इमोशनल ए.आय. हे अनेक तंत्रज्ञानांचा वापर करून कार्य करते.  Pudhari News Network
आर्टिफिशियल इंटेलिजन्स

मानवी भावना आणि ए.आय.

पुढारी वृत्तसेवा
डॉ. दीपक शिकारपूर

इमोशन ए.आय. हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक भाग आहे जी मानवी भावना आकलन करते, समजून घेते, अनुकरण करते आणि त्यावर प्रतिक्रिया देते. इमोशनल ए.आय. हे अनेक तंत्रज्ञानांचा वापर करून कार्य करते. त्याचा वापर मानवी जीवन सुधारण्यासाठी होऊ शकतो. भविष्यात हे तंत्र मानवी बुद्धिमत्तेच्या क्षमतेला वाढवण्यासाठी एक शक्तिशाली साधन म्हणून काम करू शकते. या तंत्रज्ञानाचा नैतिक आणि जबाबदार वापर करून, आपण एक अधिक सुंदर आणि समृद्ध भविष्य निर्माण करू शकतो.

आजचं युग पूर्णपणे डिजिटल झालं आहे. तंत्रज्ञानात्मक प्रगतीचा वेग चक्रावून टाकणारा आहे. माहिती (डेटा), कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि संपर्क सुविधा (कनेक्टिव्हिटी) या तीन घटकांचा समावेश असलेली चौथी औद्योगिक क्रांती आता जगात घडू लागली आहे; माहितीने जागतिक अर्थव्यवस्थेत आता ‘तेला’ची जागा घेतली आहे. प्रत्येक वस्तू, उपकरण हे ‘स्मार्ट’ असणं आज चैन नसून, गरज होत चालली आहे. यंत्रमानव व मानव यामधील दरी आगामी शतकात कमी कमी होणार आहे. आपल्या आसपासच्या डिजिटल विश्वाची सतत उत्क्रांती होत राहणार आहे. त्यामुळेच या तंत्राचे व्यावहारिक उपयोगदेखील वाढताना दिसणार आहेत. लवकरच आपल्या जीवनशैलीमध्ये आणि दिनक्रमामध्ये इतक्या सहजपणे हे तंत्र मिसळणार आहे, की एखाद्या वस्तूबाबत अशा प्रकारची अतिरिक्त माहिती मिळणे आपण गृहीतच धरणार आहोत. आरोग्य, प्रवास, खरेदी अशा सर्व पैलूंना हे तंत्र स्पर्श करणार आहे. माहितीचे महाजाल आणि तिचे विकेंद्रीकरण हे याचे मूलतत्त्व असणार आहे. या तंत्रानुसार संबंधित यंत्रणेला दिल्या जाणार्‍या मर्यादित निर्णयक्षमतेमुळे देखील एकंदर चित्रावर मोठा आणि मनोरंजक परिणाम दिसू लागेल. आपले जीवन कळत-नकळत तंत्रावलंबी (स्मार्ट) बनेल. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने आपल्या जगात क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर आता आपल्या दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करत आहे. भविष्यात, ए.आय. अधिकाधिक शक्तिशाली आणि प्रभावी होत जाईल, ज्यामुळे अनेक नवीन संधी आणि आव्हाने निर्माण होतील.

संगणक युग भारतात अवतरायला सुमारे वीसेक वर्षे लागली. पूर्वीचे संगणक आकाराने मोठे, लघु शक्तीचे आणि वापरायला साधे सोपे होते. काही वर्षांनंतर माऊस या उपकरणाचे आगमन झाले आणि वापरकर्त्याचे काम अजून सोपे झाले. नंतर ध्वनी (ऑडिओ ), चित्र , चलत्चित्र (व्हिडीओ) हे नवीन परिमाण अस्तित्वात आले. टॅबलेट पीसी, स्मार्टफोनमुळे या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. स्मार्ट वापरकर्त्याला आकर्षित करून, त्यांचा संगणक वापरायचा उत्साह व रस कायम ठेवण्यासाठी उत्पानकर्ते (प्रॉडक्ट डिझायनर्स) अनेक क्लृप्त्या लढवत असतात. याची आपण काही उदाहरणे बघू. जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट, रंगसंगती वगैरे खटकते तेव्हा तो/ती हा रंग बदलला पाहिजे अथवा हा चौकोन फार मोठा दिसतोय तो लहान हवा होता, फाँट इथे बोल्ड करा असे बोलतो, अन् त्यात बदल करतो/करवतो... हे सर्व तो विविध गोष्टींची डिझाईन गृहीतके व स्वानुभव वापरून करत असतो. मानव संगणक संबंध हे संगणक विज्ञान आणि कला मानसशास्त्र या दोन्ही क्षेत्रांचा एक संकर आहे. हे संगणक आणि मानवांमधील संवादाचे डिझाईन आणि अभ्यास करते. आता यापुढे जाऊन संगणक जास्त बुद्धिमान होईल व काही गोष्टी आपोआप करेल ज्यायोगे यूजर (वापरकर्ता) जास्त चांगल्या प्रकारे डिजिटल उपकरणे वापरू शकेल. जर यूजरची उत्पादकता व सहभाग वाढवला, तर तो/ती वारंवार आपला प्रोग्रॅम वापरेल. हे साधारण टीव्हीच्या टीआरपी रेटिंगसारखेच आहे.

