ए,आय. अर्थात कृत्रिम बुद्धिमता हा आता परवलीचा शब्द झाला असून, ही विज्ञानातील महाक्रांती आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात ए.आय.चे दूरगामी परिणामही झाले आहेत, होत आहेत आणि होणार आहेत. ए.आय.मुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल होऊ घातले आहेत.
सध्याचे युग हे विज्ञान, माहिती तंत्रज्ञानाचे युग समजले जाते. या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा विस्फोट झालेला आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात संगणकीकरण - कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रचंड प्रमाणात वापर होऊ लागला आहे. सुशिक्षित असो वा असुशिक्षित, हे देखील कळत नकळत अगदी बेमालूमपणे या तंत्रज्ञानाचा वापर तसेच अंगीकार करत आहेत.
आपल्या लक्षात येईल, की आता मोबाईलद्वारे तुम्ही अनेक बाबी करू शकता. तुम्हाला कोणतीही आवडती गोष्ट असल्यास तिची माहिती तत्काळ तुम्हाला उपलब्ध होते. जगाच्या पाठीवर कुठे, काय चालले आहे? याची माहिती उपलब्ध होते. प्रत्येक बाबीच्या संदर्भात अनेक तज्ज्ञांची मतं तुम्हाला उपलब्ध होतात, त्यातून स्वतःचा निष्कर्ष काढून तुम्ही स्वतःच्या संसाधनांचे प्रभावीरीतीने नियोजन करू शकता. तुम्हाला लाईट बिल भरण्यासाठी आता रांगेत उभे राहावे लागत नाही. बँकेत पैसे भरण्यासाठी, बँकेतून पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत नाही. कोणतीही वस्तू खरेदी करताना किंवा पैशाचा विनिमय करताना तुम्हाला सुट्ट्या पैशांची अडचण कधी येत नाही. तुमच्या खिशात पैसे नसले तरी देखील केवळ क्रेडिट - डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही व्यवहार पूर्ण करू शकता. हे क्रेडिट कार्डचे बिलदेखील तुम्ही ऑनलाईनच भरता. तुम्हाला एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जायचे असेल तर रिक्षा, मोटारसायकल, कार, रेल्वे, विमानसेवा याची माहिती, त्याचे बुकिंग तुम्ही घरबसल्या करू शकता. तुम्ही सिनेमाची तिकिटे घरबसल्या काढू शकता. हॉटेलमधील सीट घरबसल्या बुकिंग करू शकता. आपल्या आवडत्या माणसांशी संपर्क तुम्ही क्षणार्धात करू शकता. तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी गेला, तर तुमच्या मोबाईलवर तत्काळ तुम्हाला आवश्यक असलेली माहिती विनाविलंब आपोआप येते. तुमची एखाद्या विषयात रुची असेल, तर तुम्ही गुगल - यूट्यूब, उहरीं ॠझढ वर गेला तर तुमच्या आवडीच्या अनुषंगाने तुम्हाला माहिती पुरवली जाते.
वैद्यकीय सल्लादेखील ऑनलाईन उपलब्ध होतो. माणसाच्या रोगांचे निदान, शस्त्रक्रिया रोबोटमार्फत केल्या जातात. घरबसल्या अगदी भाजीपाल्यापासून ते कोणत्याही वस्तूची खरेदी तुम्हाला ऑनलाईन करता येते. अगदी साड्या - ड्रेस, चप्पल-बूट याची खरेदीदेखील घरबसल्या क्षणार्धात तुम्ही करू शकता. यासाठी तुम्हाला योग्य निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी तुलनात्मक माहिती ऑनलाईन उपलब्ध होते. त्यामुळे अत्यंत किफायतशीर भावात तुम्ही तुम्हाला आवडीच्या गोष्टीची खरेदी करता, तसेच घरबसल्या तुमच्या मालाची विक्रीदेखील करू शकता. शेती, दुग्ध व्यवसाय, पशुपालन, कृषिपूरक उद्योग यामध्येदेखील हे तंत्रज्ञान वरदान ठरत आहे. विविध अंगांनी याचा वापर प्रत्यक्षरीत्या शेती क्षेत्रात केला जात आहे.
हवामानाची माहिती ः हवामानाचा अंदाज, त्याचा पिकाच्या वाढीवर होणारा परिणाम, त्यापासून प्रतिबंधात्मक घ्यावयाची काळजी, करावयाच्या उपाययोजना, हवामानानुसार पिकाची, पिकांच्या जातींची निवड, योग्य पेरणी कालावधी, पेरणीची योग्य पद्धत याची माहिती मिळते. कृषी विभागास नेमकेपणाने गरज आधारित कृषी विस्तार कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करता येते.
पिकांचे सिंचन नियोजन : पानातील, जमिनीच्या पृष्ठभागावरील, जमिनीच्या खोलीवरील ओलाव्याबाबत सेन्सरद्वारे माहिती, यानुसार पिकाला कधी, किती, कसे पाणी द्यावयाचे याचे नियोजन, अंमलबजावणी करता येते. प्रत्येक थेंबाचा अधिक परिणामकारक वापर करता येतो.
जमिनीची आरोग्य तपासणी ः जलदगतीने जमिनीचे पृथक्करण , यात जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, जमिनीची पाणीधारण क्षमता, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, नत्र, स्फुरद, पालाश याची जमिनीतील उपलब्धता, यानुसार द्यावयाची खत मात्रा याचे प्रभावी नियोजन.
पिकांवरील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव ः हवामान परिस्थितीनुसार संभाव्य कीड रोगाचा प्रादुर्भाव, त्यावरील प्रतिबंधात्मक, नियंत्रणात्मक उपाययोजना याची माहिती मिळून अंमलबजावणी केली जात आहे. यांत्रिकीकरण, साठवणूक, बाजार व्यवस्था इत्यादी बाबींचे काटेकोर नियोजन करता येते. पिकाची वाढ, पीक परिस्थितीबाबत नेमकेपणाने मिळणारी माहिती, योग्यवेळी पिकाची काढणी, त्या आधारे पिकाचे होणारे उत्पादन याचा उत्कृष्टरीतीने अंदाज घेता येतो.
कृषी यांत्रिकीकरण ः कृषी क्षेत्रामध्ये रोबोटचा वापर, ड्रोन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने फवारणी.
पीकविमा ः पिकाची गुणवत्ता व ट्रेस्साबिलिटी यासंदर्भातली सुलभरीतीने माहिती. पुरवठा साखळीचे परिणामकारक नियोजन, पिकाची साठवणूक, शीत साखळी व्यवस्थापन, बाजार व्यवस्थेची संलग्नता, मागणी पुरवठा नियोजन, किमतीबाबतचा अंदाज.
सुलभरीत्या ऑनलाईन विक्री सुविधा ः दुग्ध व्यवसाय, पशुपालन, कृषिपूरक उद्योग संबंधित नेमकेपणाने नियोजन, अंमलबजावणी बाबत या तंत्रज्ञाचा वापर होत आहे.
कृषिपूरक उद्योग : कृषिपूरक उद्योगांची निर्मिती क्षमता, संधी, धोरणात्मक उपाययोजना, कच्च्या मालाची उपलब्धता, कृषी प्रक्रिया योजनांचा लाभ, बँक कर्ज प्रकरणे, मालाची साठवणूक, विक्री, प्रशिक्षण या बाबी प्रभावीरीतीने करता येऊ लागल्या आहेत.
शेतीसंदर्भात प्रश्नांची नेमकी मिळणारी उत्तरे ः यामुळे आपली निर्णय क्षमता प्रचंड वाढली असून, त्याद्वारे उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करत उत्पादन खर्चात 30 ते 40 टक्के कपात होऊन निव्वळ उत्पन्नांत भरीव वाढ होत आहे. जागतिक संधींचा लाभ घेता येत आहे. या बाबी केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शक्य आहेत.
थेट लाभ हस्तांतरण योजना : अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी एकाच ठिकाणी नोंदणी, एकाच ठिकाणी एकच अर्ज, ऑनलाईन लॉटरी, अर्ज संमती, कागदपत्रे तपासणी, अनुदान वितरण हे Online होऊ लागले. यामुळे योजनांचे प्रभावी नियोजन, अंमलबजावणी शक्य झाली. शेतकर्यांचा वारंवार प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळा अर्ज करणे, पुन्हा पुन्हा तीच तीच कागदपत्रे सादर करणे, त्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात जाणे हे टाळले गेले. आपल्या अर्जाची स्थिती ेOnline ते बघू लागले. अनुदान ेonline त्याच्या बँक खात्यात जमा होऊ लागले.
पीकविमा योजना : यात अर्ज करताना जमीनधारणा क्षेत्र पडताळणी ऑनलाईन होऊ शकल्यामुळे यातील फसवणुकीचे प्रमाण अत्यंत कमी झाले. यामुळे एक महिना कालावधीत 1 कोटी 70 लाख विमा अर्ज शेतकरी करू शकले. एका दिवसात जवळपास 6 ते 7 लाख पीकविमा अर्ज केवळ कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे शक्य झाले. हे पारंपरिक पद्धतीने केवळ 15 ते 20 हजार शक्य होते.
पीकविमा योजनेमध्ये राज्यात शेतकर्यांनी जवळपास 88 लाख नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पीक नुकसानीच्या सूचना दिल्या. त्याची माहिती केवळ कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे शक्य झाली आहे. पीकविमा योजनेत सहभाग घेणे. नुकसानीच्या सूचना देणे. नुकसानीचे सर्वेक्षण करणे, नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करणे, नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकर्यांच्या खात्यावर जमा करणे हे शक्य झाले आहे. खरीप 2023 हंगामात जवळपास 1 कोटी 13 लाख विमा अर्जदारांची आपण 7498 कोटी नुकसानभरपाई बँक खात्यावर जमा करू शकलो.
पिकाचे तांत्रिक उत्पादन निश्चिती : भात, सोयाबीन, कापूस, गहू पिकांच्या उत्पादनाचे अंदाज आता महसूल मंडळ स्तरावर उपग्रह - तांत्रिक पद्धतीने आपण काढून पीकविमा नुकसानभरपाई निश्चितीसाठी वापरात आहोत. ते तत्काळ उपलब्ध होतात.
नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसानीचे सर्वेक्षण आणि लाभ देणे : पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानची पडताळणी नेमकेपणाने करता येऊ लागली. ऊळसळींरश्र सर्व्हे करता येतात. माहिती जलदगतीने तयार होऊन मदत तत्काळ देणे शक्य झाले आहे.
प्रभावी अनुदान - साहाय्य वाटप : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना यात राज्यातील जवळपास एक कोटी लाभधारकांना त्यांच्या बँक खात्यामध्ये मदतीची एकावेळी साधन रु.4000 कोटी रक्कम क्षणार्धात दिली जात आहे.
कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना मदत वाटप : खरीप 2023 हंगामात कापूस -सोयाबीन लागवड केलेल्या शेतकर्यांना आपण सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये अत्यंत अल्पकालावधीत ई पीक पाहणी नोंदीच्या आधारे थेट बँक खात्यावर मदत वाटप केली. जवळपास 68 लाख शेतकर्यांना त्यांच्या बँक खात्यावर 2600 कोटींची मदत जमा करता आली.
क्रॉप्सअपसारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून पिकांवरील कीड रोगाचे सर्वेक्षण आधारित शेतकर्यांना नेमकेपणाने सल्ला त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होतो. यामुळे रासायनिक कीड नाशकांचा वापर कमी झाला. शेतकर्याचा उत्पादन खर्च कमी झाला, वातावरणाचे प्रदूषण कमी झाले. आरोग्यविषयक समस्या कमी झाल्या.
Online app द्वारे पशु गणना : राज्यात Online app द्वारे पशुगणना होत असल्याने, पशूंची माहिती जलद आणि नेमक्यापणाने उपलब्ध होत आहे. यामुळे पशुखाद्य आणि इतर पायाभूत सुविधा निर्मिती, वापर प्रभावीरीतीने केला जात आहे.
दुग्ध व्यवसाय : याबाबत दूध देणारी जनावरे, होणारे दूध उत्पादन, दूध उत्पादनात वाढ करण्याच्या द़ृष्टीने करावयाच्या नेमक्या उपाययोजना, मागणीप्रमाणे पुरवठा, प्रक्रिया याद़ृष्टीने नियोजन, दूध भेसळीस प्रतिबंध घालणे शक्य झाले आहे.
शासकीय निधीचा गैरवापरावर नियंत्रण : शासकीय निधीचा होणारा गैरवारप, फसवणूक याला प्रभावीरीत्या आळा घातला जात आहे.
राज्यात महाग्रीटेक प्रकल्पांतर्गत पिकांखालील पेरणी क्षेत्र, पिकांच्या पेरणीचा अहवाल, पीक परिस्थिती, कीड रोगांची माहिती, हवामानाची परिस्थिती, त्याचा पिकांवर होणारा परिणाम, त्या अनुषंगाने शेतकर्यांनी प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक करावयाची उपाययोजना याची मोबाईल एसएमएस, youtube चॅनल, टेलिग्राम, इंस्टाग्राम, फेसबुक या माध्यमाच्या साहाय्याने प्रभावीरीतीने दिली जाते. पिकांची काढणी, साठवणुकीच्या सुविधा, प्रक्रिया सुविधा याबाबतची माहिती प्रभावीरीत्या उपलब्ध होऊ शकली. किमान आधारभूत किमतीवर आधारित खरेदीचे नियोजन हे करता येऊ शकले. थेट लाभ हस्तांतरण, कृषिविषयक सर्व योजनांसाठी एका ठिकाणी अर्ज सुविधा, त्याची ऑनलाईन लॉटरी, दिले जाणारे संमतीपत्र, कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी, शेतकर्याला तातडीने दिली जाणारी मदत या सगळ्या बाबीचे नियोजन केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे प्रभावीरीत्या केले जात आहे.
या क्रांतिकारी युगाचा कृषी, दूध व्यवसाय, पशुपालन, कृषिपूरक उद्योगांना मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. यात अमर्याद संधी आहेत. यातून शेतकर्यांचे उत्पन्न वाढीसाठी आणि त्याचे जीवनमान सुधारण्यासाठी हे तंत्रज्ञान निश्चित वरदान ठरत आहे.