काही वर्षांपूर्वी व्हिनेगरचा भारतीयांना तितकासा परिचय नव्हता. मात्र, अलीकडे चायनीज पदार्थानी भारतीय जेवणामध्ये प्रवेश केला आणि घराघरांत व्हिनेगरचा वापर वाढला. व्हिनेगरमधील लोणची आणि चटण्याही आता सगळ्यांच्या परिचयाच्या झाल्या आहेत. व्हिनेगरचा उपयोग फक्त स्वयंपाकघरापुरता मर्यादित राहिला नसून त्याशिवायही अनेक गोष्टींसाठी व्हिनेगरचा उपयोग होतो. त्यासंबंधीचीच काही माहिती….
व्हिनेगरचे स्वयंपाकघरात अनेक उपयोग असले, तरी पाण्यात मिसळल्याशिवाय ते कधीही वापरू नये. कारण, त्यामध्ये अॅसिटिक अॅसिड असते. व्हिनेगर आम्लधर्मी असल्याने त्याची चव आंबट असते. त्यामुळे लोणची टिकवण्यासाठी, टोमॅटो केचअपमध्ये, फ्रेंच फ्राईजच्या स्वादासाठी अशा प्रकारे व्हिनेगरचा वापर केला जातो.
१) घरामध्ये लिंबू नसल्यास एक चमचा लिंबाच्या रसाऐवजी अर्धा चमचा व्हिनेगर वापरता येते.
२) काही वेळा पालेभाज्या शिळ्या झाल्या की, त्या सुकून त्यांचे देठ लुळे पडू लागतात. त्यासाठी दोन कप पाण्यामध्ये एक चमचा व्हिनेगर घालून त्यामध्ये भाजी बुडवून ठेवली की, ताजी वाटते.
३) चीजवर बुरशी येऊ नये म्हणून ते व्हिनेगरमध्ये बुडवलेल्या स्वच्छ कापडात गुंडाळून हवाबंद डब्यात ठेवावे. पुलाव करताना तांदूळ पूर्ण फुललेला हवा असल्यास पाण्यामध्ये एक चमचा व्हिनेगर घालावे.
४) कॉलिफ्लॉवर, बीट किंवा फरसबीसारख्या भाज्या उकडताना पाण्यात एक चमचा व्हिनेगर घातल्यास त्याचा रंग कायम राहतो. त्यामुळे गॅसही होत नाही आणि चवही चांगली येते. पास्ता उकडतानाही पाण्यात एक चमचा व्हिनेगर मिसळावे. त्यामुळे तो कमी चिकटतो.
५) लसूण तसेच कांद्याचा वास हाताला येऊ नये, यासाठी लसूण सोलण्याच्या तसेच कांदा चिरण्याच्या आधी आणि नंतर हाताला व्हिनेगर चोळावे आणि मग हात धुवावेत.
६) अनेकदा तेलकट भांडी घासल्यानंतरही त्यांचा तेलकटपणा कमी होत नाही. अशा वेळी साबणाच्या पाण्यात व्हिनेगर घालून ते पाणी काही वेळ तेलकट भांड्यात घालून ठेवावे. थोड्या वेळाने भांडे धुवून टाकावे.
७) भाज्या कापण्याचा कटिंग बोर्ड आठवड्यातून दोन वेळा व्हिनेगर मिश्रित पाण्याने स्वच्छ करावा. त्यामुळे तो चांगला स्वच्छ होऊन सूक्ष्मजीवविरहीत होण्यास मदत होते.
८) जेवणाचे डबे साफ करताना व्हिनेगरच्या पाण्यात कापड बुडवून त्याच्या सहाय्याने साफ करावेत. फ्रीजच्या आतील भागातील स्वच्छतेसाठीही पाण्यात व्हिनेगर मिसळून कापडाच्या सहाय्याने साफ करावा.
९) मायक्रोवेव्ह साफ करण्यासाठी एका काचेच्या भांड्यामध्ये एक कप पाणी आणि अर्धा चमचा व्हिनेगर यांचे मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये ठेवून त्याला उकळी आणून मायक्रोवेव्ह काही वेळ बंद ठेवावा. त्यानंतर भांडे अलगद बाहेर काढून त्याचा आतील भाग स्वच्छ कापडाने पुसून घ्यावा. त्यामुळे चिकटलेले सूक्ष्म कण निघून जातात.
१०) अॅल्युमिनियमच्या कढ्या अनेकदा वापरून काळ्या पडतात. अशा वेळी एक कप पाण्यात एक चमचा व्हिनेगर या प्रमाणात घेऊन ते पाणी कढईमध्ये उकळल्यास त्याचा काळपटपणा कमी होण्यास मदत होते. तसेच स्वयंपाकघरातील डायनिंग टेबल, टोस्टर हे व्हिनेगरमिश्रित पाण्याने पुसल्यास चकचकीत होतात.
– कीर्ती कदम