नवी दिल्ली: सप्टेंबरमध्ये Apple कंपनीचा आयफोन 17 (iPhone 17) बाजारात येत आहे. ही फक्त ॲपलसाठीच नाही, तर भारताच्या स्मार्टफोन उद्योगासाठीही मोठी बातमी आहे. प्रथमच iPhone 17 सीरिजमधील सर्व चार मॉडेल्स, ज्यात Pro व्हर्जन्स सुद्धा आहेत. ते भारतात सुरुवातीपासूनच तयार केली जाणार आहेत आणि ती केवळ भारतीय बाजारपेठेतच नाही तर अमेरिकेसारख्या देशांतही विकले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावर्षी, पहिल्यांदाच आयफोन 17 चे सर्व चार मॉडेल्स भारतात तयार केले जात आहेत. यात 'प्रो' मॉडेल्सचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, हे फोन फक्त भारतातच विकले जाणार नाहीत, तर अमेरिकेसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्येही निर्यात केले जातील. गेल्या वर्षी आयफोन 16 सिरीजची निर्मिती भारतात झाली होती, पण ती टप्प्याटप्प्याने झाली. आयफोन 17 सिरीज मात्र सुरुवातीपासूनच भारतात तयार होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारतात फोन निर्मिती वाढत आहे, पण यंदा याला मोठा वेग आला आहे. उदाहरणार्थ, एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत भारताने जवळपास 7.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 62,500 कोटी रुपये) किमतीचे आयफोन निर्यात केले आहेत. गेल्या वर्षीच्या एकूण निर्यातीच्या तुलनेत ही जवळपास निम्मी रक्कम आहे. यामुळे ॲपल कंपनी आता भारताला केवळ स्थानिक बाजारपेठेसाठीच नाही, तर निर्यातीसाठीही एक महत्त्वाचे केंद्र मानत आहे.
भारत आता फक्त ॲपलच (Apple) नाही, तर सॅमसंग, शाओमी, ओप्पो, व्हिवो, रिअलमी, मोटोरोला आणि लावा सारख्या अनेक कंपन्यांसाठी एक महत्त्वाचा उत्पादन केंद्र बनला आहे. 'प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह' (PLI) सारख्या सरकारी योजनांनी या वाढीला मोठा हातभार लावला आहे. आज, भारत चीननंतर जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे, येथे 200 हून अधिक कारखाने कार्यरत आहेत. 2014-15 मध्ये भारत त्याच्या गरजेच्या फक्त 26% फोन तयार करत होता, पण आज जवळजवळ 99% फोन भारतातच तयार होतात.
सरकारचे लक्ष्य २०२५-२६ पर्यंत ३०० अब्ज डॉलर्सचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन साध्य करण्याचे आहे, ज्यामध्ये मोबाईल फोनचा वाटा जवळपास ४०% असेल. Tata Group आणि Foxconn सारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर iPhone तयार करत असून यामुळे हजारो नोकऱ्याही निर्माण होणार आहेत. भारतातून होणारी मोबाईल फोनची निर्यात 2023-24 मध्ये 40 टक्क्यांनी वाढली आहे. टाटा ग्रुप आणि फॉक्सकॉनसारख्या कंपन्यांच्या नवीन कारखान्यांमुळे हजारो लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे.
सध्या भारतात फोन बनवण्याचा खर्च चीनच्या तुलनेत 5-8% जास्त आहे, कारण काही महत्त्वाचे भाग अजूनही आयात करावे लागतात. पण PLI सारख्या योजनांमुळे हळूहळू हे भागही भारतातच तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तज्ज्ञांच्या मते येत्या काही वर्षांत भारत या आव्हानांवर मात करून चीनच्या उत्पादनाच्या कार्यक्षमतेची बरोबरी करेल अशी आशा आहे. एकूणच, आयफोन 17 ची भारतात निर्मिती होणे हा भारतीय मोबाईल उद्योगासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. यामुळे "मेक इन इंडिया" कार्यक्रमाला जागतिक पातळीवर एक नवीन ओळख मिळाली आहे.