तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ए.आय. क्रांती ही सर्वव्यापी परिणामकारक आहे. या तंत्रज्ञानात अलीकडच्या काळात अफाट प्रगती झाली असून, येणार्या काळातही त्याचा विकास होत राहणार आहे. आज आरोग्यसेवेपासून वित्तसेवांपर्यंत आणि वकिली व्यवसायापासून फूड इंडस्ट्रीपर्यंत जवळजवळ प्रत्येक क्षेत्रावर ए.आय.ने प्रभाव टाकला आहे. तथापि, एक क्षेत्र जेथे ए.आय.ची क्षमता खर्या अर्थाने चमकू लागली आहे, ते म्हणजे अंतराळ संशोधन. जसजसे आपण कॉसमॉसमध्ये पुढे जात आहोत, अंतराळ प्रवास आणि संशोधनाची आव्हाने अधिक जटिल होत जाणार आहेत. अशावेळी उपग्रह तंत्रज्ञान, अंतराळवीर साहाय्य, ग्रहांचा शोध या प्रयत्नात ए.आय. हे एक अपरिहार्य साधन असल्याचे सिद्ध होत आहे.
उपग्रह हे आधुनिक अंतराळ संशोधनाचा कणा आहेत, जे हवामानाचा अंदाज, पृथ्वी निरीक्षण आणि दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण डेटा प्रदान करतात. पारंपरिकपणे, शास्त्रज्ञांच्या टीमद्वारे उपग्रह डेटावर प्रक्रिया करून, तिचा अर्थ लावून, पृथक्करण करून, विश्लेषण करून त्यातील निष्कर्षांनुसार, संकेतांनुसार अवलोकन केले जात असे. परंतु, ए.आय.मुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान आणि कार्यक्षम झाली आहे. दुसरीकडे ए.आय. उपग्रहांना अधिक स्मार्ट आणि अधिक स्वायत्त बनविण्यास मदत करत आहे. मशिन लर्निंग अल्गोरिदम वापरून, उपग्रह आता रिअल टाईममध्ये मोठ्या प्रमाणावर डेटाचे विश्लेषण करू शकतात, विसंगती शोधू शकतात आणि पृथ्वीवरील सूचनांची वाट न पाहता त्यांचे ऑपरेशन समायोजित करू शकतात. ही क्षमता प्रदीर्घ काळ चालणार्या अंतराळ मोहिमांसाठी विशेष महत्त्वाची आहे. कारण तेथे संप्रेषण विलंब लक्षणीय असू शकतो. उदाहरणार्थ ‘नासा’चा ऑर्बिटर ए.आय.चा वापर करून स्वायत्तपणे प्रतिमा कॅप्चर करण्यासाठी चंद्रावरील वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाची क्षेत्रे निवडण्यास सक्षम आहे. यामुळे मानवी निरीक्षणाची गरज लक्षणीयरीत्या कमी होते आणि डेटा संकलन प्रक्रियेलाही गती मिळते. ‘नासा’च्या पृथ्वी विज्ञान विभागातील पृथ्वीचे निरीक्षण करणारे उपग्रह दररोज पेटाबाईट डेटा तयार करतात. या डेटाचे अधिक जलद आणि कार्यक्षमतेने विश्लेषण करण्यात मदत करण्यासाठी ए.आय.चा वापर वाढत आहे. मशिन लर्निंग अल्गोरिदमला डेटामधील नमुने आणि ट्रेंड ओळखण्यासाठी प्रशिक्षित केले जात असल्याने निष्कर्षांचे आकलन गतिमान होते.
भारताचे ऐतिहासिक चांद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यामध्ये ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीदेखील मदत घेतली होती. विक्रम लँडरची स्थिती, गती आणि अल्टिट्यूड या सर्व गोष्टींना ए.आय. सेन्सर्सच्या माध्यमातून सांभाळण्यात आले. सोबतच, लँडरची चंद्राच्या पृष्ठभागापासून असणारी उंची मोजण्यासाठी देखील वेगळ्या ए.आय. सेन्सर्सचा वापर करण्यात आला. तर लँडर मॉड्यूलवर असणारे कॅमेरेदेखील ए.आय. पॉवर्ड होते. या सर्व ए.आय. सेन्सर्सने दिलेल्या डेटामुळे लँडरचे लोकेशन ट्रॅक करणं सुलभ झाले. यामुळेच लँडिंग सुरू असताना लाईव्ह फोटोज ‘इस्रो’ला मिळत होते. ‘चांद्रयान-3’च्या लँडिंगसाठी जागा निवडणे, योग्य जागेचा शोध घेणे, अनुकूल स्थिती नसल्यास पुढे जाऊन नवीन जागा शोधणे आणि कमांड मिळाल्यानंतर लँडिंगची प्रक्रिया सुरू करणे या सर्व गोष्टी लँडर मॉड्यूलने स्वतःच केल्या. यासाठीदेखील ए.आय.ची मदत घेण्यात आली. यासाठी ऑटोमॅटिक लँडिंग सीक्वेन्सचा वापर करण्यात आला. बंगळूरूमधील मिशन कंट्रोलने लँडिंगची सूचना दिल्यानंतर, विक्रम लँडरने स्वतःच सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. अंतराळातील विस्तीर्ण अंतरे आणि कठोर वातावरणामुळे रिअल-टाईम मानवी नियंत्रण अव्यवहार्य बनते, त्यामुळे अंतराळ यानाला कमीत कमी मार्गदर्शनासह स्वतंत्रपणे काम करणे आवश्यक असते. यामध्ये ए.आय. खूप मोठी भूमिका बजावते.
आज अवकाश संशोधनाच्या क्षेत्राच्या कक्षा रुंदावत आहेत. भारतानेच चांद्रयानाबरोबरच ‘मिशन आदित्य’द्वारे सूर्याला गवसणी घातली आहे. याखेरीज जगभरामध्ये एक्सोप्लॅनेटचा शोध घेतला जात आहे. सूर्यमालेच्या बाहेर अंतराळातही ग्रह अस्तित्वात असून त्यांना एक्सोप्लॅनेट म्हणतात. गेल्या वर्षी ‘नासा’ने अंतराळात सुमारे 5000 एक्सोप्लॅनेट असल्याची पुष्टी केली होती. मध्यंतरी आलेल्या एका वृत्तानुसार, या एक्सोप्लॅनेटचा शोध घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली असता ए.आय.ने केवळ एका तासात ही मोहीम फत्ते केली. संशोधकांनी सांगितले - तार्याभोवती तयार झालेल्या डिस्कमध्ये असलेला वायू - प्रोटोप्लॅनेटरी डिस्क पाहून ए.आय. त्याच्या सभोवताली एक्सोप्लॅनेट आहे की नाही, हे अचूकपणे ठरवू शकते. पारंपरिक तंत्रज्ञानाद्वारे सौर मंडळाशिवाय ग्रह अस्तित्वात आहेत, हे समजले असले तरी ए.आय.च्या मदतीने एक्सोप्लॅनेट नेमके कुठे आहे, हे शोधण्यात यश आले. ए.आय. मॉडेलने या ठिकाणी ग्रहाची उपस्थिती सांगितली. विश्लेषणाची अचूकता आणि वेळ कमी करण्यासाठी ए.आय. शास्त्रज्ञांना कशा प्रकारे मदत करू शकते, याचे हे उदाहरण आहे. ‘नासा’ची केपलर स्पेस टेलिस्कोप, ज्याने हजारो एक्सोप्लॅनेट शोधले, त्या दुर्बिणींमधून मिळालेल्या डेटाचे विश्लेषण करण्यात ए.आय. महत्त्वपूर्ण ठरले आहे.
