आजीच्या गोष्टी… मोठ्या भावंडाची शिकवण… काकीची माया…काका, आजोबा ही सगळी नाती एकत्र कुटुंबामध्ये अनुभवायला मिळतात. जग बदलले. नोकरीच्या निमित्ताने शहरात वास्तव्य करणे आले. साहजिकच, वरील नात्यांचा ओलावा कमी झाला. मे महिना आणि दिवाळीच्या सुट्टीतच काय तो मामाचा गाव आणि आजीचा बटवा..! इतर वेळा बंद फ्लॅट संस्कृतीमधील संस्कार. आई, बाबा नोकरीनिमित्त बाहेर. मुले घरी; मग संस्कार करण्यासाठी एक सुट्टीचा दिवस. त्यामध्ये पण सगळे लाडे लाडेच. का? तर आठवडाभर वेळ देता येत नाही. एक दिवस असतो. चुकले तर ओरडा का? जाऊ देत. जाऊ देत, या दोन शब्दांनी बरेच काही घडते- बिघडते. खासकरून मुली, शाळा, कॉलेज, ट्युशन कॅम्पसमधील थोडासा उनाडपणा, खट्याळपणा यांच्याकडे येतो; पण म्हणून आईने त्याकडे कानाडोळा करणे महागात पडते. तुम्ही जरी नोकरी करत असला, तरी मुलीशी मैत्रीचेच नाते प्रस्थापित करा.
तुमच्या मुलीला बाहेर काही खट्ट जरी झाले, तर ते पहिल्या मैत्रीण किंवा मित्रापेक्षा तुम्हालाच सांगावे इतकी आपुलकी निर्माण करा; पण हो… काहीवेळा तिखटपणाही जरुरीचा आहे. तो तिखटपणा त्यांच्या भविष्यासाठी चांगलाच आहे, याचीही जाणीव करून द्यायला विसरू नका. म्हणजे तुम्ही " त्यांच्या नजरेत व्हिलन न बनता मित्रच बनलात याची जाणीव होईल. मुलगा किंवा मुलगी अगदी कोणत्याही सिनेमातले गाणे जरी कर्कश आवाजात म्हणत असेल तर त्यांच्या गाण्याला दाद द्या. उगीच गोंधळ नको करू. मला सुट्टी आहे. त्रास होतोय, असे म्हणून त्याला तुमच्यापासून दूर करू नका.
तुमच्या मुलीचा ग्रुप कसा आहे, मैत्रिणींच्या आवडीनिवडी काय हे पहा. गेट टू गेदरसाठी वाढदिवस हा उत्तम पर्याय आहे. तुमच्या नजरेला खटकणारे मित्र-मैत्रिणी दिसतील. त्यांच्यापासून वेळीच सावध करा किंवा त्या फ्रेंडसना तुम्ही सुधारण्यासाठी मदत करा. हल्ली कौन्सिलिंग करणारे बरेच डॉक्टर कार्यरत आहेत. मुलगा किंवा मुलगी फारच हट्टी असेल… ऐकत नसेल. घराबाहेर जास्त वेळ काढत असेल किंवा खोटं बोलत असेल, अन्य प्रॉब्लेस असतील; तर अशा मानसशास्त्राचा अभ्यास केलेल्यांना किंवा काही कौन्सिलरना भेटा. त्यांच्या कौन्सिलन्समुळे मुलांमध्ये बराच बदल घडतो. चांगले- वाईट याची थोडीशी समज येईल. यामुळे तुमच्या पाल्याचे संगोपनही योग्यरीतीने होईल आणि उद्याचा एक आदर्श नागरिक तुम्ही घडवला, याचेही समाधान लाभेल.
-मृणाल सावंत