आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हे जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. दरवर्षी बाजारात दमदार कॅमेरा, वेगवान प्रोसेसर आणि उत्तम बॅटरी लाईफ असलेले नवीन मॉडेल लॉन्च होतात. ग्राहकही अधिक चांगली फीचर्स मिळवण्यासाठी आपले जुने फोन बदलतात किंवा एक्सचेंज ऑफर मध्ये देतात.
पण, आपण दिलेला जुना फोन किंवा रिसायकलिंगसाठी दिलेले डिव्हाइस स्मार्टफोन कंपन्या किंवा त्यांचे भागीदार नक्की काय करतात? या प्रश्नाचे उत्तर अनेक ग्राहकांना माहीत नसते. आता या 'सीक्रेट' रहस्यावरून पडदा उठला आहे. जुन्या फोनचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया कंपन्यांनी दोन मुख्य विभागांमध्ये विभागली आहे: 'रिफर्बिशिंग' आणि 'रिसायकलिंग'.
जेव्हा एखादा ग्राहक एक्सचेंज ऑफरमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करतो, तेव्हा तो जुना फोन कंपनी किंवा तिच्या पार्टनरकडे परत जातो. हे डिव्हाइस थेट एका रिसायकलिंग सेंटर (Recycling Centre) किंवा रिफर्बिशिंग युनिट (Refurbishing Unit) मध्ये पाठवले जातात.
फिजिकल तपासणी: या ठिकाणी सर्वात आधी फोनची बाह्य स्थिती तपासली जाते स्क्रीन तुटलेली आहे का, बॉडीवर डेंट आहेत का, बटणे काम करत आहेत का इत्यादी.
टेक्निकल तपासणी: यानंतर फोनची तांत्रिक तपासणी होते. यामध्ये फोन चालू आहे की नाही, बॅटरी आणि मदरबोर्डची स्थिती कशी आहे, आणि त्या फोनमध्ये पुन्हा विकण्यासारखे मूल्य शिल्लक आहे की नाही, हे तपासले जाते.
'A' आणि 'B' ग्रेड फोन (रिफर्बिशिंग): जे फोन चांगल्या स्थितीत आहेत, ज्यामध्ये फक्त किरकोळ दुरुस्तीची गरज आहे (उदा. नवीन बॅटरी, स्क्रीन बदलणे, सॉफ्टवेअर अपडेट), त्यांना रिफर्बिशिंग युनिटमध्ये पाठवले जाते. येथे दुरुस्ती केल्यानंतर हे फोन 'रिफर्बिश केलेले स्मार्टफोन' म्हणून कमी किमतीत पुन्हा बाजारात विकले जातात. अनेकदा हे फोन विकसनशील देशांमध्ये किंवा बजेट-फ्रेंडली पर्याय म्हणून विकले जातात.
'C' आणि 'D' ग्रेड फोन (रिसायकलिंग): जे फोन खूप खराब झालेले आहेत किंवा ज्यांचे मदरबोर्ड नादुरुस्त आहेत, अशा फोनमधून पुन्हा विक्रीसाठी काहीच मूल्य मिळत नाही. हे फोन रिसायकलिंग सेंटरमध्ये पाठवले जातात.
पर्यावरणाच्या दृष्टीने रिसायकलिंग प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. रिसायकलिंग सेंटरमध्ये फोनचे भाग वेगळे केले जातात.
दुर्मीळ घटक: फोनच्या आत सोनं, चांदी, पॅलॅडियम आणि तांबे यांसारखे अनेक दुर्मीळ आणि मौल्यवान धातूंचे सूक्ष्म भाग असतात. रिसायकलिंगद्वारे हे धातू सुरक्षितपणे वेगळे केले जातात आणि त्यांचा पुनर्वापर केला जातो.
प्लास्टिक आणि काच: फोनमधील प्लास्टिक आणि काचेचे भागही वेगळे करून दुसऱ्या उत्पादनांमध्ये वापरले जातात.
या संपूर्ण प्रक्रियेमुळे इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि मौल्यवान नैसर्गिक संसाधने वाचतात.
थोडक्यात, तुमचा जुना स्मार्टफोन एकतर दुरुस्त होऊन दुसऱ्या ग्राहकाकडे जातो किंवा तो पूर्णपणे वेगळा करून त्यातील मौल्यवान घटक बाहेर काढले जातात. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचा फोन एक्सचेंज कराल, तेव्हा तुम्हाला माहीत असेल की तुमचा जुना फोन वाया गेलेला नाही, तर तो डिजिटल अर्थव्यवस्थेच्या चक्रात परत वापरला जात आहे