पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रीमियम मोबाइल निर्माता Apple ने आजपासून (दि.20) भारतात iPhone 16 सीरीजमधील स्मार्टफोनची विक्री सुरू केली आहे. हा फोन घेण्यासाठी लोकांनी अॅपल स्टोअर बाहेर रांगा लावल्या आहेत. भारतातील पहिल्या अॅपल स्टोअर असलेल्या मुंबईतील बीकेसीमधील ॲपल स्टोअरबाहेर लोकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली. दिल्लीतील ॲपल स्टोअरबाहेरही ग्राहकांनी गर्दी केली होती.
उज्ज्वल शहा या ग्राहकाने सांगितले की, 'मी गेल्या अनेक तासांपासून रांगेत उभा आहे. मी काल सकाळी 11 वाजल्यापासून इथे आलो आहे आणि आज सकाळी 8 वाजता दुकानात प्रवेश करणारा मी पहिला असेन. मी आज खूप उत्साही आहे. या नवीन फोनसाठी मी खूप उत्सुक आहे. गेल्या वर्षी iPhone15 सीरीजचा फोन घेण्यासाठी मी 17 तास रांगेत उभा होतो.
आयफोन प्रो सीरीजचे भारतात प्रथमच असेंबल करणे कंपनीची योजना आहे. मात्र, त्या मॉडेल्सची विक्री नंतर सुरू होईल. Apple इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'iPhone16 ची संपूर्ण सीरीज शुक्रवारपासून देशभरात उपलब्ध होईल.' मात्र, कंपनीने भारतात उत्पादित आयफोन प्रो सीरिजच्या उपलब्धतेबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
Apple iphone 16 A18 प्रोसेसरसह येतो. iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये समान फिचर्स आहेत. दोन्ही फोनमधील फरक फक्त बॅटरी आणि डिस्प्लेच्या आकारात आहे. यामध्ये तुम्हाला नवीन कॅमेरा कॅप्चर बटण देखील मिळेल. iPhone 16 ची 6.1 आणि iPhone 16 Plus ची 6.7 इंच स्क्रीन आहे. iPhone 16 चा कॅमेरा नवीन बटण स्लाइड करून नियंत्रित केला जाऊ शकतो. फोनमध्ये एक नवीन कंट्रोल बटण आहे जे टास्कसाठी कस्टमाइझ देखील केले जाऊ शकते. iPhone 16 सह A18 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. यात पूर्वीपेक्षा चांगले न्यूरल इंजिन आहे.
आयफोन 16 सह दोन मागील कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 48 मेगापिक्सेल आहे. यात मॅक्रो आणि अल्ट्रा मोड देखील आहे. कॅमेरा डॉल्बी व्हिजनसह 4K60 व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. iPhone 16 आणि iPhone 16 Plus अल्ट्रामॅरिन, टील, गुलाबी, पांढरा आणि काळ्या रंगात उपलब्ध आहेत. हे 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज पर्यायांमध्ये येतात. iPhone 16 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे, तर iPhone 16 Plus ची सुरुवातीची किंमत 89,900 रुपये आहे. दोन्ही फोनमध्ये AI सपोर्ट आहे. 2,000 nits च्या पीक ब्राइटनेससह XDR OLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये सिरेमिक शील्ड संरक्षण आहे. फोनला IP68 रेटिंग मिळाली आहे.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात आयात शुल्कात कपात केल्यामुळे ही कंपनी प्रथमच आयफोन प्रो सीरिजची मागील आवृत्तीपेक्षा कमी किमतीत विक्री करत आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, 'iPhone 16 Pro ची सुरुवातीची किंमत 1,19,900 रुपये आहे आणि iPhone 16 Pro Max ची सुरुवातीची किंमत 1,44,900 रुपये आहे.'
सुमारे एक वर्षापूर्वी, iPhone 15 Pro 1,34,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत आणि iPhone 15 Pro Max ची सुरुवातीची किंमत Rs 1,59,900 लाँच करण्यात आली होती. iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max 128 GB, 56 GB, 512 GB आणि 1 TB स्टोरेज क्षमतेमध्ये उपलब्ध असतील.