपेक्षा जास्त काम करण्याची अपेक्षा स्पष्टपणे नमूद केली आहे. मात्र, इतक्या तासांचा ताणतणावपूर्ण कामाचा परिणाम दीर्घकाळ कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होतो. संशोधनानुसार अशा पद्धतीमुळे ताण वाढतो, उत्पादकता कमी होते आणि बर्नआउट होण्याचा धोका जास्त असतो.
भारतातील आयटी क्षेत्रात देखील यावरून चर्चा छेडली गेली आहे. इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांनी अलीकडेच दीर्घकाळ काम करण्याची बाजू मांडली होती, तर काही स्टार्टअप सीईओजनी 72 तासांचा कामाचा आठवडा सामान्य असल्याचे म्हटले होते. यावरून समाजात कौतुकाबरोबरच जोरदार टीकाही झाली. यावरून एकच प्रश्न उपस्थित होत आहे की, खरंच 996 हे वर्ककल्चर टेक कर्मचाऱ्यांसाठीयशाची गुरुकिल्ली आहे का, की नव्या संकटाची सुरुवात?