open washroom video goes viral on social media
पुढारी ऑनलाईन : सोशल मीडियावर एका अनोख्या **'ओपन वॉशरूम'**ची जोरदार चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही जणांनी याला भन्नाट मार्केटिंग आयडिया म्हटले आहे, तर अनेकांनी टॉयलेटसारख्या ठिकाणीही गोपनीयता नसेल, तर मग उरते तरी काय, असा सवाल उपस्थित केला आहे.
आजच्या काळात प्रायव्हसी ही एखाद्या चैनीच्या वस्तूप्रमाणे झाली आहे. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात अनेकांना स्वतःची खासगी जागा मिळवण्यासाठी तडजोड करावी लागते. मोठ्या शहरांत फ्लॅट शेअर करावे लागतात, वसतिगृहात रूम पार्टनरसह राहावे लागते आणि लग्नानंतर तर खासगीपणाच हरवतो, असे अनेकांचे मत असते. मात्र, एक अशी जागा आहे जिथे प्रत्येकाला काही क्षण तरी एकांत हवा असतो आणि ती म्हणजे वॉशरूम.
याच गोपनीयतेच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हरियाणातील पानीपत येथील एका ढाब्यावरील 'ओपन वॉशरूम कॉन्सेप्ट' दाखवण्यात आला असून, त्यावर इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये पारंपरिक उंच भिंती किंवा पूर्णपणे बंद केबिन नसलेले वॉशरूम दिसते. अनेक टॉयलेट एकाच मोकळ्या जागेत बांधलेले आहेत. व्हिडिओमध्ये ढाब्यातील एक व्यक्ती, ज्याला लोक व्यवस्थापक किंवा मालक असल्याचे सांगत आहेत, संपूर्ण वॉशरूमची पाहणी करून दाखवतो.
तो या संकल्पनेला 'युनिक कॉन्सेप्ट' म्हणत सांगतो की, येथे लोक फ्रेश होताना "प्रेमाच्या गप्पाही मारू शकतात." हाच संवाद सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ नेमका कुठला?
व्हिडिओसोबत करण्यात आलेल्या दाव्यानुसार, हा व्हिडिओ हरियाणातील पानीपत येथील एका ढाब्याचा आहे. इंस्टाग्राम रील्स आणि X (पूर्वीचे ट्विटर)सह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो वेगाने शेअर केला जात आहे.
सध्या उपलब्ध माहितीनुसार, हा व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने तयार करण्यात आल्याचे किंवा जुना व्हिडिओ नव्या दाव्यासह व्हायरल करण्यात आल्याचे कोणतेही ठोस संकेत दिसत नाहीत. व्हिडिओतील दृश्ये, आवाज आणि कॅमेऱ्याची हालचाल नैसर्गिक व वास्तववादी वाटते.
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्ते दोन गटांत विभागले गेले आहेत. काहींनी या संकल्पनेचे कौतुक करत, हा भन्नाट मार्केटिंग आयडिया असल्याचे म्हटले. अशा वेगळ्या कल्पनांमुळेच हा ढाबा चर्चेत आला, असे त्यांचे मत आहे.
मात्र, मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी या डिझाइनवर टीका केली. टॉयलेट ही अशी जागा आहे, जिथे सर्वाधिक गोपनीयतेची गरज असते. त्यामुळे असे 'ओपन वॉशरूम' व्यवहार्य नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
एका युजरने प्रतिक्रिया देताना लिहिले, "प्रायव्हसी गेली तेल लावायला!" तर दुसऱ्याने मिश्कील टिप्पणी करत म्हटले, "आता भारतात 'ओपन वॉशरूम कॉन्सेप्ट'च्या नावाखाली इथलीही प्रायव्हसी हिरावून घेतली जाणार."