सौंदर्य म्हटले की, चेहरा इतकेच आपल्या डोळ्यांसमोर येते. मात्र, चेहर्याची विशेष काळजी घेताना इतर काही भाग ज्यांच्याकडे आपले लक्षच जात नाहीत; पण ते चेहर्याच्या जवळचे असल्याने सौंदर्यात कमीपणा आणू शकतात. चेहर्याची काळजी घेताना मानेची काळजी आपण घेत नाही, त्यामुळे मान काळी होते. मानेचा काळेपणा तसाच राहिला, तर तो चटकन कमी होत नाही. त्यासाठी पाच सोप्या युक्त्या आहेत त्या वापरल्या तर मानेचा काळेपणा कमी करता येईल.
कोरफड : बहुतेक सौंदर्य उपचारात वापरली जाणारी कोरफड बहुगुणी आहेच. मानेवर कोरफडीचे जेल लावून पाच ते सात मिनिटे मसाज करावा. आठवड्यातून दोनवेळा असे केल्यास मानेचा काळसरपणा दूर होतो. एक महिनाभरात रंगात फरक पडलेला दिसतो.
बटाटा : स्वयंपाकघरातील बटाटा हा पदार्थही सौंदर्योपचारात वापरला जातो. डोळ्यांखाली काळी वर्तुळे आल्यास त्याचा वापर केला जातो. तसेच मानेचा काळेपणा घालवण्यासाठीही बटाट्याचा वापर करू शकतो. दोन-तीनवेळा वापल्यास त्याचा परिणाम झालेला दिसतो. त्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी बटाट्याची एक फोड किंवा एक काप मानेवर रगडावी. दहा मिनिटांनी मान धुऊन टाकावी आणि क्रीम लावावी.
बेसनाचे पीठ : त्वचेचा रंग उजळण्यासाठी बेसनाचे पीठ उत्तम मानले जाते. मान साफ करण्यासाठी बेसनाचा वापर जरूर करावा. त्यासाठी एक चमचा बेसन त्यात अर्धा चमचा मोहरीचे तेल आणि चिमूटभर हळद मिसळून एक लेप तयार करावा. हा लेप मानेवर 15 मिनिटे लावून ठेवावा; मग चोळून चोळून हा लेप काढून टाकावा. आठवड्यातून एक दिवस हा लेप जरूर लावावा.
बेकिंग सोडा : दात, नखे आणि चेहरा चमकण्यासाठी बेकिंग सोड्याच्या वापर आपणही केला असेल. मानेचा काळेपणा घालवण्यासाठीही याचा वापर जरूर करून पाहावा. त्यासाठी अर्धा चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात गुलाबपाणी मिसळावे आणि लेप तयार करावा. या लेपाने मानेला मसाज करावा. काहीच दिवसांत मान चमकेल.
व्हिटामिन ई तेल : केस आणि चेहर्याच्या त्वचेसाठी ई जीवनसत्त्वाच्या गोळ्या वापरल्या जातात. त्याचे फायदेही बहुतेक सर्वांना माहिती आहेत. मान स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. त्यासाठी ई व्हिटामिनच्या दोन किंवा तीन कॅप्सूल घ्याव्यात. त्यातील तेल काढून त्याने मानेला मसाज करावा.