कस्तुरी

किचन चिमणी वापरताय?

दिनेश चोरगे

भारतीय पारंपरिक जेवणात फोडणी किंवा हात फोडणी किंवा तडका याचा मुक्त वापर केला जातो. त्याशिवाय परतवणे, भाजणे, ग्रील करणे सुरू असतेच. शिवाय आहारात मसाल्यांचा वापरही अधिक प्रमाणात केला जातो. हे सर्व पदार्थ बनवताना स्वयंपाकघरात धूर आणि वास यांचे मिश्रण होेते. स्वयंपाकघरात जर चिमणी असेल तर हा धूर आणि कोंडलेला वास सहजपणे दूर करू शकतो.

बाजारात विविध प्रकारच्या चिमण्या विकत मिळतात. त्यातून चिमणीची निवड करणे अवघड जाते. एक दशकापूर्वी चिमणी बाजारात उपलब्ध होऊ लागली. आता चिमणीच्या निर्मितीत खूप सुधारणा झाली आहे. सध्या दोन पर्याय ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत.
पहिल्या प्रकारात धूर बाहेर टाकण्यासाठी पाईपचा वापर केला जातो. दुसर्‍या प्रकारात चिमणी थेट डक्टला जोडण्याची आवश्यकता नसते. त्याच्या आत लावलेला कार्बन फिल्टर धूर, तेल आणि वास सर्व शोषून घेतो आणि हवा शुद्ध करून पुन्हा स्वयंपाक घरात सोडतो; पण या कार्बन फिल्टरला तेल लवकर चिटकते. त्यामुळे कार्बन फिल्टरची वारंवार स्वच्छता करावी लागते.

दोन्ही प्रकारच्या चिमण्या किचनमध्ये वापरता येतात; पण डक्टला जोडली जाणारी चिमणी अधिक उपयुक्त असते. त्यातही डक्टचा पाईप जास्त लांब असेल आणि वळवलेला असेल तर हवा बाहेर निघून जाण्यास जास्त वेळ लागतो. तसेच डक्टसाठीही जास्त जागेची आवश्यकता असते. त्यामुळे स्वयंपाकघरात जागा असेल तर डक्टच्या चिमणीचा पर्याय निवडावा; पण जागा कमी असेल तर कार्बन फिल्टर असलेल्या चिमणीची निवड योग्य असते.

आधुनिक चिमणी- चिमणीचा आकार वेगळा होता. बहुतेक चिमण्या पूश बटण किंवा थेट जोडलेल्या बटणाद्वारे चालतात. हल्ली डिजिटल गॅस सेन्सर असलेल्या चिमण्याही उपलब्ध आहेत. त्यामध्ये गॅसचे लिकेज झाल्यास ही चिमणी आपोआप चालू होते आणि गॅस निघून गेल्यावर बंदही होते. ही चिमणी सध्या जास्त वापरात आहे.

चिमणीची सक्शन पॉवर – चिमणीची निवड करतान सक्शन पॉवर लक्षात घेणे आवश्यक आहे. ही क्षमता जितकी अधिक तितकाच स्वयंपाक घरातील धूर आणि वास निघून जाण्यास मदत होते. चिमणीमध्ये ही क्षमता 500 मीटर क्यूबिक प्रतितासापासून 1200 मीटर क्यूबिक प्रतितास असते. त्यात 900 मीटर क्यूबिक प्रतितासापासून ते 1000 मीटर प्रतितास अशी असते.

स्वयंपाकघराचा आकार – चिमणी लावताना स्वयंपाकघराचा आकार फार महत्त्वाचा असतो. स्वयंपाकघर मोठे असेल तर जास्त सक्शन क्षमता असलेली चिमणी लावणे योग्य आहे. किचनच्या चिमणीला एक तासात 10 पट अधिक शुद्ध हवा भरण्याची आवश्यकता असते, असा एक अंदाज वर्तवला जातो आहे. चिमणीची निवड करताना ही गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी स्वयंपाकघराच्या जागेला दहा ने गुणल्यानंतर जे क्षेत्रफळ येईल त्या सक्शन क्षमतेची चिमणी किचनमध्ये लावली पाहिजे. तसेच गॅस शेगडीच्या दीड फूट उंचीवर चिमणी लावली पाहिजे.

या गोष्टी लक्षात ठेवा :

चिमणीची किंमत तिच्या वॉरंटीवरही अवलंबून असते. काही हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंत चिमणी बाजारात मिळते. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बजेटनुसार खरेदी करावी. याची गॅरंटी साधारणपणे 1 ते 5 वर्षे असते; तथापि, चांगल्या गुणवत्तेची चिमणी 10 ते 15 वर्षे आरामात काम करू शकते.

चिमणीची देखभाल – चिमणीची स्वच्छता तिच्या उपयोगावर अवलंबून आहे. सर्वसाधारण स्वयंपाक करत असाल तर पंधरा दिवसांनी कार्बन फिल्टर साफ करावा लागतो. त्यासाठी गरम पाण्यात साबण टाकून तो स्वच्छ धुवून कोरडा वाळवून पुन्हा लावावा. त्यामुळे फिल्टरची जाळी स्वच्छ होते.
चिमणी खूप चिकट झालेली असल्यास आणि साबणाने साफ होत नसेल तर सोडियम हायड्रोऑक्साईड किंवा कॉस्टिक सोडा वापरून ती साफ करावी.
चिमणीमध्ये लावलेले काही फिल्टर सहजपणे धुता येत नाहीत. त्यामुळे हे फिल्टर 4-5 महिन्यांतून एकदा बदलावे लागतात.
फिल्टर धुताना साबण पावडर वापरत असला तरीही खूप तीव्र साबणाने फिल्टर धुवू नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT