Paytm UPI Chages: पेटीएम (Paytm) खरंच बंद होणार का? अशा चर्चेला सोशल मीडियावर उधाण आलं आहे. कारण, काही यूजर्सना 'गूगल प्ले'कडून नोटिफिकेशन मिळालं आहे की, 31 ऑगस्टनंतर पेटीएम UPI काम करणार नाही. या संदेशामुळे लोकांमध्ये संभ्रम पसरला आहे, तर अनेक ठिकाणी ही अफवा पसरू लागली आहे. शेवटी कंपनीला स्वतः पुढे येऊन यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं.
पेटीएमने स्पष्ट केलं आहे की, हा बदल फक्त त्याच यूजर्ससाठी आहे जे यूट्यूब प्रीमियम, गूगल वन स्टोरेज किंवा इतर सब्स्क्रिप्शनसारख्या 'रीकरिंग पेमेन्ट्स'साठी @paytm UPI हँडल वापरतात. अशा यूजर्सना आपला जुना @paytm हँडल बदलून नवीन हँडल (@pthdfc, @ptaxis, @ptyes किंवा @ptsbi) वापरावा लागेल. उदा. तुमची UPI ID rakesh@paytm असेल, तर ती पुढे rakesh@pthdfc किंवा rakesh@ptsbi (तुमच्या बँकेनुसार) अशी होईल. सामान्य Paytm युजर्सवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
आपल्या बँकेशी लिंक केलेला नवीन Paytm UPI हँडल वापरावा.
Google Pay किंवा PhonePe सारख्या इतर UPI ॲप्सद्वारे पेमेंट करावं.
वारंवार होणाऱ्या पेमेंटसाठी डेबिट/क्रेडिट कार्डचा वापर करता येईल.
Paytm कंपनीचे सीईओ प्रमुख विजय शेखर शर्मा यांनी ग्राहकांना आश्वासन दिलं की, पैशांचे व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरळीतपणे सुरू राहतील. 31 ऑगस्टपासून होणारे बदल हे फक्त तांत्रिक प्रक्रियेचा भाग आहेत. NPCI कडून (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) मिळालेल्या मंजुरीनंतर Paytmला TPAP (थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर) म्हणून परवानगी मिळाली आहे. त्यानुसार नवीन UPI हँडल्स सुरू करण्यात आले आहेत.
Google Play च्या एका नोटीफिकेशनमुळे Paytm युजर्संमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. यामुळे खरंच Paytm बंद होणार का ?, असा प्रश्न युजर्संना सतावू लागला. गूगल प्लेने पाठवलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं होतं की, 31 ऑगस्ट 2025 नंतर @paytm UPI हँडल स्वीकारले जाणार नाहीत. हे नियम 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील. परंतु नोटिफिकेशनमध्ये पूर्ण माहिती न दिल्यामुळे यूजर्समध्ये घबराट पसरली. आता पेटीएम कंपनीने स्वत:च स्पष्टीकरण देत यावर पडदा टाकला आहे.