Raju Baviskar Pudhari
फीचर्स

Raju Baviskar Interview | 'काळ्यानिळ्या रेषा' हा वेदनेकडून प्रकाशाकडे नेणारा प्रवास

चित्रकार, लेखक राजू बाविस्कर : साहित्य अकादमी पुरस्कार स्वीकारल्यानंतर 'पुढारी'शी साधला संवाद

पुढारी वृत्तसेवा

Kalya Nilya Resha Sahitya Akademi Award

नवी दिल्ली: लेखक आणि प्रख्यात चित्रकार राजू बाविस्कर यांना नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या "काळयानिळ्या रेषा" या आत्मकथेसाठी हा पुरस्कार मिळाला. परिस्थितीचे काळेनिळे वळ सोसत प्रख्यात चित्रकार म्हणून उदयास आलेले राजू बाविस्कर आत्मकथा लिहितात आणि या साहित्यकृतीचा साहित्य अकादमी पुरस्काराने गौरव करण्यात येतो, हा थक्क करणारा प्रवास आहे. हा प्रवास पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर विशेष मुलाखतीतून 'दै. पुढारी'चे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत वाघाये यांनी उलगडला आहे.

1. कलाशिक्षक, चित्रकार ते लेखक या प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली? आणि “आपण लिहिलं पाहिजे” असं पहिल्यांदा केव्हा वाटलं?

चित्रकला हा माझा मूड पिंड आहे. खूप काळानंतर मी लिखाण केलं. गेली ३० - ३५ वर्षे मी चित्र काढतोय. लोकांचं रोजचं जगणं, संघर्ष मी चित्रातून मांडायचो. चित्र काढत असताना थोडंफार लिहायचो. काही वर्तमानपत्रातही माझं सदर होतं. प्रफुल शिलेदार यांनी एकदा माझं प्रदर्शन बघितलं आणि तुझी चित्रं बोलकी आहेत, हे चित्र म्हणजे तुझं जगणं वाटतं. हे शब्दबद्ध झाले पाहिजेत, असं सुचवलं आणि लेखन प्रवास सुरू झाला, असं म्हणता येईल.

2. एक प्रख्यात चित्रकार म्हणून ओळख असताना लेखन, त्यातही आत्मकथा लिहिण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कुठून मिळाली?

खरं मी देखील हा विचार करतो. कदाचित मला चित्रात व्यक्त होण्यासाठी काही वेळा मर्यादा आल्या असाव्या. माझ्या मनात जे चित्र उतरवायचं आहे ते शब्दात मी आणखी उत्तम मांडू शकतो आणि व्यक्त होऊ शकतो. तिथे मला अधिक जागा मिळेल आणि चित्रांच्या व्यतिरिक्त माझं आवडतं माध्यम हे साहित्य आहे आणि मग तसं मी लिखाणाकडे वळलो. त्यातून "काळयानिळ्या रेषा" या साहित्यकृतीचा जन्म झाला.

3. तुमच्या आयुष्यातील माणसं आणि त्यांनी सुचवलेली पुस्तकं यांनी तुमच्यातला कलाकार आणि लेखक घडवण्यात किती महत्त्वाची भूमिका बजावली?

मी नोकरीत लागलो त्या शाळेत निळकंठ माधव नावाचे मोठे कवी माझ्या शाळेत होते. त्यांच्या मित्र वर्ग समृद्ध होता. अनेक नवे कवी देखील त्यांच्या भेटीला यायचे. त्यांच्याबरोबर मला फिरता आलं, अनेक लोकांना आणि साहित्यिकांना भेटता आलं. नियतकालिकांमध्ये चित्रे कशी येतात, हे समजलं. असं फिरताना कवी अशोक कोतवाल, नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या परिवर्तनचे शंभू पाटील, श्रीकांत देशमुख अशी अनेक मोठी माणसे आहेत, त्यांची मोठी यादी आहे. मी भालचंद्र नेमाडे यांना भेटलो त्यांच्यासोबत काही वेळ घालवला. मी राजन गवस यांना भेटलो. या लोकांना भेटल्यानंतर लोक मला विचारायचे की तू यांना कसा भेटला. तेव्हा तो प्रश्न मला कळायचा नाही, नंतर मात्र उमगत गेलं. या सर्व मान्यवरांनी मला अनेक चांगले पुस्तक सुचवली. त्यांनी मला वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये चित्रे काढायला सांगितली. या सगळ्यांच्या भेटीतून मी कळत नकळत बरेच शिकत गेलो आणि घडत गेलो. आणि भेटलेल्या या सगळ्यांची मी बेरीज करत गेलो.

4. ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेचं शीर्षक आणि मुखपृष्ठावरील ट्राँपेड वाजवतानाचं छायाचित्र या मागची संकल्पना काय आहे?

कोणाला जेव्हा पाठीवर मारलं जातं, तेव्हा जे वळ उमटतात ते काळयानिळ्या रंगाचे असतात. दारिद्र्याचे, व्यवस्थेचे वळ आहेत आणि रेषा म्हणजे त्याला माझ्या चित्रकलेची जोड आहे. तसेच वेदनेच्या रेषा आहेत. शब्दशः अर्थ बघितला तर अंधाराकडून (काळा) प्रकाशाकडे (आकाशाचा रंग निळा) जाणारी रेष आहे. ट्राँपेड यासाठी की मी २० वर्षे बँड पथकात काम करत होतो. ज्या ज्या ठिकाणी बँड वाजवला जातो तिथे ज्या चांगल्या वाईट घटना होतात त्याची चिंता आहे. आम्ही अनेक लग्नात बँड वाजवला, तिथल्या मुलीचे, वडिलांचे दुःख माहिती होते. अर्ध पुस्तक तर बँडवर आहे. त्यातून हे शीर्षक आलं.

5. चित्रकार म्हणून देशात आणि जगात ओळख असताना लेखनातही ठसा उमटवणं, हा प्रवास तुमच्यासाठी किती आव्हानात्मक होता?

सर्वप्रथम मला लिहिता येईल की नाही हा प्रश्न होता. चित्रकलेत मी सहज व्यक्त होतो. आता व्यक्त होण्याचं माध्यम बदलत होतं. चित्रकलेतून लेखकाच्या भूमिकेत येताना जो प्रवास होता त्यामध्ये लिखाणाच्या संदर्भात माझी मोठी जडणघडण झाली. लेख, कविता लिहिल्या. या प्रवासात आपल्याला कोणी मार्गदर्शक सापडतात. अशा काही मार्गदर्शकांच्या सल्ल्याने मी लेखक म्हणून व्यक्त झालो. लिहिताना अनेक वेळा माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे होते, त्यामुळे मी काही काळ थांबलो देखील. माध्यम बदलाच्या प्रवासातून मी पुढे येत गेलो. त्यामुळे आव्हानात्मक असला तरी खूप शिकवणारा हा प्रवास होता.

6. साहित्य अकादमी पुरस्कार मिळण्यापूर्वीचे राजू बाविस्कर आणि नंतरचे बाविस्कर, या दोन टप्प्यांत काय बदल जाणवतो?

मी नैसर्गिकरीत्या लिहित होतो. गाव, शहर आणि प्रदेश असा व्यापक बदल पुस्तक पोहोचण्यात होऊ शकतो. पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी देखील पुस्तक वाचलं जात होतं मात्र मूळचे वाचक असलेल्या किंवा चोखंदळ वाचकांपर्यंत पुस्तक जात होतं. आता साहित्य अकादमी पुरस्कारानंतर अनेक लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचेल.

7. तुम्ही मूळचे चित्रकार आहात, शिवाय आता लेखनही केलंय. या दोन्ही सृजनशील क्षेत्रांवर एआयचा परिणाम जाणवेल, असं तज्ज्ञ म्हणतात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं?

देशात जेव्हा संगणक आलं किंवा विविध तंत्रज्ञान आलं, तेव्हा त्यामुळे मोठा परिणाम होईल, काही घटकाचं मोठं नुकसान होईल, असे बोलले जात होते. माध्यमांमध्येही टप्प्याटप्प्याने मोठे बदल झाले. आज एआय असले तरी त्याला चालवायला माणूस लागेल. माणसाची कल्पनाशक्ती एआयला वापरता येणार नाही. एआयची मदत होईल मात्र त्यामुळे लेखकाची किंवा चित्रकाराची सौजन्य सुरता कमी होईल, असं वाटत नाही.

8. तुमच्या पुस्तकाला पुरस्कार मिळाल्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार हा पुस्तकातील सगळ्या पात्रांचा गौरव आहे, अशा भावना तुम्ही व्यक्त केल्या. तुम्हाला काय नेमकं म्हणायचं आहे?

पुस्तकातील अनेक पात्र आहेत ज्यांनी मला घडवलं आहे, अनेक गोष्टी दिल्या आहेत, त्या पात्रांसोबत मी राहिलो आहे किंवा शिक्षणासाठी माझ्या पाठीवर थाप दिली असेल. काही महिला आहेत ज्यांनी मूठभर शेतीत अक्षरशः काबाडकष्ट केलेत. त्यांनी आपल्या घासातून मला घास दिला असेल. ते मला विसरता येणार नाही. ही सगळी पात्र त्यात आहेत. यात एक सिकंदर काका आहे, कुल्फीवाला कालूचाचा आहे. गावभर कुल्फ्या विकून आल्यानंतर परतीचा मार्ग तो आमच्यासाठी बदलायचा. कुल्फीच्या डब्यातील उरलेले तुकडे तो आमच्या पोरांना आवर्जून वाटायचा. तो डबा म्हणजे जादूचा डबा वाटायचा, या सगळ्या पात्रांना मी विसरूच शकत नाही त्यामुळे हा पुरस्कार पुस्तकातील सर्व पात्रांचा सन्मान आहे.

9. आजच्या तरुण कलाकारांना, विशेषतः छोट्या गावांमधून येणाऱ्यांना तुम्ही एक सल्ला द्यायचा झाला, तर तो काय असेल?

कलेच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुरुवातीला निव्वळ कलेवर पोट भरता येत नाही. अजून ती जागरूकता आपल्याकडे यायची आहे. खरं तर ती लवकर आली पाहिजे. त्यामुळे आपली आवड जोपासताना पोटाची खळगी भरण्याची एक व्यवस्था केली पाहिजे आणि सोबत आवड जोपासली पाहिजे. अनेक वेळा कलेला ओळख मिळायला उशीर लागतो. कोणतीही गोष्ट किंवा निर्मिती सोपी नसते. त्याला एक कालावधी लागतो. कधीकधी १०० चित्र काढल्यानंतर १० लक्षवेधी असतात. त्यामुळे खूप काम आणि कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आपली निर्मिती, सृजनशीलता आहे, त्याला कधी वेळ लागू शकतो, कधी ती लवकर देखील होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT