कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात होणाऱ्या क्रांतीमुळेही रोजगारांच्या बाबतीत खूप मोठी उलथापालथ होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. Pudhari File
आर्टिफिशियल इंटेलिजन्स

नोकऱ्यांवर काय परिणाम होईल ?

पुढारी वृत्तसेवा
प्रसाद शिरगावकर

कोणत्याही प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये होणाऱ्या क्रांतीचा नोकऱ्यांवर आणि रोजगारावर खूप मोठा परिणाम होत असतो, असा आजवरचा इतिहास आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात होणाऱ्या क्रांतीमुळेही रोजगारांच्या बाबतीत खूप मोठी उलथापालथ होईल, अशी शक्यता आणि भीती व्यक्त केली जात आहे. यात कितपत तथ्य आहे, याचा ऊहापोह.

डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा पुढचा आणि कदाचित अत्यंत महत्त्वाचा टप्पा येऊ घातला आहे. हा टप्पा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कोणत्याही प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये होणाऱ्या क्रांतीचा नोकऱ्यांवर आणि रोजगारावर खूप मोठा परिणाम होत असतो, असा आजवरचा इतिहास आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात होणाऱ्या क्रांतीमुळेही रोजगारांच्या बाबतीत खूप मोठी उलथापालथ होईल, अशी शक्यता आणि भीती व्यक्त केली जात आहे. सर्वप्रथम एक लक्षात घेतलं पाहिजे की 'कृत्रिम बुद्धिमत्ता' हे एकच एक असं कोणतं सॉफ्टवेअर किंवा अॅप नाही. कोण्या एकाच कंपनीने तयार केलेल्या महाकाय सॉफ्टवेअरमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली क्रांती घडत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणकाच्या प्रणाली विकसनामधली पुढली अवस्था आहे. आजवरच्या संगणक प्रणालींमध्ये संगणकाला काम करण्यासाठी 'लॉजिकल स्टेप्स' दिल्या जात होत्या. एखाद्या प्रणालीमधून नेमकं काय होणं अपेक्षित आहे, याचा पूर्ण विचार करून, 'अमुक घडलं तर तमुक कर' आणि 'सलाणं घडलं तर फलाणं कर' अशी आज्ञावली संगणकाला दिली जायची. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे यंत्रांमध्ये माणसाप्रमाणे विचार करण्याची क्षमता निर्माण करणे. या क्षेत्राचे सहा उपविभाग आहेत. मशिन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, कॉम्प्युटर व्हिजन, स्पीच रेकग्निशन, एक्स्पर्ट सिस्टीम्स आणि रोबोटिक्स हे ते सहा उपविभाग. या सर्व क्षेत्रांमध्ये एकाच वेळी होत असलेल्या क्रांतीला कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात होणारी क्रांती, असं समजलं जात आहे.

या सर्व विभागांमध्ये होत असलेल्या संशोधनामुळे आणि प्रगतीमुळे अनेक क्षेत्रांमध्ये असंख्य छोटे मोठे बदल होत आहेत किंवा होऊ घातले आहेत. यामध्ये कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या यंत्रमानवांपासून (robots) ते घर स्वच्छ करू शकणाऱ्या रोबो व्हॅक्युम क्लिनर्सपर्यंत आणि रोबोटिक सर्जरीपासून ते अत्यंत वेगाने नव्या औषधाबद्दलचे संशोधन करू शकणाऱ्या प्रणालींपर्यंत अनेक बदल होत आहेत. तसंच, एखादा प्रश्न अथवा वाक्य लिहून दिलं किंवा नुसती कल्पना सांगितली, तर संपूर्ण कथा किंवा कादंबरी निर्माण करू शकणाऱ्या 'लार्ज लँग्वेज' मॉडेल्सपासून ते दिलेल्या वर्णनानुसार इमेजेस अथवा डिझाईन्स निर्माण करणाऱ्या आणि एका क्षणात शेकडो व्हिडीओजचा सारांश शोधून तो आपल्यासमोर मांडणाऱ्या अॅप्सपर्यंत असंख्य वेगवेगळी अॅप्लिकेशन्स या क्षेत्रातल्या क्रांतीमुळे आपल्यासमोर येत आहेत आणि यांची संख्या वाढत जाणार आहे. या बदलांमुळे बहुसंख्य क्षेत्रांमधल्या कामाच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल होण्याची शक्यता समोर दिसत आहे.

सकारात्मक परिणाम : उत्पादकता वाढणे अगदी रोजच्या आयुष्यात ईमेल्स लिहिण्यापासून ते प्रपोजल्स, प्रेझेंटेशन्स करण्याची कामं ही ए.आय.च्या मदतीने अत्यंत वेगाने आणि बिनचूकपणे करता येऊ लागली आहेत. तसंच मोठ्या ईमेल्सचा किंवा मोठ्या डॉक्युमेंटस्चा सारांश काढून त्यात नेमकं काय म्हणायचं आहे, हे ए. आय. वापरून खूप थोड्या वेळात वा श्रमात जाणून घेता येणं शक्य होऊ लागलं आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत हजारो ओळींचे प्रोग्रॅम्स ए. आय. कडून लिहून घेणं अथवा असलेल्या प्रोग्रॅम्समधील चुका शोधणं, हेही शक्य होऊ लागलं आहे. ह्या प्रकारच्या Al apps मुळे बैठी आणि विचाराची वा संवादाची कामं करणाऱ्या व्यक्तींची उत्पादकता काही पटींनी वाढण्याची शक्यता आहे. जोखमीची कामे यंत्रांनी करणे कारखान्यांमधील अनेक कामे स्मार्ट यंत्रांकडून अथवा यंत्रमानवांकडून केली जायला सुरुवात झाली आहे.

जिथे माणसाच्या जिवाला जोखीम असते, अशी अनेक कामे करण्यासाठी नव्या प्रकारचे यंत्रमानव तयार केले जाऊ लागले आहेत. अत्यंत जोखमीची, थकवणारी किंवा जिथे कमालीचं मानवी कौशल्य लागतं अशीही कामे यंत्रांकडून करून घेतल्याने कामगारांच्या सुरक्षिततेवर आणि जीवनमानावर सकारात्मक परिणाम होऊ शकेल. निर्णय घेण्यास मदत कोणत्याही व्यवसाय - धंद्यात व्यवस्थापकीय काम करणाऱ्या व्यक्तींना सतत अनेक प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीचा आधार घ्यावा लागतो. ती माहिती, डेटा यांचं विश्लेषण करावं लागतं. आपल्या निर्णयांचे काय परिणाम होतील, याचा वेध घ्यावा लागतो. आजवर असे निर्णय घेताना मानवी विश्लेषण क्षमता आणि विचारक्षमता वापरली जायची. आता मात्र समोर असलेल्या डेटाचं विश्लेषण करण्याचं आणि कोणता निर्णय घेतला तर काय होऊ शकेल, याचा वेध घेण्याचं काम ए. आय. करू शकेल. व्यवस्थापकीय प्रकारची कामे करणाऱ्यांना अशा प्रकारचं विश्लेषण-वेध घेणाऱ्या ए. आय. अॅप्समुळे फायदा होऊ शकेल.

रोजगाराच्या नव्या संधी कृत्रिम बुद्धिमत्ता हे प्रचंड वेगानं विस्तारणारं क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रात काम करण्यासाठी डेटा सायंटिस्ट, अॅनॅलिस्ट वेगवेगळ्या क्षेत्रांमधले 'डोमेन एक्पर्टस्' यांची गरज असते. ही गरज वाढत जाणार आहे, त्यामुळे या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत जाणार आहेत. नकारात्मक परिणाम नोकऱ्यांमधील उलथापालथ ए. आय. मुळे आपली उत्पादकता वाढेल, हे आपण वर बघितलं. उत्पादकता वाढली की आहे ते काम करायला कमी व्यक्तींची गरज लागते. उदा. जे काम करायला सध्या चार व्यक्ती लागतात ते काम नव्या पद्धतीने एखाददुसरी व्यक्तीच करू शकते. याचा थेट परिणाम म्हणून जिथे जिथे ए.आय. मुळे उत्पादकतेत वाढ होईल, त्या-त्या ठिकाणच्या नोकऱ्यांची संख्या कमी होत जाईल. तसंच नोकऱ्यांमध्ये आपण करत असलेल्या कामाच्या स्वरूपातही आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. नोकऱ्या कमी होणे आणि आहे त्या नोकऱ्यांमधील कामाच्या स्वरूपात बदल होणे अशा दोन प्रकारची उलथापालथ येऊ घातली आहे.

पगारांमधील वाढती दरी: भविष्यातील नोकऱ्यांसाठी उच्च तांत्रिक कौशल्ये असणे किंवा कामासाठीच्या नव्या तंत्राचा वापर करण्यात निष्णात असणे गरजेचे असणार आहे. अशा प्रकारची कौशल्ये असणाऱ्या व्यक्तींना खूप मागणी असेल आणि त्यामुळे त्यांचे पगारही खूप वेगाने वाढत जातील. ज्यांच्याकडे तांत्रिक कौशल्ये नाहीत अथवा ज्यांना ए.आय.चा सुयोग्य वापर करता येत नाही, अशा व्यक्तीचे पगार कमी राहण्याची शक्यता आहे. यामुळे नोकरी करणाऱ्यांना मिळत असलेल्या पगारांमधली दरी वाढत जाण्याची शक्यता आहे.

सतत नवे शिकण्याची गरज : आपल्या रोजच्या कामासाठी वापराव्या लागणाऱ्या तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत असल्याने प्रत्येक व्यक्तीला सतत नव्याने शिकत राहायची तयारी ठेवावी लागणार आहे. एकच कौशल्य एकदाच आत्मसात करून त्यावर संपूर्ण आयुष्यभर नोकरी करू शकण्याचे दिवस झपाट्याने मागे पडत चालले आहेत. कोणत्याही क्षेत्रात काम करताना साधं टिकून राहण्यासाठीही सतत नवं तंत्रज्ञान, नव्या पद्धती शिकत रहाव्या लागणार आहेत. मानसिक परिणाम नोकऱ्यांमधली उलथापालथ आणि पगारांमध्ये वाढणारी दरी याचे अनेक नकारात्मक मानसिक परिणाम होण्याची शक्यता आहे. चाळिशी किंवा पन्नाशीपर्यंत ज्या कौशल्यांच्या आधारे काम केलं त्यातली अनेक आता कालबाह्य होणार आहेत, याची जाणीव प्रचंड मोठा मानसिक ताण निर्माण करू शकते. कामाच्या ठिकाणी, कामाच्या प्रकारात अत्यंत वेगाने होणारे बदल स्वीकारणं आणि त्यांच्यासोबत आपण बदलत राहणं हे खूप जिकिरीचं होऊ शकतं. तसंच, या वयात अचानक नोकरी जाण्याने मोठा आर्थिक ताणही निर्माण होऊ शकतो.

भविष्यातील दिशा: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगाची नांदी झाली आहे. हे युग आपलं सर्व जीवन लवकरच व्यापून टाकेल, अशी शक्यता दिसत आहे. यातला कोणताच बदल नाकारणं वा टाळणं आपल्या हातात नाही. या युगाविषयी आणि होत असलेल्या बदलांविषयी योग्य तो दृष्टिकोन आपल्याला विकसित करावा लागणार आहे. या क्रांतीमुळे होणाऱ्या बदलांची व्याप्ती आणि वेग अवाढव्य असेल. या बदलांचे सकारात्मक आणि नकारात्मकही परिणाम प्रत्येक व्यक्तीला अनुभवावे लागणार आहेत. जे लोक हे बदल डोळसपणे बघत राहतील, त्यांचा वेध घेत राहतील, नवं तंत्रज्ञान, नवी कौशल्ये आत्मसात करत राहतील ते या क्रांतीच्या झंझावातात टिकून राहतील आणि समृद्ध होतील...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT