File Photo
आर्टिफिशियल इंटेलिजन्स

...तर बौध्दिक संपदेचे काय?

पुढारी वृत्तसेवा
चंद्रकांत यादव

इंडियन रिप्रोग्राफिक राईटस ऑर्गनायझेशन (आयआरआरओ) ही भारतीय आणि जागतिक मिळून 113 प्रकाशन संस्थांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे. पीअर्सन, ऑक्सफर्ड अशा नामांकित प्रकाशन संस्थाही या संघटनेशी संलग्न आहेत. विविध अभ्यासक्रमांशी संबंधित पुस्तकांमध्ये ए.आय.चा अंतर्भाव करावा, की नाही, हा प्रश्न आता प्रकाशकांना पडलेला आहे. कितीतरी ए.आय. कंपन्या प्रकाशकांच्या या संघटनेच्या कार्यकारिणीशी वारंवार संपर्क साधत आहेत आणि कॉन्टेंट आऊसोर्सिंग राईटस्बद्दल या कंपन्या विचारणा करत आहेत. त्यांना काय उत्तर द्यावे, यावर सध्या प्रकाशक संघटनेच्या कार्यकारिणीत ऊहापोह सुरू आहे.

जेनएआय कंपन्या कन्टेंट परवान्याबाबत बोलतात तेव्हा क्रमिक पुस्तकांच्या या प्रकाशकांची त्रेधातिरपीट उडते. आपण भस्मासुरांशीच बोलणी करत आहोत की काय, असेही प्रकाशकांना वाटू लागते. ए.आय. प्रशिक्षण मॉडेल्ससाठी एकीकडे डील करणे योग्यही वाटते, कारण पुस्तकांत हे तंत्र समाविष्ट केले तर त्यापोटी मिळणारा मोबदला चांगलाच असेल, याची मनोमन खात्री आहे. दुसरीकडे, परवाना शुल्क देऊन ए.आय. मॉडेल प्रशिक्षणासाठीचे अधिकृत साहित्य पुस्तकांत समाविष्ट करणे, हा काही कायमस्वरूपी व कायदेशीर पर्याय असू शकत नाही, अशी शंकाही वाटते. कारण ए.आय. मॉडेल एकदा प्रशिक्षित झाले, की ते स्वतंत्रपणे नवीन कन्टेंटही निर्माण करण्यास मोकळे असतात. सामग्रीवरील मालकीहक्क (कॉपीराईट) प्रस्थापित करणे त्यामुळे जिकिरीचेच ठरेल, हा प्रश्नही पडतो.

आयआरआरओचे महासचिव प्रणव गुप्ता सांगतात, या जेनएआय कंपन्या त्यांच्याकडे असलेल्या पैशांच्या बळावर तसेच तंत्रज्ञान शक्तीच्या बळावर उत्साहात आहेत खर्‍या; पण त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे, की रचनाकाराची रचना ही अल्गोरिदमसाठीच्या डेटा पॉईंट्सच्या अंगाने सिद्ध करता येणार नाही. त्यासाठी आर्थिक आणि कायदेशीर पातळीवर नेमकेपणाने काम व्हायला हवे. आमच्याकडून मोबदला घेऊन एखादी कंपनी आम्हाला असे तंत्र उपलब्ध करून देऊ शकते, जे त्या कंपनीचे स्वत:च्या मालकीचे नाही, हाही एक प्रश्न आमच्यासमोर आहे. आमच्याकडे कंपन्यांकडून परवान्याबद्दलचे प्रस्ताव ढिगाने आलेले आहेत. तंत्रनिर्मात्यांनाही योग्य तो मोबदला मिळावा आणि आमचीही फसवणूक होऊ नये, असा मार्ग आम्ही चोखाळणार आहोत, असेही गुप्ता यांनी सांगितले.

