ए.आय. आणि प्रसिध्दी माध्यमे  Pudhari File Photo
आर्टिफिशियल इंटेलिजन्स

ए.आय. आणि प्रसिध्दी माध्यमे

पुढारी वृत्तसेवा
सचिन बनछोडे

सध्याचा काळ हा रोबो, नॅनोटेक्नॉलॉजी, थ्री-डी प्रिंटिंग, ड्रोन आणि ए.आय. म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे. मानवी बुद्धी हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. या मानवी बुद्धीनेच आता ही कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केली आहे. जॉन मॅककॅर्थी ए.आय.चे जनक म्हणून जगभर ओळखले जातात. कोणत्याही तंत्रज्ञानाचा किंवा शक्तीचा वापर हा वापरकर्त्याच्या चांगल्या किंवा वाईट हेतूवर अवलंबून असतो. खुद्द मॅककॅर्थी यांनीच ए.आय.चा वापर चांगला होऊ शकतो किंवा त्याचा दुरुपयोगही होऊ शकतो, असे म्हटले होते. ‘एएक्सए’ या इन्श्युरन्स कंपनीने ‘फ्युचर रिस्क रिपोर्ट 2023’मध्ये ए.आय.ला जगातील सर्वात मोठी चौथी चिंता ठरवले होते. डीपफेक तंत्रज्ञान हे ए.आय.वरच आधारित आहे. त्याचा कसा दुरुपयोग केला जातो, हे अनेक कलाकारांच्या फेक व्हिडीओंमुळे दिसून आले.

मात्र, ए.आय.चा मानवी लाभासाठी फार मोठा वापर होऊ शकतो, याकडे अधिक लक्ष पुरवणे ही काळाची गरज आहे. ए.आय.कडे सर्वसामान्यांचे अधिक लक्ष गेले ते ओपन ए.आय.च्या चॅट जीपीटी या चॅटबॉटमुळे. गुगलचे ‘जेमिनी’, मायक्रोसॉफ्टचे ‘कॉपीलॉट’, अँथ्रोफिक्सचे ‘क्लाऊड’ यासारखे अनेक चॅटबॉट लोकांचे लक्ष वेधून घेऊ लागले. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्याची क्षमता असलेले हे चॅटबॉट एखाद्या ‘सर्वज्ञ मार्गदर्शका’सारखेच वाटू लागले. अर्थातच, त्यांच्या संग्रही असलेल्या माहितीच्या आधारे ते उत्तरे देत असतात व ही माहिती अचूक आहे, असे गृहीत धरले जाते. त्यामुळे कधी कधी उत्तरात त्रुटी किंवा चुकाही असू शकतात. ए.आय.चा वापर शैक्षणिक क्षेत्रापासून वैद्यकीय क्षेत्रापर्यंत, अभियांत्रिकी क्षेत्रापासून अंतराळ विज्ञानापर्यंत अनेक ठिकाणी होऊ लागला आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमेही या जगद्व्याळ तंत्रापासून अलिप्त राहू शकत नाहीत!

ए.आय.चा मानव जातीसाठी सर्वात चांगला उपयोग ज्या काही क्षेत्रांसाठी होऊ शकतो, त्यामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्राचाही समावेश आहे. अमेरिकेतील नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीतील संचार अध्ययन आणि कॉम्प्युटर विज्ञानाचे सहायक प्राध्यापक निकोलस डायकोपोलोस यांनी म्हटले होते की, जगभरातील न्यूजरूममध्ये ए.आय.बाबतची स्वीकार्हता आणि जागरूकता वाढलेली दिसून येते. ए.आय.मुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्या प्रकारच्या नोकर्‍यांची संधी निर्माण होतील. काही नोकर्‍या पारंपरिक रिपोर्टिंगसारख्या नव्हे, तर अधिक तंत्रज्ञानात्मक कामाच्या असतील. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने पत्रकारितेमध्ये ए.आय.च्या माध्यमातून नवे प्रयोग करण्यासाठी एक शोध आणि विकास प्रयोगशाळाच सुरू केलेली आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रा. डायकोपोलोस यांच्याच सहयोगाने वृत्त शोध उपकरणांचा प्रयोग सुरू केला आहे. काही अ‍ॅकॅडमिक कामेही झालेली आहेत, त्यामध्ये ‘मशिन आणि मीडिया’ तसेच ‘कम्प्युटेशन अँड जर्नालिझम सिम्पोजियम’ची स्थापना झालेली आहे. कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने थ्री-डी द़ृश्यांसह खेळांचे कव्हरेज करण्यासाठी कॉम्प्युटर व्हिजन आणि ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर करण्याची योजना बनवून ठेवली होती. वास्तविक वेळेतच टी.व्ही. प्रेक्षकांचा आनंद वाढवण्यासाठी ए.आय.चा वापर करण्याची योजना होती. अ‍ॅथलिटस्च्या लाईव्ह कामगिरीदरम्यानच त्यांच्या वेगवेगळ्या पैलूंसंबंधी प्रेक्षकांना अधिक माहिती पुरवण्यासारख्या गोष्टी यामध्ये आहेत.

