कस्तुरी

मुलांना शिकवा नीटनेटकेपणा

अनुराधा कोरवी

घरात लहान मुले असली की पसारा हा असतोच, पण आठवड्याच्या शेवटी मुलांनाच मदतीला घेऊन घर छान स्वच्छ व्यवस्थित ठेवता येते. त्यामुळे मुलांच्याही अंगी व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा येतो. यासाठी काही टिप्स

काम सोपवा

एकाच दिवसात मुलांना सर्व गोष्टी येतील अशी अपेक्षा नकोच, पण सर्वात पहिल्यांदा त्यांना झेपतील अशा छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित ठेवणे शिकवता येईल. घरातील एखादा कोपराच त्यांना व्यवस्थित करायला शिकवा. जसे त्यांच्या कपाटातील एखाद्या कप्प्यातील सामान व्यवस्थित ठेवायला सांगा. त्यातील सर्व कपडे बाहेर काढायला सांगा. ते कपडे व्यवस्थित घडी घालून पुन्हा कपाटात ठेवायला सांगा. कपडे व्यवस्थित घडी घालून ठेवले की वापरण्यासाठी काढणेही सोपे जाते. कप्प्यांत शाळेचा पोशाख एकीकडे, बाहेर घालायचे कपडे वेगळीकडे, शर्ट, जॅकेट हँगरला अडकणे योग्य आहे. घरात वापरण्याचे कपडे एका शेल्फमध्ये ठेवावे. मोजे, हातरूमाल, अंतर्वस्त्रे ही दुसरीकडे ठेवावीत. कपडे हँगरला लावून टांगण्यास मुलांना मदत करावी.

मदत करा

मुलांना सांगितलेले काम नीट जमेलच असे नाही त्यामुळे अधूनमधून त्यांना मदत जरूर करावी. तसेच त्यांना थोडे मार्गदर्शन करावे. शर्टाची घडी कशी घालावी, पायमोजे, हातमोजे हे जोडीने ठेवावे, जेणेकरून ते हरवणार नाहीत. त्यासाठी पुस्तकांच्या कपाटात आधी मोठी आकाराची पुस्तके मग मध्यम आकाराची आणि नंतर सर्वात लहान आकाराची पुस्तके त्यात लावावी.

गाणी लावावी

आवराआवरीचे काम मुलांनाच काय मोठ्यांनाही कंटाळवाणे वाटते. हेच काम आनंदाने करण्यासाठी वातावरण उल्हसित असले पाहिजे. मुलांना घरातील कामे शिकवणे हा चांगला अनुभव असतो. त्यामुळे मुलांच्या आवडीची गाणी लावावीत. मधूनच थोडा वेळ आराम करत नाचावे. त्यामुळे मुलांना कामाचा कंटाळा न येता मजा येईल आणि कामही सहजपणे होईल.

खेळता खेळता शिक्षण

नवे काम शिकताना मुलांना कंटाळा नाही आला पाहिजे त्यासाठी मस्ती मजा करत मुलांना शिकवले पाहिजे. मग पाच मिनिटांत एखादे काम पूर्ण केल्यास त्यासाठी एखादे चॉकलेट मिळेल असे सांगावे. एखादे काम पूर्ण झाल्यानंतर मुलांचे कौतुक करून त्यांना आपण ज्याचे वचन दिले ते जरूर पूर्ण करावे.

बक्षीस द्यावे

मुलांनी त्यांचे काम पूर्ण केल्यानंतर त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना बक्षीस म्हणून द्याव्यात. त्यांचे आवडीचे पदार्थ बनवून द्यावेत. कुटुंबातील इतर सदस्यांच्या समोर त्यांचे कौतुक करावे. त्यामुळे मुलांना काम पूर्ण केल्याचा आनंद तर होईलच, पण पुढच्या वेळी काम शिकण्याचा उत्साह आणि ऊर्जा निर्माण होईल.
– अंजली महाजन (संगोपन)

SCROLL FOR NEXT