नवी दिल्ली: तंत्रज्ञानाच्या जगात मेटा (Meta) एक असे फीचर आणण्याच्या तयारीत आहे, जे तुमच्या संभाषणाची पद्धतच बदलून टाकू शकते. अनेकदा मित्रांशी किंवा कुटुंबीयांसोबत बोलणं सुरू करून आपण ते विसरून जातो किंवा एखादी महत्त्वाची चर्चा पुढे नेण्याचं लक्षात राहत नाही. पण आता तुमची ही समस्या लवकरच दूर होऊ शकते.
मेटा आपल्या लोकप्रिय प्लॅटफॉर्म्स व्हॉट्सॲप (WhatsApp) आणि मेसेंजर (Messenger) साठी एका नवीन AI चॅटबॉटची चाचणी करत आहे. हा चॅटबॉट केवळ तुमची जुनी संभाषणे लक्षात ठेवणार नाही, तर स्वतःच फॉलो-अप मेसेज पाठवून अर्धवट राहिलेल्या गप्पा पुन्हा सुरू करेल.
हा नवीन AI चॅटबॉट दोन व्यक्तींमधील संभाषण समजून घेण्यासाठी आणि ते लक्षात ठेवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. जर तुमचे कोणासोबत बोलणे अर्धवट राहिले असेल, तर हा चॅटबॉट ते स्वतःहून पुढे नेऊ शकतो.
ऑटोमॅटिक फॉलो-अप : हा AI तुमच्या जुन्या चॅटच्या आधारावर स्वतःच एक फॉलो-अप मेसेज तयार करेल आणि संभाषण पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करेल.
उत्तम स्मरणशक्ती : दोन व्यक्तींमध्ये नेमके काय बोलणे झाले होते, हे चॅटबॉट लक्षात ठेवेल, ज्यामुळे संभाषणाचा संदर्भ कायम राहील.
मेटा AI स्टुडिओ : हा बुद्धिमान चॅटबॉट मेटाच्या स्वतःच्या AI Studio चा वापर करून तयार केला गेला आहे, जो त्याला अधिक स्मार्ट आणि समर्पक बनवतो.
'टेकक्रंच' या वेबसाईटच्या वृत्तानुसार, मेटाने या फीचरच्या चाचणीला दुजोरा दिला आहे. मात्र, युजर्संना विनाकारण त्रास होऊ नये यासाठी काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत.
हा AI तेव्हाच संभाषण सुरू करेल, जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसोबत मागील १४ दिवसांत किमान ५ वेळा मेसेजची देवाणघेवाण केली असेल.
जर तुम्ही AI ने पाठवलेल्या फॉलो-अप मेसेजकडे दुर्लक्ष (Ignore) केले, तर तो चॅटबॉट तुम्हाला पुन्हा मेसेज पाठवणार नाही. ज्या युजर्संना हे फीचर वापरायचे नाही, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
मेटाने स्पष्ट केले आहे की, या फीचरचे संपूर्ण नियंत्रण युजर्संच्या हातात असेल. युजर्स त्यांच्या सोयीनुसार, AI चॅटबॉटसोबत झालेले संभाषण आपल्या स्टोरीजवर शेअर करू शकतात किंवा ते पूर्णपणे खाजगी (प्रायव्हेट) ठेवू शकतात. इतकेच नाही, तर तुम्ही या AI बॉटला तुमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रोफाइलवर देखील दाखवू शकता.
मेटाच्या प्रवक्त्याच्या माहितीनुसार, युजर्संना त्यांच्या आवडीच्या विषयांवर संभाषण सुरू ठेवण्यास आणि ॲप्सवर AI सोबत अधिक जोडले जाण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या फीचरमागील उद्देश आहे. सध्या हे फीचर टेस्टिंग फेजमध्ये असून, सर्व युजर्संसाठी ते कधी उपलब्ध होईल, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यशस्वी चाचणीनंतर मेटा लवकरच हे अनोखे फीचर आपल्या युजर्संन अनुभवायला देईल, अशी अपेक्षा आहे.