कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय) चा गुंतवणूक क्षेत्रावरील प्रभाव आमूलाग्र आणि बहुआयामी बदल घडविणारा आहे. आपल्या देशात गुंतवणूक क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. जागतिक पटलावर भारत हा उभारता देश म्हणून पुढे आला आहे. आज सुमारे दोनशेहून देशामधील गुंतवणूक भारतात होत आहे. जागतिक स्तरावर देशाची आयात-निर्यात वाढत आहे. सोने, नैसर्गिक तेल, वायू, खनिजे, अन्य सेवा अशा घटकांच्या मागणी आणि पुरवठा यातील फरकामुळे जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात बदल होतात. ज्यामुळे गुंतवणूकदार, वित्तीय संस्था आणि मालमत्ता व्यवस्थापक यांना गुंतवणूक बाबतीत निर्णय घेताना काही ठोकताळे बांधावे लागतात. या पार्श्वभूमीवर जागतिक घडामोडी आणि त्याचे परिणाम याबाबत संशोधन करून मगच गुंतवणुकीबाबत निर्णय घ्यावा लागतो. गुंतवणूक करताना माहिती संकलन आणि संशोधन या बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यासाठी ए.आय.तंत्रज्ञान उपयोगी पडणार आहे.
1. डेटा विश्लेषण आणि निर्णय : गुंतवणूक क्षेत्र हे सर्वच क्षेत्राशी निगडित असते. वेगवेगळ्या प्रकारच्या डेटावर वेगाने प्रक्रिया करण्याची ए.आय.ची क्षमता गुंतवणूकदारांना निर्णय घेण्यास उपयोगी ठरू शकते. संरचित आणि असंरचित डेटाचे विश्लेषण करून (जसे की एखाद्या देशातील घडामोडी मुळे काही निवडक भागात निवडक वस्तूंच्या मागणीत बदल होतात, त्यामुळे बाजारातील ट्रेंड, आर्थिक अहवाल, सोशल मीडिया आणि बातम्या), एआय मालमत्तेच्या किमतींचा अंदाज लावण्यात, गुंतवणुकीच्या संधी शोधण्यात आणि संभाव्य जोखीम ओळखण्यात ए.आय. मदत करू शकते. मशिन लर्निंग एआय निगडित तंत्रज्ञान आहे. कॉम्प्युटरला दिलेल्या आदेशानुसार माहिती संकलित करणे त्या कार्याचा डेटा स्टोअर करणे आणि हव्या त्यावेळेस डेटाचा वापर करून दिलेल्या आदेशानुसार अचूक कार्य करणे इत्यादी गोष्टी या माध्यमातून केल्या जातात. यातील अनेक गोष्टीचा परस्परसंबंध असतो. काही गोष्टी किचकट असतात. मात्र एआय ऐतिहासिक डेटा आणि बाजार परिस्थितीचे कमी वेळेत विश्लेषण करू शकते. अल्गोरिदम, सोशल मीडिया आणि आर्थिक अहवालांवर आधारित विश्लेषणास समर्थन देऊ शकतात. त्यामुळे बाजारातील मूड आणि गुंतवणूकदारांचे ट्रेंड समजण्यास मदत होते.
2. अल्गोरिदम आणि उच्चस्तरीय ट्रेडिंग ः शेअर मार्केट मध्ये अनेक ब्रोकरकडे असख्य डीमॅट खाती असतात. प्रत्येक खात्यामध्ये असंख्य शेअर्स असतात, अशा सर्व शेअर्सवर नजर ठेवणे त्यांना एकाचवेळी स्टॉपलॉस लावणे. योग्य दरात विक्री करणे या गोष्टी मानवाकडून करताना बंधने येत असत. हे काम भयंकर किचकट काम आहे. मात्र अल्गोरिदम तंत्रज्ञानाने हे काम अत्यंत सोपे झाले आहे. एकाच वेळी दिलेल्या सूचनेनुसार अनेक खात्यांमधील शेअर्सची खरेदी किंवा विक्री सहजपणे करता येते . एआय -चालित अल्गोरिदमने उच्च-फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगमध्ये क्रांती घडवून आणली आहे. अल्गोरिदम ठरलेल्या रणनीतीनुसार गतिमानपणे व्यवहार करू शकतात. बाजारातील तेजी मंदी बदलांनुसार हे तंत्रज्ञान प्रतिक्रिया देऊ शकते. मानवी व्यापारापेक्षा अधिक अचूकता आणि वेगाने व्यवहार करण्यात येतात. ट्रेडिंग निर्णय तत्परतेने होतात. गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी मिळू शकतात. त्यामुळे फायदा होण्याची शक्यता बळावते. संभाव्य धोके कमी होऊ शकतात. ट्रेडिंग फ्रिक्वेन्सी वाढल्याने शेअर मार्केटमधील उलाढाल प्रमाण वाढण्यास मदत होते.
3) मोठ्या प्रमाणात डेटावर प्रक्रिया ः एआय-आधारित व्यापार धोरणे मोठ्या प्रमाणात बाजार डेटावर प्रक्रिया करू शकतात. मानवी व्यापार्यापेक्षा अधिक कार्यक्षमतेने व्यापारांची अंमलबजावणी करू शकतात. उदा. मागील वर्षी पावसाळ्यात विशिष्ट भौगोलिक परिसरात कोणत्या वस्तूंना किती मागणी होती. यावर्षी किती राहील याचा अंदाज घेणे. काही विशिष्ट घटना घडली की मागणीत काय बदल होऊ शकतात या अशा अनेक बाबतीत मागील काही वर्षांतील डेटा घेऊन त्यावर त्वरित प्रक्रिया करून संशोधनात्मक निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे संभाव्य परिस्थितीत नफा नुकसान अधिक अथवा कमी करणे शक्य होईल .
4) कृत्रिम बुद्धिमत्ता व्यापार वाढविते ः बाजार आणि कंपनी यांचे संशोधन करताना त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांची मानवी शक्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च होत असते. दहा तज्ज्ञांचे कार्य एका क्षणात गणिती मॉडेलनुसार ए.आय. तंत्रज्ञानाने केले जाऊ शकते. त्यामुळे गुंतवणुकीचे त्वरित निर्णय घेता येतील. जटिल डेटाबेस आणि रीअल-टाईम माहिती त्वरित मिळते. या माहिती आधारे गुंतवणुकीच्या संधी शोधण्यात यश मिळते. त्याप्रमाणे प्रोग्रामिंग करून शेअर्स खरेदी अथवा विक्री करता येते त्याचा परिणाम व्यापार वाढविण्यास मदत होते. त्यामुळे पोर्टफोलिओ व्यवस्थापन प्रभावी करता येते. त्याच प्रमाणे मार्केटमधील चढ-उतार प्रमाणे नियंत्रित करणारे रोबो-सल्लागार अधिक प्रचलित होत आहेत. रोबो सल्लागाराकडून एआय पोर्टफोलिओ उत्तम प्रकारे व्यवस्थापित केले जात आहेत. प्रत्येक गुंतवणूक दाराला एआय-चालित प्लॅटफॉर्मवरून स्वयंचलित सूचना देऊन अल्गोरिदम-आधारित पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा चागल्या पद्धतीने देता येतात. ते विशेषतः सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त आहेत. एआय तंत्रज्ञानामुळे दिवसातून 24 तास सातही दिवस गुंतवणूक केलेल्या पोर्टफोलिओचे सातत्याने निरीक्षण करू शकते. बाजारातील बदलत्या परिस्थितीवर आधारित काही बदल सुचवू शकते.
5. जोखीम व्यवस्थापन आणि फसवणूक शोध ः बाजारातील प्रत्येक गुंतवणुकी मागे काहींना काही जोखीम असते उदा डेट मार्केट मध्ये क्रेडीट रिस्क असते. बदलत्या व्याजदराचा परिणाम होत असतो. बाजारातील घडामोडी मुळे उदा. महागाई दर तेजी-मंदीसारख्या गोष्टीची दखल घेऊन व्याज दर कसे राहतील याबाबत निष्कर्ष या तंत्रज्ञानाने काढता येतो. बरेच ठिकाणी व्यवस्थापन सुधारण्यात आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी एआय महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. संभाव्य धोके किंवा फसवणूक रोखण्यासाठी एआय व्यवहार डेटाचे विश्लेषण करून मदत करू शकते. बाजारातील संभाव्य जोखमींचे अंदाज बांधता येऊ शकतात. क्रेडिट डिफॉल्ट किंवा तरलता समस्या, मार्केट ट्रेंड, राहणीमानातील बदलामुळे वस्तूंची कमतरता याची माहिती मिळू शकते. त्यामुळे गुंतवणूकदार आणि वित्तीय कंपन्यांना नफा वाढविण्यास किंवा तोटा कमी करण्यास मदत होऊ शकते. अल्गोरिदममुळे प्रत्येक व्यवहारावर नजर ठेवली जाते व नोंद घेतली जाते. फसवे व्यवहार ओळखण्यासाठी, आर्थिक गुन्हे कमी करण्यासाठी आणि गुंतवणूक व्यवहारांमध्ये सुरक्षा सुधारण्यासाठी ए.आय.चा उपयोग होऊ शकतो.
6. व्यवस्थापन खर्चात कपात : गुंतवणूक व्यवस्थापन करताना मोठ्या प्रमाणात तज्ज्ञ लोकांची आणि मानवी शक्ती खर्च होत असते. त्यासाठी करावा लागणारा खर्च मोठा असतो. अनेक लोकांचे कार्य कृत्रिम बुद्धिमत्ताव्दारे तप्तरतेने करता येतात. प्रत्येक गोष्टीसाठी तज्ज्ञांची गरज भासणार नाही. ऑटोमेशन आणि ऑप्टिमायझेशनद्वारे एआय विविध कार्ये एकाच वेळेत सुव्यवस्थित पार पाडत असते. परिणामी, एआय बाजार संशोधन आणि विश्लेषणाशी संबंधित खूप मोठा खर्च कमी करण्यात मदत होते. एकंदरीत गुंतवणूक क्षेत्रातील व्यवस्थापन खर्च करण्यास ए.आय. तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. परिणामी, गुंतवणूक सेवा अधिक परवडणारी लोकाभिमुक होण्यास मदत होते .
7. गुंतवणूक सेवांचे वैयक्तिकरण :
एआय तंत्रज्ञानामुळे वैयक्तिक गुंतवणुकीबाबत पारदर्शीपणा येतो. आर्थिक उद्दिष्टे, अल्प मध्यम दीर्घ काळाच्या प्राधान्यानुसार असेट अलोकेशन, जोखीम प्रोफाईल आणि विशिष्ट घडामोडी नुसार, आर्थिक परिस्थितीनुसार आणि गुंतवणूक धोरणानुसार पोर्टफोलिओ तयार करू शकते. रोबो-सल्लागार सेवांमध्ये व्यक्तिगत आर्थिक योजना तयार करण्यात मदत करतात. गुंतवणूकदारांना त्यांच्या विशिष्ट उद्दिष्टे कशी पार पडली पाहिजेत, याबाबत या तंत्रज्ञानाचे उपयोग चांगला होतो, गुंतवणूक दाराचे वयानुसार जोखीम सहनशीलतानुसार कालमर्यादानुसार गुंतवणूक निर्णय घेण्यास मदत होते
8. नियामक अनुपालनावर परिणाम : भारतीय भांडवली बाजारात सर्वसामान्य लोकांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बाजारातील उलाढाल मोठ्या प्रमाणावर वाढत असताना गुंतवणूकदारांचे संरक्षण व्हावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रण ठेवणार्या संस्था वेगवेगळे नियमवाली बनवीत असतात. या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन करण्यासाठी या तंत्रज्ञानाचे उपयोग चांगल्या प्रकारे करता येतो. ए.आय. व्यवहारांचे निरीक्षण, बाजारातील उलाढाल आणि अहवाल स्वयंचलित करून नियामक आवश्यकतांचे पालन सुनिश्चित करण्यात मदत करते.
9 नोकरी आणि कौशल्य विकास : आर्थिक क्षेत्राचा विकास साधण्यासाठी एआय-चालित धोरणे आणि साधने विकसित व्यवस्थापित करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची जास्त मागणी आहे. गुंतवणूक क्षेत्रात एआयचा प्रभाव नवीन नोकरीच्या भूमिका आणि कौशल्याची आवश्यकता निर्माण करत आहे. काही पारंपरिक भूमिका मागे टाकून नवनवीन कौशल्ये निर्माण करीत आहे. डेटा सायन्स, एआय मॉडेल डेव्हलपमेंट, अल्गोरिदम व्यवस्थापन, मशिन लर्निंग, डेटा अॅनालिटिक्स, आर्थिक अभियांत्रिकी, एआय विशेषज्ञ, डेटा वैज्ञानिक यांचा अशा प्रकारच्या लोकांना खूपच मागणी आहे. असे कौशल्य विकास करण्यास खूप मोठा वाव आहे.
एआय चे आर्थिक क्षेत्राला काही तोटेही आहेत
बेरोजगारी वाढण्याची शक्यता :
गुंतवणूक क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे . पूर्वी एखाद्या क्षेत्राचा निरीक्षण अथवा संशोधन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मानवी शक्ती आणि तज्ञांची फौज लागत असे आता नवीन आलेल्या स्वयंचलित एआय-चालित ऑटोमेशन, जसे की चॅटबॉट्स, अल्गोरिदमिक ट्रेडिंग आणि डेटा विश्लेषण, या सारख्या नवीन तंत्रज्ञाना मुळे या निरीक्षण संशोधन, ग्राहक सेवा, यासारख्या क्षेत्रांमध्ये मानवी शक्ती किंवा तज्ञांची फौज लागणार नाही परिणामी बेरोजगारी वाढून अनेकांच्या नोकर्या जाऊ शकतात .
पारदर्शकतेचा अभाव :
आर्थिक क्षेत्रात वेगवेगळ्या कंपन्या मधील अनेक घटकांचा अभ्यास, निरीक्षण, संशोधन, केले जाते हि कार्ये करीत असताना वेगवेगळे प्रकारची माहिती एकत्र करणे, त्यावर प्रोसेस करणे हि महत्त्वाची प्रक्रिया असते . बाजारातील ग्राहकांचा कल काय राहील , मार्केट मधील बदलता ट्रेंड शोधणे, प्रतिवर्षी वाढणारी मागणी झालेला पुरवठा लक्षात घेणे, कंपनीचा व्यवस्थापन खर्च, उत्पादन खर्च, मार्केटिंग खर्च, भांडवली खर्च अशा एकमेकावर अवलंबून असलेली अनेक गोष्टीची माहिती एकत्र करून त्यावर निर्णयात्मक तोडगा काढण्यसाठी एआय प्रणाली, डेटा अनाटिकल मशीन लर्निंगसारखे नवीन तंत्रज्ञान कसे प्रोसेस करते हे समजणे क्लिष्ट आहे किंवा स्पष्ट करणे तज्ज्ञांना कठीण जाते. जर ए.आय. प्रणालीला मिळालेल्या डेटावरून घेतलेला निर्णय बरोबर की चुकीचा आहे याबाबत तज्ज्ञ संभ्रमात पडतात, जे वित्तसारख्या नियमन केलेल्या क्षेत्रांमध्ये समस्याग्रस्त ठरू शकते.
सुरक्षा आणि गोपनीयता जोखीम :
एआय प्रणालीमध्ये प्रत्येक कंपनीची मोठ्या प्रमाणात बाजाराशी निगडीत माहिती दडलेली असते. या माहितीच्या आधारे काही निष्कर्ष काढले जातात. ते बाजारातील अस्थिरतेशी सलग्न असू शकतात. जर या तंत्रज्ञानातील प्रणाली योग्यरीत्या सुरक्षित केल्या गेल्या नाहीत, तर त्यावर सायबर हल्ला होऊ शकतो किंवा डेटा चोरीस जाऊ शकतो. मिळालेल्या डेटाचा गैरवापर होऊ शकतो. ग्राहकांच्या गोपनीयतेचे संभाव्य उल्लंघन होऊ शकते. सध्या अशा प्रकारच्या माहितीचा डेटा चोरीस गेल्याने अनेक वेळा आर्थिक गुन्हे घडताना आपण पाहत आहोत.
समप्रणालीची जोखीम :
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने निरनिराळ्या डेटांवर प्रोसेस करून निष्कर्ष काढले जातात. निर्णय घेताना एआय तंत्रज्ञानास समप्रणाली जोखमीचा सामना करावा लागू शकतो. उदाहरणार्थ, जर अनेक संस्था जोखीम मूल्यमापन किंवा व्यापारासाठी समान एआय तंत्रज्ञान वापरत असतील तिथे जोखीम निर्माण होऊ शकतो. सर्वच प्रकारच्या उत्पादनासाठी एकच प्रणाली वापरणे योग्य ठरू शकणार नाही आणि समप्रणालीमुळे निर्णय चुकीचा ठरू शकतो. त्यामुळे बाजारातील अस्थिरता वाढू शकते.
अंमलबजावणीची किंमत :
आर्थिक क्षेत्रातील कंपन्यामध्ये ए.आय. प्रणाली लागू करण्यासाठी तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा तांत्रिक तज्ज्ञांची गरज भासते यासाठी मोठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. एआयचा व्यापक सेवा अमलात आणताना त्या कंपनीसाठी आर्थिक भार ठरतो. असे तंत्रज्ञान सातत्याने वापर करताना त्याचा खर्च अविरतपणे होत असतो. या तंत्रज्ञानात सतत अपडेट करणे त्याचा वार्षिक आढावा घेणे तो डेटा संरक्षित करणे. नवनवीन बदल करणे आवश्यक असते. या प्रणालीमध्ये सातत्य राखण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करण्याची आवश्यकता आहे.
मानवी निर्णयाचा अभाव:
आर्थिक क्षेत्रात मानवी तज्ज्ञांकडून सल्ला किंवा सेवा देत असताना व्यक्तीच्या भावनिक, वैयक्तिक परिस्थिती, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती, सर्वच घटकांचा विचार करून सल्ला दिला जातो कृत्रिम बुद्धिमत्ता मध्ये अशा गोष्टीना थारा नसतो. वरीलप्रमाणे निर्णय घेण्याची क्षमता जी मानवी शक्तीमध्ये आहे ती कृत्रिम बुध्दिमत्तेमध्ये दिसत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला दिलेल्या सूचनेनुसार सर्व प्रकारच्या लोकांना एक समान सल्ला दिला जाणार. तो काही लोकांना फायदेशीर ठरेल, पण काही लोकांच्या बाबतीत प्रचंड नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानवी आर्थिक सल्लागार निर्णय घेतात, तो हे तंत्रज्ञान निर्णय घेऊ शकणार नाही विशेषत: आणि जटिल भावनिक घटक गुंतलेल्या प्रकरणांमध्ये. कृत्रिम बुद्धिमत्ता कार्य करू शकत नाही.