2021 मध्ये मंगळावर उतरलेला ‘नासा’चा रोव्हर प्रगत ए.आय. अल्गोरिदमने सुसज्ज आहे. मंगळावरील कोणत्या भागात अभ्यास करायचा आणि नमुने गोळा करण्यासाठी त्याची साधने कशी वापरायची, हे सर्व पृथ्वीच्या सूचनांची वाट न पाहता ए.आय. ठरवतो. त्यामुळे ए.आय.चा वापर स्पेस रोबोटिक्समधील क्रांतिकारी झेप ठरला आहे. अवकाश यानाला स्वायत्तपणे त्याचा मार्ग समायोजित करण्यात आणि मोहिमेदरम्यान अनपेक्षित आव्हाने हाताळण्यास मदत करण्यासाठी ए.आय.चा वापर अत्यंत प्रभावी ठरत आहे. अंतराळ मोहिमेदरम्यान त्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी, सुरक्षितता प्रदान करण्यासाठी आणि प्रतिकूल वातावरणही त्यांची उत्पादकता कायम राखण्यात मदत करणारी ए.आय.प्रणीत साधने अंतराळवीरांना वरदान ठरत आहेत.
येत्या काही दशकांमध्ये मंगळावर नियोजित अशा दीर्घकालीन मोहिमांसाठी अंतराळ अधिवास निर्माण करण्यात ए.आय. तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ए.आय. लाईफ सपोर्ट सिस्टीमचा आकार कमी करू शकतो. तसेच ऑक्सिजन पातळी नियंत्रित करणे, तापमान नियंत्रित करणे यासारख्या कार्यांबरोबरच थेट मानवी हस्तक्षेपाशिवाय इतर पर्यावरणीय घटकांचे निरीक्षण करणे यामध्येही ए.आय.चे योगदान मोलाचे ठरणार आहे. अतिशय प्रतिकूल आणि अनिश्चित वातावरणात क्रूची सुरक्षा वाढवण्यात त्याचा हातभार हा अधिक महत्त्वाचा असणार आहे. अंतराळ संशोधनात बाह्य जीवनाच्या शोधात ए.आय.ची भूमिका सर्वांत महत्त्वाची ठरणार आहे. याचे कारण दुर्बिणी आणि स्पेस प्रोबद्वारे मिळालेल्या मोठ्या प्रमाणावरील खगोलशास्त्रीय डेटाचे विश्लेषण करून त्यातील संकेत ओळखण्यात ए.आय. मदत करू शकते.
लघुग्रह आणि इतर खगोलीय पिंडांमधून पाणी, खनिजे आणि दुर्मीळ धातू यांसारखी संसाधने काढणे हे आता केवळ वैज्ञानिक कल्पनेपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. या उदयोन्मुख उद्योगातही ए.आय. प्रभावी ठरत आहे. ए.आय. सुसज्ज स्वायत्त मायनिंग रोबोट लघुग्रहांचे सर्वेक्षण करू शकतात, त्यांच्या रचनांचे विश्लेषण करू शकतात आणि स्वायत्तपणे त्यातून मौल्यवान सामग्री काढू शकतात. ही संसाधने इंधन, बांधकाम किंवा अंतराळातील उत्पादनासाठी वापरली जाऊ शकतात. यामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमांचा खर्च कमी होईलच; पण मानवीक्षमता जिथे थिट्या ठरतात, ती अशक्य उद्दिष्टे गाठण्यात ए.आय. यशस्वी ठरताना दिसेल. अंतराळाच्या अफाट पसार्यातील अद्भुत आविष्कार, त्यातील गुंतागुंत, त्याबाबतचे गूढ, जटिल समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असणारी क्षमता व वेग ए.आय.मध्ये असल्याने भविष्यात विश्वाची रहस्ये उलगडण्यात ते मोठा भागीदार ठरेल. स्मार्ट उपग्रह आणि स्वायत्त रोव्हर्सपासून वैयक्तिक अंतराळवीर आरोग्य निरीक्षण आणि पृथ्वीबाहेरील जीवनाच्या शोधापर्यंत ए.आय. बहुपयोगी आणि बहुकार्यक्षम साधन म्हणून मोलाचे ठरणार आहे. जसजसे ए.आय. विकसित होत जाईल, तसतसा अंतराळ संशोधनात याचा वापर वाढत जाईल.