प्रा. निकोलस डायकोपोलोस यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका टीमच्या सहयोगाने 2020 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी एक वृत्त शोध उपकरण विकसित केले होते. संपूर्ण अमेरिकेतील लाखो नोंदणीकृत मतदारांचा डेटासेट बनवून वेगवेगळ्या स्थानांशी निगडित माहिती मिळवणे आणि मतदारांमधील जनसांख्यिकीय प्रवृत्ती समजून घेण्याचा प्रयत्न यामधून करण्यात आला. प्रा. डायकोपोलोस आणि त्यांच्या शोध प्रयोगशाळेकडून एक उपकरण बनवले जात आहे, ज्याच्या साहाय्याने पत्रकारांना अ‍ॅल्गोरिदमच्या माध्यमातून अमेरिकन सरकारशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी मदत मिळेल. दर आठवड्याला स्वयंचलित रूपाने अलर्ट देण्यासाठी यामध्ये टूल सेट केले जाऊ शकते. ते आपल्याला सांगेल की, गेल्या आठवड्यात आठ नवे अल्गोरिदम मिळाले, जे आपल्या आवडीशी किंवा हव्या असलेल्या गोष्टींशी निगडित आहेत. नऊ पत्रकारांनी या टूलचे परीक्षणही केले होते.

2019 मध्ये ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ने पत्रकारिता आणि ए.आय.बाबतचे एक वैश्विक सर्वेक्षण प्रकाशित केले होते. हा रिपोर्ट 32 देशांच्या 71 मीडिया संस्थांकडून घेतलेल्या माहितीवर आधारित होता. त्याचा एक निष्कर्ष असा होता की, ए.आय.मुळे पत्रकारितेला एक गतिशील रूप मिळेल. त्याचा दीर्घकालीन संरचनात्मक प्रभावही पडेल. रिपोर्टिंगची वैविध्यता, लोकशाही आणि जनहितावरही त्याचा सखोल प्रभाव पडेल. ए.आय.मध्येही पत्रकारितेत मोठे बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. त्याच्या माध्यमातून व्यापकस्तरावर वाचकांशी जोडले जाण्याच्या नव्या पद्धती समोर येतात. ए.आय.मुळे कोणतीही माहिती अधिक कुशलतेने शोधण्याची आणि अधिक चांगली माहिती मिळवण्याची शक्यता वाढते. मात्र, या शक्तीबरोबरच जबाबदारीही येतेच! त्यामध्ये व्यक्तिगत अधिकार व स्वातंत्र्याचे रक्षण यांचा समावेश होतो.

इंटेलिजंट मशिन्समुळे पत्रकारांच्या रिपोर्टिंगला अधिक सरस बनवता येऊ शकते. त्यांची रचनात्मकता आणि वाचक-प्रेक्षकांना जोडण्याची क्षमता वाढू शकते. एआयच्या आधारे एखाद्या डेटा पॅटर्नला समजण्यासाठी पूर्वानुमानाचा उपयोग केला जाऊ शकतो. तसेच या पॅटर्नमधील बदलांना समजून घेणेही आता शक्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT