UPI Payment by smart goggle glasses digital wallet news
नवी दिल्ली: आता आपल्याला UPI पेमेंट करण्यासाठी मोबाईल फोनची गरज भासणार नाही, कारण आता स्मार्ट ग्लासेस म्हणजेच स्मार्ट चष्म्यांच्या मदतीने देखील यूपीआय पेमेंट (UPI Payment) करणं शक्य होणार आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) या नवीन सुविधेची घोषणा केली असून, नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर टी. रवि शंकर यांनी 'ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५' मध्ये ही सुविधा लॉन्च केली आहे. या नवीन सुविधेमुळे रोजच्या वापरातील छोटी-छोटी पेमेंट करणं खूपच सोपं होणार आहे.
स्मार्ट चष्म्यात UPI Lite ही सुविधा समाविष्ट करण्यात आली आहे. याच्या मदतीने पेमेंट करण्यासाठी युजर्संना फक्त QR कोड स्कॅन करायचा आहे आणि आवाजाद्वारे कमांड द्यायची आहे. महत्त्वाचं म्हणजे, यासाठी UPI पिन टाकण्याची गरज भासणार नाही. NPCIने एका डेमो व्हिडिओद्वारे दाखवलं की, ग्राहक फोनला स्पर्श न करता केवळ चष्म्यातून पाहून आणि बोलून पेमेंट कसं करू शकतात. भाजीपाला किंवा किराणा घेताना हातामध्ये सामान असताना फोन काढून पिन टाकण्याची जी अडचण येते, ती आता या स्मार्ट चष्म्यामुळे दूर होईल.
UPI Lite खास करून छोट्या पेमेंटसाठी तयार करण्यात आलं आहे, ज्यामुळे पेमेंट जलद आणि सोपे होतात. NPCIने सांगितलं आहे की, पहिल्यांदाच UPIला कोणत्याही 'वेअरेबल' म्हणजेच घालता येणाऱ्या वस्तूमध्ये समाविष्ट केलं गेलं आहे. स्मार्ट चष्म्यांमध्ये UPI Liteचा समावेश केल्याने बँकांनाही फायदा होईल आणि ही सुविधा लोकांच्या खूप उपयोगी पडणार असल्याचे देखील NPCI ने म्हटले आहे.