who is sant janabai  Pudhari photo
फीचर्स

Ashadhi Ekadashi 2026: थोर संतकवयित्री जनाबाई कोण होत्या?

Ashadhi Ekadashi 2026: थोर संतकवयित्री जनाबाई कोण होत्या?

पुढारी वृत्तसेवा

- अनुराधा चंद्रशेखर भडसावळे

anu.bhadsavle@gmail.com

पहाटेच्या निरव शांततेची वेळ होती. पंढरपूर अजून पूर्ण जागं झालेलं नव्हतं. चंद्रभागेच्या काठावर धुक्याची हलकी चादर पसरली होती. पण संत नामदेवांच्या घराच्या एका कोपऱ्यात जात्याची मंद घरघर सुरू झाली होती.

जनाबाईंचे हात जात्यावर सराईतपणे फिरत होते आणि ओठांवर अखंड विठ्ठलनाम होतं. इतक्यात नामदेव महाराज जागे झाले. जात्याचा आवाज त्या दिवशी त्यांना काहीसा वेगळा वाटला. त्यांनी हळूच दाराआडून पाहिलं... आणि थक्क झाले.

जात्यावर जनी एकटी नव्हती. तिच्या शेजारी सावळा, सुंदर पांडुरंग बसला होता. एका हाताने तो जातं फिरवत होता, तर दुसऱ्या हाताने जनीच्या अभंगाला स्वर देत होता. त्या क्षणी जनाबाईंच्या मुखातून सहज शब्द उमटले-

एकलीच गातां । दुजा साद उमटतां ।

खूण कळली नामदेवा । विठ्ठल श्रोता जनीच्या भावा ॥

ही आख्यायिका इतिहास नसली, तरी जनाबाईंच्या भक्तीचं सार सांगते. त्यांनी देवाला गाभाऱ्यातून बाहेर काढून आपल्या दैनंदिन श्रमांत सहभागी करून घेतलं. हात कोणतेही काम करत असले तरी मन जर विठ्ठलाच्या चरणी असेल, तर प्रत्येक क्षण पूजेसमान होतो आणि प्रत्येक कर्म भक्तीचा उत्सव बनतो.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे जन्मलेल्या जनाबाई लहानपणीच संत नामदेवांच्या घरी आल्या. दळण, कांडण, पाणी भरणं, झाडलोट, स्वयंपाक अशी संसारातील कामं करतानाच त्यांना संतांचा सहवास लाभला. त्या प्रेमाने स्वतःचा उल्लेख "नामयाची जनी" असा करतात.

जनी जाय पाणियासी । मागे धावे हृषीकेशी ॥

भक्त देवामागे धावतो, ही आपली समजूत. पण जनाबाईंच्या भक्तीत चित्र उलटं आहे. इथे देवच भक्ताच्या मागे धावत आहे.

एकदा रात्रभर जनीसोबत जात्यावर दळण दळताना पहाट झाली. विठ्ठल घाईघाईने मंदिरात परतला; पण गडबडीत स्वतःचा भरजरी शेला जनीच्या घरीच राहिला आणि तिची ठिगळांनी भरलेली वाकळ अंगावर घेऊनच राऊळात पोहोचला.

सकाळी पुजाऱ्यांनी देवाच्या अंगावर ती फाटकी वाकळ आणि पिठाचे डाग पाहिले. मंदिरात एकच गोंधळ उडाला. या प्रसंगाचे अत्यंत सुंदर काव्यमय चित्रण साहित्यिक श्री. दि. इनामदार यांनी "वाकळ" या कवितेत केले आहे-

पीठ शेल्याला लागले । झाला राऊळी गोंधळ ।

कुण्या घरचे दळण । आला दळून विठ्ठल ॥

त्या पिठाचा सुगंधही वेगळाच होता. ते झटकून, धुऊनही निघेना. कारण ते साधं पीठ नव्हतं; ते भक्तीचं प्रसादपीठ होतं.

जनाबाईंसाठी विठ्ठल हा दूरचा देव नव्हता. तो घरातला होता. म्हणूनच त्या म्हणतात-

देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो वैकुंठ ॥

देवाला वैकुंठाचं वैभव नव्हे, तर भक्ताचा निर्मळ भाव प्रिय असतो. म्हणून तो जनीसोबत जात्यावर बसतो.

त्यांच्या दृष्टीने श्रम हीच साधना होती.

दळण्याच्या भिषें । विठ्ठल सावकाशें । देहबुद्धीचें वैरण । द्वैत खडा रे निसून ॥

जात्यावर धान्याबरोबर अहंकारही भरडला जातो. देहाभिमान विरघळतो, द्वैत नाहीसं होतं आणि उरतं ते फक्त विठ्ठलनाम. तेराव्या-चौदाव्या शतकातील संतांच्या तेजस्वी मांदियाळीत ज्ञानेश्वर, नामदेव, चोखामेळा, सावता, गोरा, सेना, नरहरी यांच्याबरोबर जनाबाईंचं स्थानही तितकंच मानाचं आहे. श्रमालाच भक्तीचं रूप देणारी त्या एकमेव संतकवयित्री ठरतात.

जनाबाईंच्या नावावर परंपरेनुसार सुमारे साडेतीनशे अभंग मानले जातात. विठ्ठलभक्तीने ओथंबलेले त्यांचे अभंग आजही महाराष्ट्राच्या घराघरांत तितक्याच प्रेमाने गुणगुणले जातात.

अखेर, ज्या पांडुरंगाला त्यांनी आयुष्यभर हृदयात जपलं, त्याच्याच चरणी परंपरेनुसार इ.स. १३५० च्या सुमारास पंढरपुरात त्यांनी देह ठेवला. मात्र "नामयाची जनी" हे नाव आणि त्यांची निरपेक्ष प्रेमभक्ती मराठी संतसाहित्यात कायमची अजरामर झाली.

पंढरीच्या राण्यालाच आपल्या प्रेमाच्या बळावर घरात, श्रमात आणि हृदयात कायमचं स्थान देणाऱ्या "नामयाच्या जनी" त्या थोर संतकवयित्रीच्या चरणी माझा साष्टांग प्रणाम.

जय जय विठ्ठल! जय हरी विठ्ठल! जय जय विठ्ठल! जय हरी विठ्ठल!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT