स्त्रीयांचे पाळी चक्र आणि जननक्षमतेचं चक्र म्हणजेच नवा जीव निर्माण करण्याच्या क्षमतेचं चक्र एकमेकांत गुंतलेलं असतं. पाळीची संपूर्ण प्रक्रिया चक्रांमध्ये घडते. पाळीचा पहिला दिवस ते पुढची पाळी सुरू होण्याच्या आधीचा दिवस म्हणजे एक पाळी चक्र.
(Menstrual Cycle)
या पाळी चक्रातील सर्वात मोठी घटना म्हणजे स्त्री बीज पक्व होऊन बीजकोपाच्या बाहेर येऊन बीजनळ्यांमध्ये पोहोचणं, यालाच अंडोत्सर्जन किंवा इंग्रजीमध्ये ओव्ह्युलेशन म्हणतात. हे बीज बीजनलिकांमध्ये असताना जर त्याचा पुरुप बीजाशी संयोग झाला, तर त्यातून फलित बीज तयार होतं आणि ते गर्भाशयाच्या भिंतीवर रुजतं. या फलित बीजाच्या पोपणासाठी गर्भाशयाचं अस्तर जाड होतं.
मात्र, स्त्री बीजाचा पुरुप बीजाशी संयोग झाला नाही, फलित बीज तयारच झालं नाही किंवा गर्भाशयाच्या भिंतीवर रुजलं नाही, तर गर्भाशयाचं अस्तर ठराविक दिवसांनी गळून पडतं. यालाच आपण पाळी येणे, असं म्हणतो. पाळीच्या पूर्ण चक्रामध्ये चार प्रकारची संप्रेरकं काम करत असतात.
पिट्युटरी ग्रंथीतून पाझरणारी एलएच आणि एफएसएच व बीजकोपांमध्ये तयार होणारी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉन ही चार संप्रेरकं पाळीचं आणि जननक्षमतेचं पूर्ण चक्र नियंत्रित करतात. माझी पाळी फार लवकर येते किंवा माझी पाळी फार उशिराने येते, अशी वाक्यं आपण नेहमी ऐकत असतो.
काही मुलींची पाळी एकवीस-बावीस दिवसांनी येते, तर काहींना दोन-दोन महिने पाळी येत नाही. कधी कधी आजारपणात पाळी पुढे ढकलली जाते, तर कधी प्रवासामुळे दगदग होऊन पाळी अपेक्षेपेक्षा लवकर येते. प्रत्येकीचं पाळीचं चक्र जसं वेगळं असतं तसंच दोन पाळी चक्रांमध्येदेखील फरक पडू शकतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. यासाठी पाळीची लांबी कशी ठरते ते समजून घेणं आवश्यक असतं.
काही जण असं मानतात की अगदी बरोबर चौदाव्या दिवशी अंडोत्सर्जन होतं आणि अठ्ठाविसाव्या दिवशी पाळी येते. पण, खरं तर प्रत्येकीच्या शरीराची आणि पाळीच्या चक्राची गती वेगळी असते. पाळीचक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना असते. एकदा बीज बीजकोपातून बाहेर आलं आणि गर्भधारणा झाली नाही, तर त्यानंतर साधारणपणे बारा ते सोळा दिवसांनी पाळी सुरू होते.
अंडोत्सर्जन होण्याच्या आधीचा काळ मात्र निश्चित असतोच असं नाही. हा काळ बदलण्याची शक्यता असते. प्रवास, मानसिक ताण, औपधोपचार, अशा विविध कारणांमुळे हा काळ कमी किंवा जास्त होऊ शकतो. अर्थात अंडोत्सर्जन झाल्यानंतर मात्र सोळा दिवसांत पाळी येते. त्यामुळे लवकर की उशिरा यापेक्षाही आपलं स्वतःचं पाळीचं चक्र नेमकं कसं आहे ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं!