कस्तुरी

शाम्पूची निवड करताना…

मोहन कारंडे

केस सुंदर, चमकदार बनण्यासाठी आपण त्यांना शाम्पू करतो. केस स्वच्छ ठेवण्यासाठी बहुतेक घरांमध्ये शाम्पूचा वापर केला जातो. शाम्पूचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. शाम्पू हा नुसताच केसांना लावयाचा नसतो तर डोक्याची त्वचादेखील यामुळे स्वच्छ व्हायला हवी.

केस धुताना सर्वप्रथम केस आणि डोक्याची त्वचा पूर्णपणे ओली करून घ्यावी. पाणी फार गरम किंवा एकदम गार नसावे. तळहातावर थोडासा शाम्पू घ्यावा. देान्ही तळव्यांना चोळून हाताच्या पंज्यांवर पसरवावा. नंतर हाताने तो केसांवर पसरावा. बोटांच्या पुढच्या टोकाने त्वचेवर सगळीकडे नीट लावावा. हळूवार हाताने लावावा, जोरात चोळू नये. फेस आल्यानंतर सर्व केसांवर तो पसरावा. केस मोठे असल्यास शाम्पू थोडा अधिक घ्यावा व केसांच्या टोकापर्यंत पोहोचवावा. त्यानंतर केस शक्य तो साध्या पाण्याने धुवावे. सर्व शाम्पू निघून गेल्यानंतर केस स्वच्छ झाल्याची खात्री झाल्यानंतर केस टