GenZ digital language and culture social media vibe Words and Meanings
आशिष शिंदे
कोल्हापूर : ‘नो कॅप’, ‘रेड फ्लॅग’, ‘डिलुलू’, ‘आयवायकेवायके’, ‘घोस्टिंग’... हे शब्द ऐकून तुम्ही गोंधळात पडत असाल, तर काळजी करू नका. ही आहे जनरेशन झेड (जेन झी) ची नवी डिजिटल भाषा. रील्स, एक्स, टिकटॉक, स्नॅपचॅट आणि विविध गेमिंग प्लॅटफॉर्मच्या प्रभावामुळे हे स्लँग्स तरुणांच्या दैनंदिन संवादाचा भाग बनले आहेत.
या शब्दांचा वापर इतका वाढला आहे की, त्यांचा अर्थ माहिती नसल्यास सोशल मीडियावरील अनेक पोस्ट, मीम्स आणि चर्चांचा संदर्भच समजणे कठीण होते. तज्ज्ञांच्या मते, ही भाषा केवळ संवादापुरती मर्यादित नसून, बदलत्या डिजिटल संस्कृतीची नवी ओळख बनत आहे.
‘जेन झी’च्या अनेक शब्दांचा मूळ अर्थ पूर्णपणे बदललेला दिसतो. उदाहरणार्थ, ‘एट’ किंवा ‘नो क्रम्ब्स लेफ्ट’ यांचा अन्नाशी काहीही संबंध नसून एखाद्याने उत्कृष्ट काम केल्याचे कौतुक करण्यासाठी ते वापरले जातात. ‘नो कॅप’ म्हणजे ‘मी खरंच बोलतोय’, तर ‘कॅप’ म्हणजे ‘खोटे बोलणे’.
‘आयवायकेवायके’ (इफ यू नो, यू नो) म्हणजे ‘ज्यांना माहिती आहे, त्यांनाच कळेल,’ असा अर्थ होतो. त्याचप्रमाणे ‘डिलुलू’ म्हणजे ‘वास्तवापासून दूर असलेली कल्पना किंवा भ्रम’, तर ‘एरा’ हा शब्द व्यक्तीच्या आयुष्यातील एखाद्या नवीन टप्प्याचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.
‘घोस्टिंग’ म्हणजे ‘कोणालाही कोणतेही स्पष्टीकरण न देता अचानक संपर्क तोडणे’, ‘सिच्युएशनशिप’ म्हणजे ‘मैत्री आणि प्रेमसंबंध यांच्या मधली अनिश्चित अवस्था’, तर ‘मेन कॅरेक्टर’ म्हणजे ‘स्वतःलाच प्रत्येक गोष्टीचा केंद्रबिंदू समजणारी व्यक्ती’. ‘रेड फ्लॅग’, ‘इक’, ‘पिक मी’ आणि ‘टच ग्रास’ यासारखे शब्द वर्तन, नाती आणि ऑनलाईन सवयींवर भाष्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत.
नो कॅप (No Cap) : मी जे सांगतोय ते अगदी खरे आहे; अतिशयोक्ती नाही
कॅप (Cap) : खोटे बोलणे किंवा दिशाभूल दावा
स्ले (Slay) : एखादे काम किंवा लूक अतिशय उत्कृष्ट असणे
डिलुलू (Delulu) : भ्रमात जगणारी व्यक्ती
आयवायकेवायके (If You Know, You Know) : ज्यांना माहिती आहे, त्यांनाच याचा अर्थ कळेल
घोस्टिंग (Ghosting) : कोणतेही स्पष्टीकरण न देता अचानक संपर्क तोडणे
सस (Sus/Suspicious) : संशयास्पद; काहीतरी गडबड असल्यासारखे वाटणे
रेड फ्लॅग (Red Flag) : एखाद्या व्यक्ती किंवा परिस्थितीबाबतचा धोक्याचा इशारा
टच ग्रास (Touch Grass) : सोशल मीडियातून बाहेर पड
सिच्युएशनशिप (Situationship) : मैत्री आणि प्रेमसंबंध यांच्यामधील अनिश्चित नाते
इक (Ick) : एखाद्या छोट्या सवयीमुळे अचानक आकर्षण कमी होणे