ए.आय.च्या अनुषंगाने जगाची सध्या सुरू असलेली वाटचालच अशी आहे, की अतिरिक्त मोबदला मिळवायचा तर ए.आय. इनोव्हेशन अंगीकारण्यास प्रकाशकांना ती उद्युक्त करते आहे, ते याबाबतीत संभ्रमात असले तरी! उदाहरणार्थ, ब्रिटनमधील विले या प्रख्यात शैक्षणिक प्रकाशन संस्थेने जूनमध्ये जेनएआय कंपन्यांशी दोन करार केलेले आहेत. हे करार तब्बल 44 दशलक्ष डॉलरचे आहेत. अनेक बाजार विश्लेषकांना हा घाट्याचा सौदा वाटतो. अवघ्या 2 टक्के अतिरिक्त मोबदल्यासाठी इतकी गुंतवणूक योग्य नाही, असे या विश्लेषकांचे म्हणणे आहे. काही विश्लेषक मात्र हे करार दूरदृष्टीचे आहे, असे सांगतात. प्रकाशकाला ते बक्कळ कमाई मिळवून देतील, असा दावाही या दुसर्‍या बाजूच्या विश्लेषकांचा आहे.

कॉपीराईट क्लिअरन्स सेंटर नावाची एक संस्था अमेरिकेत आहे. प्रकाशकांसाठी मध्यस्थ म्हणून ती काम करते. ज्ञान, तंत्रसामग्री आपल्या पुस्तकांत वापरण्याचे परवाने प्रकाशकांना मिळवून देते. या कंपनीने आपल्या वार्षिक कॉपीराईट परवान्यात ए.आय. राईट्सचाही समावेश आता केलेला आहे. जी प्रतिष्ठाने कॉपीराईट प्राप्त ए.आय.सामग्री सबस्क्राईब करतील, तूर्त त्यांना ती वापरता येतील. नजीकच्या काळात ही संस्था थेट प्रकाशकांशीही यासंदर्भात डिलिंग करेल. ए.आय. जनरेटेड कंन्टेंटचा (ए.आय.निर्मित सामग्री) आयपी (बौद्धिक संपदा अधिकार) कुणाकडे असतो, इथून सगळी सुरुवात सध्या आहे. ए.आय. मॉडेल बनविणार्‍या टेक कंपनीकडे, की प्रॉम्प्ट इंजिनिअरकडे? (प्रॉम्प्ट इंजिनिअर म्हणजे जी व्यक्ती जेनएआय वा मशिन लर्निंगला कमांड देऊन सामग्री निर्माण करते) ए.आय.चे वैयक्तिक मालकी हक्क असतात, तरी नेमके काय? एखाद्या ए.आय. सामग्रीमुळे तिसर्‍या पक्षाच्या बौद्धिक संपदा अधिकाराचे उल्लंघन झाले तर जबाबदार कोण, काय करणार, असे अनेक प्रश्न सध्या आहेत. अनेक तज्ज्ञांच्या मते, खरेतर कंपन्या आणि प्रकाशकांदरम्यान वा ए.आय.संदर्भात अन्य कुठल्याही दोन पक्षकारांदरम्यान परवान्यासाठीचे हे करार एक तात्पुरता उपाय वा मार्ग आहेत.

इतर क्षेत्रांशी तुलना करता ए.आय. हे प्रचलनात आलेले एक नवे क्षेत्र आहे. त्यामुळे याबाबत कायदे सुस्थापित होणे गरजेचे आहे. त्याशिवाय हे करार, हे परवाने पूर्णपणे समर्पक ठरणार नाहीत. ए.आय. आणि कायदे या दोन्ही क्षेत्रांची जुजबी माहिती असलेल्या एकाचे म्हणणे असे : एखाद्या व्यक्तीने स्वतंत्रपणे एक सामग्री निर्माण केली. ती अधिक चपखल, परिणामकारक व्हावी म्हणून स्वत:च ए.आय.चा वापरही केला. दुसर्‍या एका उदाहरणात, प्रॉम्प्ट इंजिनिअरने ए.आय.ला नवीन सामग्री निर्माण करण्याच्या सूचना केल्या. सामग्री त्याने ए.आय.च्या मदतीने निर्माण केली. याउपर दोन्हीही उदाहरणांत ए.आय. मॉडेलने स्वबळावर सामग्री निर्माण केल्याचे सिद्ध होत नाही. मग त्या सामग्रीची बौद्धिक संपदा कुणाची असेल. मूळ निर्मात्याची, ए.आय. मॉडेल बनविणार्‍या कंपनीची, की प्रॉम्प्ट इंजिनिअरची? थोडक्यात काय, तर बौद्धिक संपदा ए.आय.मुळे संपुष्टात येणारच नाही. सामग्रीवरील मालकी हक्क ही संकल्पना ए.आय.ने हलवून सोडलेली आहे, हे मात्र मानावेच लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT