आधुनिक काळात वापरला जाणारा 'डबल पॉलिश्ड' तांदूळ फायबरमुक्त असतो. फायबर नसल्यामुळे पोट लवकर भरत नाही आणि गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेतल्या जातात.
International Women’s Day | Women’s Health
मुंबई : घरच्यांच्या आवडीनिवडी सांभाळताना महिलांचे स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करणे ही भारतातील परंपराच झालेली आहे. यातूनच स्थूलतेला आमंत्रण मिळते. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्याचा विचार करताना भारतीय महिलांमध्ये 'स्थूलता' (Obesity) ही एक गंभीर समस्या म्हणून समोर येत आहे. 'नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे' च्या आकडेवारीनुसार, भारतीय महिलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत वेगाने वाढत असल्याचे स्पष्ट करते. आहारात भाताचे प्रमाण आणि लठ्ठपणा याचा कसा संबंध आहे याविषयी माहिती घेवूया...
भारतीय आहारपद्धतीत, विशेषतः महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांध्ये आणि दक्षिण भारतात भात हा मुख्य घटक आहे. भातामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याचे अतिसेवन शरीरात अतिरिक्त ऊर्जा (कॅलरीज) साठवण्यास कारणीभूत ठरते. आधुनिक बैठी जीवनशैली आणि शारीरिक व्यायामाचा अभाव असल्यामुळे या ऊर्जेचा वापर होत नाही, ज्याचे रूपांतर चरबीमध्ये होऊन लठ्ठपणा वाढतो. विशेषतः 'पॉलिश' केलेल्या पांढऱ्या तांदळाचा Glycemic Index जास्त असल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते, ज्यामुळे वारंवार भूक लागते आणि वजन वाढण्यास मदत होते.
भात आणि स्थूलता यांचा संबंध शोधताना संशोधकांनी काही महत्त्वाचे निष्कर्ष मांडले आहेत. संशोधनानुसार, पांढऱ्या तांदळात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असल्याचे सांगतो. त्यामळेच अतिप्रमाणात पांढरा भात खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते, ज्यामुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढते आणि मेद (Fat) साठण्यास सुरुवात होते.
आधुनिक काळात वापरला जाणारा 'डबल पॉलिश्ड' तांदूळ फायबरमुक्त असतो. फायबर नसल्यामुळे पोट लवकर भरत नाही आणि गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेतल्या जातात.
संशोधनानुसार, जर शारीरिक हालचाल कमी असेल आणि आहारात भाताचे प्रमाण जास्त असेल, तर 'विसेरल फॅट' (पोटाचा घेरा) वाढण्याचा धोका भारतीय महिलांमध्ये २५% जास्त असतो.
वैद्यकीय संशोधनानुसार, भात हा ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. तो पूर्णपणे बंद केल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होऊ शकते. समस्या तांदळात नाही, तर त्याच्या 'ग्लायसेमिक इंडेक्स' मध्ये आहे.
पांढरा तांदूळ : याचा GI जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते आणि इन्सुलिनची पातळी वाढून चरबी साठते.
भात पूर्णपणे बंद करण्यापेक्षा त्याचा प्रकार बदलणे आणि प्रमाण नियंत्रित करणे हा उत्तम मार्ग आहे.
संशोधनानुसार, भारतीय महिलांच्या आहारात कर्बोदकांचे प्रमाण अधिक आणि प्रथिनांचे (Proteins) प्रमाण कमी असते. त्यातच शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे खाल्लेल्या भातातील ऊर्जेचा वापर होत नाही आणि त्याचे रूपांतर चरबीत होते.
भात खायचा असेल, तर पांढऱ्या तांदळाऐवजी 'ब्राऊन राइस' (Brown Rice) किंवा 'हातसडीचा तांदूळ' निवडा. यात फायबर जास्त असल्याने साखर हळूहळू वाढते.
भात रात्रीच्या ऐवजी दुपारी खाणे अधिक योग्य आहे. ताटात भाताचे प्रमाण १/४ असावे, तर अर्धे ताट भाज्यांनी भरलेले असावे.
तांदूळ कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा त्याचे 'पेज' (पाणी) काढून शिजवल्यास त्यातील अतिरिक्त स्टार्च कमी होतो, ज्यामुळे कॅलरीज कमी होतात.
भात नेहमी वरण, कडधान्ये किंवा भरपूर भाज्यांसोबत खावा. यामुळे अन्नाचा एकूण 'ग्लायसेमिक लोड' कमी होतो आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते.
"नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन" (NIN) नुसार, समतोल आहार हाच आरोग्याचा पाया आहे. भात हा शत्रू नसून, त्याचे मर्यादित प्रमाण आणि सोबतीला नियमित व्यायाम असल्यास स्थूलता सहज टाळता येते.
'जर्नल ऑफ ओबेसिटी'मधील एका संशोधनानुसार, महिलांनी आठवड्यातून किमान दोनदा हलके वजन उचलण्याचे व्यायाम केल्यास त्यांचा मेटाबॉलिझम वाढतो आणि हाडांची घनता (Bone Density) सुधारते.
योगासने: पोटाची चरबी कमी करण्यासाठी धनुरासन, भुजंगासन आणि नौकासन अत्यंत प्रभावी मानले जातात. संशोधनानुसार, योगामुळे 'कोर्टिसोल'ची पातळी कमी होऊन वजन नियंत्रणात राहते.
दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे जलद चालण्याने हृदयविकाराचा आणि मधुमेहाचा धोका महिलांमध्ये ४०% नी कमी होतो.