संगणकाच्या विविध स्वरूपांना मानवी स्पर्श (ह्युमन टच) प्रदान करायचे प्रयत्न अनेक वर्षे सुरू आहेत. तो दिवस फार दूर नाही जेव्हा डिजिटल उपकरणे कौटुंबिक सदस्यांपेक्षा जास्त आपल्या भावना अधिक जाणून घेतील. याला इमोशनल ए.आय. असेही म्हणतात. मानवी भावना समजण्यासाठी चेहरे, आवाज आणि शरीराच्या हालचाली, हावभाव याचा डेटा गोळा करून व त्याचे पृथक्करण करून वापरकर्त्याच्या मूड कसा आहे, याचे अनुमान आता संगणक सहज करू शकतो. ‘व्यक्ती तशा प्रकृती’. प्रत्येक व्यक्ती वेगळी असल्याने, एखाद्या व्यक्तीची एखाद्या परिस्थितीवर प्रतिक्रिया पण वेगळी असते. इमोशनल ए.आय.ची क्षमता अफाट आहे. सततच्या प्रगतीसह, आपण असे भविष्य पाहू शकतो जिथे संगणक व डिजिटल उपकरणे केवळ आमच्या भावनिक स्थितींनाच समजत नाही, तर चतुर वैयक्तिक साहाय्यकांपासून ते सहानुभूतीपूर्ण आरोग्यसेवा रोबोट्सपर्यंत आमचे दैनंदिन जीवन सुधारेल, अशा प्रकारे प्रतिसाद देऊ शकेल. तंत्रज्ञानाला अधिकाधिक मानवी चेहरा देण्याच्या या प्रयत्नांत रोबो मागे राहून चालणार नाही, असेही काहींचे मत आहे.

कारण हल्ली रोबोंचा वापर फक्त कारखान्यांमध्ये न होता वृद्ध वा आजारी व्यक्तींना मदत करणे, अपघातग्रस्तांना वाहनातून वा इमारतीच्या ढिगार्‍याखालून बाहेर काढणे अशा कामांसाठी, वैद्यकीय शस्त्रक्रियांमध्ये, एवढेच नाही तर स्वमग्न (ऑटिस्टिक) व्यक्तींचा साहाय्यक म्हणूनही होऊ लागला आहे! विविध क्षेत्रांमध्ये रोबोंचा वापर आणि वावर वाढतच जाणार असल्याने त्यांचा मानवांशी अधिक सुसंवाद असणे मानवाच्याही हिताचे आहे. कारण यामुळे संबंधित व्यक्तीचा मूड आणि गरजा जाणून घेणे रोबोला शक्य होईल. इमोशन ए.आय. हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक भाग आहे जी मानवी भावना आकलन करते, समजून घेते, अनुकरण करते आणि त्यावर प्रतिक्रिया देते. इमोशनल ए.आय. हे अनेक तंत्रज्ञानांचा वापर करून कार्य करते, ज्यात नैसर्गिक भाषा प्रक्रिया, मशिन लर्निंग आणि कॉम्प्युटर व्हिजन यांचा समावेश होतो.

नैसर्गिक भाषा प्रक्रिया

(NLP) : NLP तंत्रज्ञान मानवी भाषेचे विश्लेषण करण्यास सक्षम आहे. इमोशनल ए.आय.मध्ये, NLP चा वापर लेखन आणि भाषण या दोन्ही स्वरूपात असलेल्या भावनांच्या सूक्ष्म सूचनांचे विश्लेषण करण्यासाठी केला जातो. यात शब्द, वाक्यरचना आणि संदर्भ यांचा विचार केला जातो.

मशिन लर्निंग : मशिन लर्निंग अल्गोरिदमला विशाल डेटा सेटवर प्रशिक्षित केले जाते, ज्यात भावनांच्या विविध अभिव्यक्तींची उदाहरणे असतात. या प्रशिक्षण प्रक्रियेतून, अल्गोरिदम भावनांचे नमुने ओळखण्यास आणि त्यांचे वर्गीकरण करण्यास सक्षम होतात.

कॉम्प्युटर व्हिजन (द़ृष्टी) : कॉम्प्युटर व्हिजन तंत्रज्ञान द़ृश्य माहितीचे विश्लेषण करण्यास सक्षम आहे. इमोशनल ए.आय.मध्ये, कॉम्प्युटर द़ृष्टीचा वापर चेहर्‍याचे हावभाव, शारीरिक भाषा आणि इतर दृश्य संकेतांचे विश्लेषण करण्यासाठी केला जातो. या माहितीचा वापर भावना ओळखण्यासाठी केला जातो. उदा. राग, चिडचिड, हास्यविनोद, गंभीर असे विविध भाव आपला चेहरा दर्शवतो. त्यामुळे संगणक ओळखू शकतो आपला वापरकर्ता सध्या कुठल्या मन:स्थितीत आहे.

इमोशनल ए.आय. तंत्र अनेक ठिकाणी वापरलं जाऊ शकते ग्राहक सेवा : एजंटस्ना ग्राहकांच्या भावना समजून घेण्यास हे तंत्र मदत करू शकते, ज्यामुळे अधिक प्रभावी आणि संवेदनशील संवाद होऊ शकतो. हे ग्राहक समाधान सुधारू शकते. जर ग्राहकाला हवी ती माहिती पटकन कमी कष्टाने मिळाली, तर संतोषवृद्धी होते. त्याचे मत उत्पादन व उद्योगाबद्दल चांगले होते. मग व्यवसाय वृद्धी होते. अनेकदा असे म्हणतात जुना ग्राहक जर टिकला व वारंवार व्यवसाय (रीपिट ऑर्डर्स) द्यायला लागला, तर त्याचा लाभ (प्रॉफिट) जास्त असतो. त्यामुळे नवीन ग्राहक मिळवायचे प्रयत्न व त्याचा खर्च आपण कमी करू शकतो

मानसिक आरोग्य : मनोरुग्ण वैद्यकीय तज्ज्ञांना रुग्णांच्या भावनांचे अधिक चांगले निरीक्षण करण्यास मदत होऊ शकते. यामुळे अधिक प्रभावी निदान आणि उपचार योजना करण्यास मदत होऊ शकते. रुग्णाच्या व्यक्त होण्याच्या भावविश्वाचे व हालचालींचे निरीक्षण करून ए.आय. मनःस्थितीचे पृथक्करण (अ‍ॅनालिसिस) करू शकतो व डॉक्टरांना आपले प्राथमिक मत सांगू शकतो. (इथे एआय सहाय्यकाची भूमिका पार पडू शकता)

शिक्षण : शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या भावनांचे निरीक्षण करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे त्यांना शिकण्याच्या प्रक्रियेत अधिक चांगली मदत करण्यास सक्षम बनवते. विद्यार्थ्यांना काय समजलं आहे व काय नाही, याचा निष्कर्ष शिक्षकांना या तंत्राद्वारे कळू शकतो. विशेषतः ऑनलाईन शिक्षणात याचा उपयोग प्रभावी ठरू शकतो. अनेकदा ऑनलाईन शिक्षणात शिक्षकांना विद्यार्थ्यांना कितपत समजले आहे, याचा अंदाज घेणे अवघड जाते. हे काम पारंपरिक वर्गात लगेच कळते. (विशेषतः अनुभवी शिक्षकांना). विद्यार्थ्यांचे वर्तन, प्रतिसाद अशा भावनांचा तो संयोग असतो. कारण आपण शिक्षण मानवी विद्यार्थ्यांचे करत आहोत (ज्यांना भाव भावना आहेत). इथे ए.आय. शिक्षकांनी सहायक तंत्र म्हणून वापरले पाहिजे.

सोशल मीडिया मॉनिटरिंग : सोशल मीडियावर लोकांच्या भावनांचे विश्लेषण करण्यासाठी वापरले जाऊ शकते. डिजिटल मार्केटिंगसाठी हे एक प्रभावी माध्यम आहे. वापरकर्त्यांच्या पोस्ट, टिपण्या आणि प्रतिक्रियांचे विश्लेषण करून त्यांच्या भावनांचे निरीक्षण करणे. कोणत्या प्रकारचे कंटेंट सर्वाधिक भावनिक प्रतिसाद मिळवते हे समजून घेणे. वापरकर्त्याच्या भावनांच्या आधारे त्यांना व्यक्तिगत कंटेंट सुचवणे. उदाहरणार्थ, जर एखादा वापरकर्ता दुःखी वाटत असेल, तर त्याला प्रेरणादायी किंवा मनोरंजक कंटेंट सुचवणे. भावनांचे विश्लेषण करून अधिक मानवीय आणि संवेदनशील चॅटबॉट्स तयार करणे. वापरकर्त्यांच्या भावनांच्या आधारे त्यांना अधिक प्रभावीपणे व्यक्त होऊन मदत करणे. इमोटिव्ह ए.आय.चा सोशल मीडियामध्ये वापर हे एक प्रभावी तंत्र आहे जे उत्पादन (उद्योग) आणि वापरकर्त्यांना एकमेकांशी अधिक चांगल्या प्रकारे जवळ आणण्यास मदत करू शकते. या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत, तथापि, इमोशनल ए.आय.च्या वापराचे काही गंभीर दुष्परिणाम आपण लक्षात घेतले पाहिजेत. कुठलेही तंत्रज्ञान सुरीसारखे असते. (तुम्ही त्याचा वापर फळ कापण्यासाठी का जखम करण्यासाठी करणार, हे आपल्या हातात असते.)

ए.आय.च्या वापराचे दुष्परिणामासाठी उपाय गोपनीयता संरक्षण : वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी मजबूत नियम आणि कायदे तयार करणे.

पक्षपातीपणा कमी करणे : इमोशनल ए.आय. सिस्टीम्सला प्रशिक्षित करण्यासाठी वापरला जाणारा डेटा अधिक विविध आणि प्रतिनिधित्व करणारा असला पाहिजे.

नैतिक मार्गदर्शक तत्त्वे : इमोशनल ए.आय.च्या विकासासाठी स्पष्ट नैतिक मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे.

जबाबदारी : इमोशनल ए.आय. सिस्टीम्स विकसित करणार्‍या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांच्या वापरासाठी जबाबदार धरणे.

जागरूकता वाढवणे : लोकांना इमोशनल ए.आय.च्या फायद्यांबरोबरच त्याच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करणे.

ए.आय.च्या वापराचे काही प्रमुख दुष्परिणाम

गोपनीयतेचे उल्लंघन : इमोशनल ए.आय. सिस्टीम्स वापरकर्त्यांच्या भावनांचे विश्लेषण करतात, ज्यामुळे त्यांची गोपनीयता धोक्यात येऊ शकते. या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असते, जसे की भावनात्मक ब्लॅकमेलिंग. जर ही माहिती हॅक झाली व चोरट्यांच्या हाती गेली, तर अनर्थ घडू शकतो.

भावनात्मक हेरगिरी : इमोशनल ए.आय. सिस्टीम्स वापरकर्त्यांच्या भावनांचा वापर त्यांना प्रभावित करण्यासाठी करू शकतात. उदाहरणार्थ, खरेदी करण्यासाठी, मतदान करण्यासाठी किंवा विशिष्ट कृती करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी. एखादे उत्पादन नको असतानादेखील आपल्या गळ्यात मारले जाऊ शकते.

मानवी संबंधांवर परिणाम : इमोशनल ए.आय. सिस्टीम्सवर अत्याधिक अवलंबित्वामुळे मानवी संबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. लोकांमध्ये भावनात्मक कनेक्शन कमी होऊ शकते आणि एकमेकांशी संवाद साधण्याची क्षमता कमी होऊ शकते. आताच आपण हे घरोघरी पाहतो. हे प्रमाण ए.आय.मुळे वाढू शकते.

नैतिक समस्या : इमोशनल ए.आय. सिस्टीम्सच्या विकासाशी संबंधित अनेक नैतिक प्रश्न आहेत, जसे की भावनांचे कृत्रिमपणे निर्माण करणे योग्य आहे का? इमोशनल ए.आय. सिस्टीम्सला जबाबदारी आणि नैतिक निर्णय घेण्याची क्षमता असावी का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT