पुढारी ऑनलाईन डेस्क : Twitter's bird logo | सोशल मीडियाच्या जगात क्रांती घडवून आणणारा ट्विटरचा आयकॉनिक 'ब्लू बर्ड' लोगो आता इतिहासाचा भाग बनला आहे. एलन मस्कने यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून त्यात एकामागून एक अनेक बदल करण्यात आले. सर्वप्रथम त्यांनी ट्विटरचे (Twitter) नाव बदलून एक्स 'X' केले. त्याचवेळी, अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील कंपनीच्या पूर्वीच्या मुख्यालयातून लोगो काढून टाकण्यात आला. यानंतर ट्विटरच्या 'ब्लू बर्ड' लोगोचेही विक्री झाली आहे.
इतिहास जमा झालेल्या या ट्विटरच्या 'ब्लू बर्ड'चा लिलाव ३४ हजार ३७५ डॉलर्स म्हणजेच सुमारे ३० लाख रुपयांना झाला. लिलाव कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुमारे २५४ किलो वजनाचा आणि १२ फूट लांब आणि ९ फूट रुंद असलेल्या या निळ्या पक्ष्याच्या लोगोच्या खरेदीदाराची ओळख मात्र उघड करण्यात आलेली नाही. यापूर्वी एलन मस्क यांनी ट्विटरच्या जुन्या मुख्यालयातील इतर अनेक गोष्टींचा लिलाव केला होता. ज्यामध्ये साइन बोर्ड, स्मृतिचिन्हे, स्वयंपाकघरातील उपकरणे आणि अगदी ऑफिस फर्निचरचाही समावेश होता.
ज्या बोली प्रक्रियेत ब्लू बर्डचा लिलाव करण्यात आला, त्यात Apple-1 संगणक सुमारे ३.२२ कोटी रुपयांना (३.७५ लाख डॉलर्स) विकला गेला. स्टील जॉब्सने स्वाक्षरी केलेला Apple चेक सुमारे ९६.३ लाख रुपयांना (१,१२,०५४ डॉलर्स) विकला गेला. पहिल्या पिढीतील ४ जीबी आयफोन, जो सीलबंद पॅक होता, तो ८७ हजार ५१४ डॉलर्सना विकला गेला. ब्लू बर्डचा हा लोगो आता मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट एक्सचा भाग नसला तरी, सोशल मीडियावर त्याची ओळख अॅपल, नायके सारख्या ब्रँड सारखी आहे.