Perplexity AI big tech news Pudhari Photo
आर्टिफिशियल इंटेलिजन्स

Perplexity AI big tech news: टेक विश्वात खळबळ! Google क्रोम विकत घेण्यासाठी AI स्टार्टअप Perplexityची 34.5 अब्ज डॉलर्सची बोली

Perplexity AI Chrome purchase 2025 latest update: जाणून घ्या कोण आहेत, Googleला ऑफर देणारे PerplexityAIचे भारतीय वंशाचे CEO अरविंद श्रीनिवास?

मोनिका क्षीरसागर

तंत्रज्ञान विश्वात एका मोठ्या बातमीने खळबळ उडवून दिली आहे. भारतीय वंशाचे सीईओ अरविंद श्रीनिवास यांच्या परप्लेक्सिटी एआय (Perplexity AI) या कंपनीने थेट गूगलच्या सर्वात लोकप्रिय उत्पादनांपैकी एक असलेल्या 'गूगल क्रोम' ब्राउझरला विकत घेण्यासाठी तब्बल 34.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 3 हजार 450 कोटी रुपयांची महाकाय ऑफर दिली आहे. ही अनपेक्षित आणि धाडसी बोली अशा वेळी आली आहे, जेव्हा ओपनएआय (OpenAI) आणि इतर कंपन्यांसोबत एआय (Artificial Intelligence) क्षेत्रातील स्पर्धा शिगेला पोहोचली आहे.

काय आहे Perplexityची योजना?

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, Perplexity एआय स्टार्टअपने Googleला ही संपूर्ण रोख रकमेची (all-cash) ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे, परप्लेक्सिटीचे स्वतःचे मूल्यांकन 14 अब्ज डॉलर्सच्या आसपास असताना त्यांनी दुप्पटीहून अधिक रकमेची बोली लावली आहे. यावरून कंपनीचा आत्मविश्वास आणि भविष्यातील मोठी रणनीती दिसून येते. कंपनीने दावा केला आहे की, या व्यवहारासाठी अनेक मोठ्या फंडांनी संपूर्ण निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान देणगिदारांची नावे अद्याप उघड करण्यात आलेली नाहीत.

अल्पावधीतच Perplexityला मोठी प्रसिद्धी

परप्लेक्सिटीची (Perplexity) स्थापना 2022 मध्ये भारतीय वंशाच्या अरविंद श्रीनिवास यांनी अँडी कॉनविंस्की, डेनिस यारात्स व जॉनी हो यांच्यासोबत केली होती. या कंपनीने आपल्या संवादात्मक एआय सर्च इंजिनमुळे अल्पावधीतच मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.

Googleवरील दबाव आणि Perplexity AIसाठी संधी

Googleवर कायदेशीर दबाव वाढत असतानाच Perplexityने ही ऑफर दिली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने (US Justice Department) ऑनलाइन सर्चमधील बेकायदेशीर मक्तेदारीबद्दल गूगलवर खटला दाखल केला होता, ज्यात न्यायालयाचा निर्णय गूगलच्या विरोधात गेला आहे. या मक्तेदारीला आळा घालण्यासाठी गूगलला 'क्रोम' ब्राउझर विकावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच संधीचे सोने करण्यासाठी परप्लेक्सिटीने (Perplexity) ही मोठी उडी घेतली आहे. दरम्यान Googleने या निर्णयाविरोधात अपील करण्याची घोषणा केली असून, Google Chrome विकण्याचा कंपनीचा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट केले आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू झाल्यास ती अनेक वर्षे चालण्याची आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचण्याची शक्यता विश्लेषक व्यक्त करत आहेत.

Perplexity AIची आश्वासने

  • Google क्रोम विकत घेतल्यास, परप्लेक्सिटीने युजर्संच्या हितासाठी काही महत्त्वाची आश्वासने दिली आहेत:

  • ओपन-सोर्स: क्रोमचा मूळ असलेला 'क्रोमियम' कोड पूर्णपणे ओपन-सोर्स ठेवला जाईल.

  • गुंतवणूक: ब्राउझरच्या विकासासाठी पुढील दोन वर्षांत 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाईल.

  • सर्च इंजिन: युजर्संच्या सोयीसाठी क्रोमचे डीफॉल्ट सर्च इंजिन सेटिंग्ज बदलले जाणार नाहीत.

  • या योजनेमुळे "युजर्संच्या निवडीचे स्वातंत्र्य" (user choice) जपले जाईल आणि स्पर्धेसंबंधी चिंता कमी होईल, असा दावा कंपनीने केला आहे.

'या' शर्यतीत इतरही स्पर्धक

Google क्रोम विकत घेण्याच्या शर्यतीत परप्लेक्सिटी (Perplexity) एकटी नाही. ओपनएआय (OpenAI), याहू (Yahoo) आणि अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट (Apollo) यांसारख्या कंपन्यांनीही यात रस दाखवला आहे. डकडकगो (DuckDuckGo) या प्रतिस्पर्धी सर्च इंजिनच्या सीईओने तर क्रोमची संभाव्य विक्री किंमत किमान 50 अब्ज डॉलर्स असेल, असा अंदाज वर्तवला आहे.

कोण आहेत PerplexityAIचे भारतीय वंशाचे CEO अरविंद श्रीनिवास?

या धाडसी निर्णयामागे असलेले अरविंद श्रीनिवास हे चेन्नईत जन्मलेले आणि आयआयटी मद्रासमधून पदवी घेतलेले आहेत. परप्लेक्सिटी (PerplexityAI) सुरू करण्यापूर्वी त्यांनी गूगलमध्ये काम केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली परप्लेक्सिटीने जागतिक स्तरावर विस्तार केला आहे. मे 2025मध्ये कंपनीने भारती एअरटेलसोबत भागीदारी करून भारतातील 36 कोटी युजर्संना परप्लेक्सिटी प्रो' चे मोफत सबस्क्रिप्शन दिले होते.

Perplexity टेक जगतात आपले नाव कोरण्यासाठी सज्ज

परप्लेक्सिटीची (Perplexity) ही ऑफर अत्यंत धाडसी असली तरी, Google आपला सर्वात महत्त्वाचा आणि फायदेशीर ब्राउझर इतक्या सहजासहजी विकेल, अशी शक्यता कमी आहे. क्रोम (Chrome) हे गूगलच्या एआय (Google) रणनीतीचा एक अविभाज्य भाग आहे. मात्र, या एका बोलीमुळे अरविंद श्रीनिवास आणि त्यांच्या परप्लेक्सिटी कंपनीने जागतिक तंत्रज्ञान पटलावर आपले नाव कोरले आहे. एआयच्या (AI) या महायुद्धात एक नवा आणि महत्त्वाकांक्षी खेळाडू उतरला असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT