Bhutan Folk Tale Social Media
फीचर्स

Bhutan Folktales on nature: एकजुटीचं झाड; निसर्गाशी असं घट्ट नातं जपणाऱ्या भूतान संस्कृतीतून आलेली प्रख्यात लोककथा

निसर्गाशी असं घट्ट नातं जपणाऱ्या भूतान देशाच्या संस्कृतीतून आलेली ही एक प्रख्यात लोककथा

पुढारी वृत्तसेवा

अनुराधा चंद्रशेखर भडसावळे (anu.bhadsavle@gmail.com)

भूतान, हिमालयाच्या कुशीत वसलेला एक छोटासा, आनंदी देश. जंगलसंपत्तीच्या ऐश्वर्याने नटलेला, जगातील एकमेव कार्बन निगेटिव्ह देश. म्हणजेच भूतानची जंगलं त्या देशातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साइड हवेतून शोषून घेतात.निसर्गाशी असं घट्ट नातं जपणाऱ्या तिथल्या संस्कृतीतून आलेली ही एक प्रख्यात लोककथा आहे.

थंड प्रदेशातलं उंच डोंगर, खळखळणारे झरे आणि दाट झाडीने नटलेलं ते एक छान, कायम हिरवंगार राहणारं जंगल होतं .. ससा, माकड, हत्ती आणि एक चिमुकला 'लाफिंग थ्रश' पक्षी हे त्या जंगलातले जिवाभावाचे चार मित्र होते . आकाराने, ताकदीने एकमेकांपासून कितीतरी वेगळे; पण मैत्री मात्र जीवाभावाची होती .

एके दिवशी त्या पक्ष्याने सफरचंदाच्या झाडाचं एक बी आणलं आणि जमिनीत लावलं. ते पाहून ससा म्हणाला, "मित्रा, या बीचं झाड व्हावं म्हणून मी काय मदत करू?" पक्षी म्हणाला, "आपला झरा इथून जरा लांब आहे. तू या बी मधून येणाऱ्या रोपाला पाणी घालशील का?"

"हो, नक्की. चार फेऱ्या मारल्या की काम होईल. तशीही आपली जमीन कायम किंचित ओलसरच असते की नाही?" ससा उत्साहाने म्हणाला. माकड म्हणालं, "आणि मी रे काय करू ?" "तू झाडाला हवं तेव्हा पुरेसं खत घालशील?" “हो हो हे काम माझं’. माकड म्हणले.

तेवढ्यात त्यांचा चौथा दोस्त हत्ती तिथे आला. "आमच्या शक्तिमान मित्रा, तू या बी चं आणि पुढे इथे उभ्या राहणाऱ्या झाडाचं संरक्षण करशील का? म्हणजे सगळ्यांना त्याची रसाळ फळं मिळतील." "हो, नक्की," म्हणत हत्तीने झाडाच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली.

चौघांनी कामं वाटून घेतली आणि ती जबाबदारीने पारही पाडली. कुणी आपलं काम दुसऱ्यावर ढकललं नाही, कुणी टाळाटाळ केली नाही. मग प्रत्येकाने आपली जबाबदारी मनापासून पार पाडली. ससा झऱ्यावरून फेऱ्या मारून बीला, नंतर रोपाला पाणी घालत राहिला. माकड वेळच्या वेळी खत घालत असे. हत्ती जंगलात चरत असतानाही त्या कोवळ्या रोपावर लक्ष ठेवून त्याचे रक्षण करत असे.

एवढी काळजी घेतल्यावर ते सफरचंदाचं रोप वर्षागणिक सरसर, झपाझप वाढू लागलं. उंच झालं. त्याला भरपूर फांद्या फुटल्या. हिरव्यागार पानांनी ते डवरून गेलं. पूर्ण वाढ झाली आणि एक दिवस त्याला नाजूक फुलं आली. काही महिन्यांतच त्या फुलांच्या जागी लालभडक, रसाळ सफरचंदं लगडली. फांद्या फळांच्या ओझ्याने वाकल्या.

पण तयार फळं इतकी उंचावर लागली, की खायला काही केल्या मिळेनात. हत्तीने नुसतं झाड हलवलं असतं, तर खाली फळांचा नुसता खच पडला असता. पण तसं त्यानं केलं नाही.

त्या चार मित्रांनी मग एक युक्ती केली. हत्तीच्या रुंद पाठीवर माकड चढलं. माकडाच्या खांद्यावर ससा उभा राहिला. आणि सशाच्या पाठीवर तो चिमुकला पक्षी. पक्ष्याने वरून पिकलेली फळं एकेक करून अलगद खाली टाकली. सगळ्यांनी मिळून ती गोड फळं मनसोक्त खाल्ली.

झाड लावलं आणि वाढवलं चौघांनी, एकजुटीने, सामंजस्याने, सहकार्याने. कुणी झाडाच्या मालकीवरून भांडलं नाही. हत्तीने ताकद आहे म्हणून झाड गदागदा हलवून खिळखिळं केलं नाही. माकडाने खोडकरपणा करून पानं किंवा कच्ची फळं चावून टाकून नासधूस केली नाही. सशाने राहण्यासाठी बीळ खणताना झाडाच्या मुळांना धक्का लावला नाही आणि पक्ष्याने परागीभवन करणाऱ्या कीटकांना मटकावून टाकण्याचा अधाशीपणा केला नाही.

फळ मिळवण्यासाठी प्रत्येकाने आपापली ताकद, आपापलं कौशल्य दुसऱ्याच्या कमतरतेची जागा भरून काढण्यासाठी वापरलं. हत्तीची उंची, माकडाची चढाई, सशाची चपळाई आणि पक्ष्याची अचूक नजर—या सगळ्यांची सांगड घातल्यावरच फळं हाताशी आली. एकट्याने त्यांच्यापैकी कुणालाही ते शक्य झालं नसतं; पण एकमेकांच्या आधाराने वरच्या फांदीवरचं फळही सहज मिळालं.

सगळ्यांनी जपलेल्या त्या झाडाने भरभरून फळं दिली. त्यांनी ती आनंदाने वाटून खाल्ली. उरलेली फळं जंगलातील इतर पशुपक्ष्यांच्याही वाट्याला आली. त्या क्षणी फक्त चार मित्रच नव्हे, तर सारा परिसरच जणू आनंदाने बहरून गेला.

निसर्गात नेमकं असंच घडत असतं. वनस्पती आणि प्राण्यांमध्ये सुंदर सहजीवन असतं. वनस्पती अन्न, प्राणवायू आणि आसरा देतात. प्राणी खत देतात, परागीभवन करतात, बीज दूरवर पोहोचवतात. कीटक मध गोळा करतानाच नकळत परागीकरणाचं कामही करून जातात. शाकाहारी प्राणी वनस्पतींवर जगतात; त्यांच्यावर मांसाहारी प्राणी जगतात.

गळून पडलेलं पानही मातीत मिसळून पुन्हा झाडाचंच अन्न बनतं. निसर्गात काहीच वाया जात नाही. प्रत्येक जण गरजेपुरतंच घेतो, काही ना काही परत देतो. म्हणूनच निसर्गाचं हे चक्र शांतपणे, अखंड सुरू राहतं.

माणूसही याच निसर्गाचा एक घटक आहे. निसर्गाशिवाय त्याला जगताच येत नाही. श्वासासाठी हवा, तहानेसाठी पाणी, पोटासाठी अन्न, उबेसाठी इंधन—सगळं काही तो निसर्गाकडूनच घेतो. पण त्या बदल्यात तो निसर्गाला काय परत देतो, एवढाच प्रश्न उरतो.

निसर्गाकडून घेणं चुकीचं नाही; पण तोल बिघडतो तो गरजेच्या जागी हव्यास येतो तेव्हा. झाड तोडणं सोपं असतं, पण ते पुन्हा मोठं होण्यासाठी अनेक वर्षं लागतात. नदी प्रदूषित करायला एक विचार पुरतो; ती पुन्हा स्वच्छ व्हायला मात्र कित्येक वर्षं जावी लागतात. निसर्ग ओरबाडणं क्षणाचं असतं, पण त्याची किंमत अनेक पिढ्यांना चुकवावी लागते.

महात्मा गांधी म्हणतात, "निसर्ग माणसाच्या गरजांसाठी पुरेसा आहे, परंतु हावेसाठी मात्र नाही."

लोककथेतल्या त्या चिमुकल्या पक्ष्यापासून ते बलदंड हत्तीपर्यंत सगळ्यांनाच झाडाच्या रसाळ फळांचा लाभ झाला. कारण कुणीही त्या झाडाला लुटलं नाही; प्रत्येकाने त्याच्या वाढीत आपापला वाटा उचलला. घेण्यापूर्वी काहीतरी दिलं, म्हणून पुढे सगळ्यांनाच भरभरून मिळालं. ते झाड एका प्राण्याचं राहिलं नाही; ते अख्ख्या जंगलाचं झालं. निसर्गाशी आपलं नातंही नेमकं असंच असायला हवं... नाही का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT