नवी दिल्ली: जर तुमच्या ईमेल आयडीच्या शेवटी @gmail.com असेल आणि तुम्हाला तो आयडी आवडत नसेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गुगल (Google) लवकरच आपल्या सर्व युजर्संना ईमेल आयडीचा 'युझरनेम' (पत्ता) बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. गुगलच्या हिंदी सपोर्ट पेजवरून ही महत्त्वाची माहिती समोर आली असून, ही सुविधा टप्प्याटप्प्याने रोलआउट केली जात आहे.
आतापर्यंत ईमेल आयडी बदलण्याची सुविधा केवळ विशिष्ट बिझनेस अकाऊंट्स किंवा दुसऱ्या सर्विस प्रोव्हायडरशी जोडलेल्या युजर्संनाच उपलब्ध होती. ज्यांच्या आयडीच्या शेवटी @gmail.com होते, त्यांना आपला पत्ता बदलता येत नव्हता. मात्र, आता ही मर्यादा संपणार असून सर्व सामान्य युजर्संनाही आपला ईमेल आयडी बदलता येईल.
अनेक युजर्संनी अनेक वर्षांपूर्वी लहानपणी किंवा घरातील टोपण नावाने जीमेल आयडी बनवले होते (उदा. टोपणनाव123@gmail.com). आता नोकरी किंवा व्यवसायासाठी असे आयडी वापरताना अडचण येते. या नवीन सुविधेमुळे युजर्सना आपले टोपणनाव बदलून एक प्रोफेशनल दिसणारा ईमेल आयडी तयार करता येईल.
तुम्ही तुमचा ईमेल आयडी बदलला तरी जुन्या आयडीवर येणारे सर्व मेल्स तुमच्या नवीन इनबॉक्समध्ये आपोआप येतील. जुना आयडी 'एलियास' (Alias) म्हणून काम करेल. जुन्या मेलमधील तुमचा सर्व डेटा सुरक्षित राहील, त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. नवीन आयडीच्या मदतीने तुम्ही गुगल मॅप्स, युट्यूब, गुगल ड्राइव्ह आणि प्ले स्टोअरमध्ये लॉग-इन करू शकाल. पण एकदा नाव बदलल्यानंतर, पुढील १२ महिने तुम्हाला त्यात पुन्हा बदल करता येणार नाही किंवा तो काढता येणार नाही. तसेच, केवळ नावाचा भाग बदलता येईल, शेवटचे '@gmail.com' तसेच राहील.
मिळालेल्या माहितीनुसार, एका युजर्सला आपल्या एकाच जीमेल (Gmail) अकाऊंटसाठी चार वेगवेगळ्या नावांचे ईमेल आयडी ठेवण्याची सुविधा मिळू शकते. सध्या ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध नसली तरी, लवकरच ती सर्व युजर्सच्या अकाउंटवर दिसायला लागेल. तुमचा जुना आयडी बदलून हवा तसा नवीन आयडी मिळवण्याची ही उत्तम संधी गुगलने उपलब्ध करून दिली आहे.