Meta Teen Accounts: सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या सुरक्षिततेसाठी मेटाने मोठे पाऊल उचलले आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजरवर तरुण युजर्ससाठी अधिक सुरक्षित आणि वयानुरूप कंटेंट देण्यासाठी कंपनीने अनेक नवीन फीचर्सची घोषणा केली आहे. या अपडेट्समुळे पालकांना मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार असून, मुलांसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या कंटेंटवरही नियंत्रण ठेवता येणार आहे.
मेटाने आता नवीन ‘13+ कंटेंट सेटिंग्स’ लागू करण्यास सुरुवात केली आहे. या सेटिंग्समुळे किशोरवयीन मुलांच्या फीडमध्ये धोकादायक मजकूर, व्हिडिओ किंवा पोस्ट कमी प्रमाणात दिसतील. तसेच संशयास्पद किंवा अयोग्य कंटेंट शेअर करणाऱ्या अकाउंट्स, ग्रुप्स आणि पेजेसशी संवाद साधण्यावरही काही प्रमाणात निर्बंध असतील.
या अपडेटमधील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एआय-आधारित वय पडताळणी प्रणाली. आतापर्यंत युजर्सनी दिलेल्या जन्मतारखेवर अवलंबून असणारी व्यवस्था आता अधिक स्मार्ट होणार आहे. मेटाचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान प्रोफाइलमधील माहिती, पोस्ट, कमेंट्स, बायो, कॅप्शनचा अभ्यास करून संबंधित व्यक्तीचे वय अंदाजाने ओळखण्याचा प्रयत्न करणार आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे तंत्रज्ञान चेहरा ओळखण्यासाठी वापरले जाणार नाही. त्याऐवजी फोटो आणि व्हिडिओंमधील संकेतांच्या आधारे युजर्स अल्पवयीन आहे की नाही याचा अंदाज घेतला जाईल. त्यामुळे चुकीची माहिती देऊन वय लपवणाऱ्या अकाउंट्सवरही लक्ष ठेवता येणार आहे.
पालकांसाठी आणखी एक महत्त्वाचे फीचर मेटाने आणले आहे. एखादा किशोरवयीन युजर आत्महत्या, स्वतःला इजा पोहोचवणे किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित धोकादायक विषयांचा वारंवार शोध घेत असल्यास, इन्स्टाग्राम पालकांना त्याची माहिती देणार आहे. हे अलर्ट्स ‘सुपरव्हिजन’ फीचरद्वारे पाठवले जातील. भारतासह अनेक देशांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
याशिवाय ‘फॅमिली सेंटर’ या प्लॅटफॉर्मला अधिक सक्षम करण्यात आले आहे. पालकांना आता इन्स्टाग्राम, फेसबुक, मेसेंजर आणि मेटाच्या इतर सेवांवरील मुलांच्या ऑनलाइन वापराची माहिती एकाच ठिकाणी पाहता येणार आहे. मुलांनी किती वेळ सोशल मीडियावर घालवला, कोणती सुरक्षा सेटिंग्ज अॅक्टिव्ह आहेत आणि त्यांच्या अकाउंटशी संबंधित महत्त्वाच्या सूचना याची माहिती येथे उपलब्ध होणार आहे.
मेटाच्या मते, या नव्या उपाययोजनांचा उद्देश केवळ सोशल मीडिया सुरक्षित बनवणे नसून किशोरवयीन मुलांसाठी अधिक जबाबदार आणि वयानुसार योग्य डिजिटल वातावरण तयार करणे हा आहे. वाढत्या ऑनलाइन वापराच्या काळात पालक, मुलं आणि तंत्रज्ञान कंपन्यांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.