Lotus Flower  
फीचर्स

Lotus Flower |कमळाच्या बियांची आपले सजीवत्व टिकून धरण्याची क्षमता किती असेल?

Lotus Flower |कमळाच्या बियांची आपले सजीवत्व टिकून धरण्याची क्षमता किती असेल?

पुढारी वृत्तसेवा

थंडीच्या दिवसातल्या एका धुक्याने वेढलेल्या पहाटे मी छोट्या आभाचा हात धरून सगुणा बागेतील दत्तमंदिराकडे निघाले. कमळांनी बहरलेल्या तलावाच्या मध्यभागी असलेले मंदिर शुभ्र धुक्याच्या पडद्याआड दडून गेले होते. दत्तमहाराजांचे दर्शन होत नव्हते. आभाने निरागसपणे विचारले, "आजी, आज बाप्पा कुठे लपून बसलाय गं?" आणि क्षणातच तिची नजर तलावभर डुलणाऱ्या कमळांवर खिळली. "अबब! केवढी ही कमळं!" तिच्या त्या आश्चर्यभरल्या उद्गारांनी मलाही त्या कमळांच्या मोहक दुनियेत अलगद नेऊन सोडले.

पहाटेच्या कोवळ्या किरणांनी गुलाबी आणि पांढऱ्या कळ्या हळूहळू उमलू लागल्या. त्याचवेळी एका कमळात तिला काळा भुंगा दिसला. "आजी, हा किडा आत काय करतोय?" तिच्या त्या प्रश्नाने माझे मन थेट महाकवी कालिदासांच्या मेघदूतमध्ये पोहोचले.

कालिदास सांगतात, कुबेराच्या पूजेसाठी एक यक्ष रोज सूर्योदयापूर्वी सहस्र कमळे आणत असे. नवविवाहित यक्षाला पहाटे उठण्याचा कंटाळा आला. "रात्रीच मिटलेल्या कळ्या तोडल्या तर काय फरक पडतो?" असा विचार करून त्याने फुले आधीच आणली. दुसऱ्या दिवशी पूजेवेळी शेवटचे कमळ उमलले आणि त्यातून भुंगा बाहेर आला. यक्षाने फुले रात्रीच तोडल्याची लबाडी उघड झाली आणि कुबेराने त्याला वर्षभर पत्नीपासून दूर राहण्याचा शाप दिला.

ही केवळ कविकल्पना नाही. कमळाच्या फुलात रात्री भुंगे खरोखर आसरा घेतात. थंड हवेतही कमळ आपल्या फुलाचे तापमान उबदार ठेवते. थंडीने गारठलेले भुंगे परागकणांच्या उबदार शालीत रात्र काढतात. सूर्योदय होताच फूल उमलते आणि ते बाहेर पडून परागीभवनाचे काम करतात. निसर्गाने दोघांसाठी किती सुंदर व्यवस्था करून ठेवली आहे!

कमळ म्हणजे चिखलातून उमलणारी निर्मळता. त्याची पाने पाण्याचा थेंबही धरून ठेवत नाहीत. पहाटे दवबिंदू पानांवर मोत्यांसारखे चमकतात आणि हलक्या वाऱ्याने अलगद घरंगळून पडतात. म्हणूनच भारतीय संस्कृतीत कमळाला पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. भगवान विष्णूंचे कमलनयन, महालक्ष्मीचे कमळासन, ब्रह्मदेवाचे कमळ-सर्वत्र कमळाचेच मंगल रूप दिसते.

गोड्या पाण्यात चिखलातून वाढणाऱ्या कमळाची भलीमोठी गोल पाने उंच दांड्यावर डुलत असतात. त्यांच्या पृष्ठभागावरील मेणासारख्या थरामुळे पाणी त्यावर पसरत नाही. पहाटे दवबिंदू एकत्र येऊन मोत्यासारखे चमकतात आणि हलक्या वाऱ्याने घरंगळून पडताना पानावरील धूळही सोबत घेऊन जातात. निसर्गाने कमळाला दिलेली ही स्वच्छतेची अनोखी देणगी आहे.

कमळाच्या देठातील तंतूपासून लोटस सिल्क हे दुर्मीळ वस्त्र तयार केले जाते. मणिपूरमध्ये आजही काही कारागीर ही परंपरा जपतात. हे वस्त्र अत्यंत मऊ, हलके आणि पर्यावरणस्नेही मानले जाते. कमळाच्या रोपाच्या मुळांना कमळकाकडी/कमलाक्कडी किंवा भे म्हणून ओळखले जाते. ह्याची खूप चविष्ट भाजी/भजी बनवली जातात.

कमळाचे खोड, बिया आणि फुले अन्न, औषध व पूजेसाठी उपयोगी पडतात. चीन, व्हिएतनाम आणि थायलंडमध्ये त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. कमळाची बिया शेकडो वर्षे जिवंत राहू शकतात, हे निसर्गातील एक अद्भुत रहस्य आहे. कमळाच्या बियांची अतिशय अवघड परिस्थितीतही टिकून राहण्याची खासियत विशेषच आहे.

कमळाच्या बियांची आपले सजीवत्व टिकून धरण्याची क्षमता किती असेल?

1000 वर्षांपेक्षा जास्त! खरं नाही ना वाटत? इजिप्तमधील पिरॅमिडमधे ममीच्या शेजारी ह्या बिया ठेवलेल्या सापडल्या. अमेरिकन शास्त्रज्ञांनी त्या रुजवायला ठेवल्या तर त्यातून रोपे आली. चीनमध्ये, 1300 वर्षांपूर्वीच्या कमळाच्या बिया आटलेल्या, सुकून गेलेल्या तलावात मिळाल्या. त्याही बिया रुजून आल्या. बियांचे वय शोधून काढण्यासाठी शास्त्रज्ञांनी कार्बन डेटिंगच्या तंत्राचा वापर केला होता .

कमळ हे भारताचे राष्ट्रीय फुल आहे. परंतु कमळांचे तलाव जतन व त्यांचे संवर्धन करण्या ऐवजी तलावात भर घालून, ते बुजवून त्यावर सिमेंटचे इमले चढवण्यात आम्हाला काहीच गैर वाटतं नाही. कमळ म्हणजे केवळ एक सुंदर फूल नाही. ते पाणी, जीवन, समृद्धी आणि संकटातूनही प्रकाशाकडे झेपावण्याची प्रेरणा आहे. म्हणूनच कमळाचे आणि त्याच्या जलाशयांचे संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

- सौ. अनुराधा चंद्रशेखर भडसावळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT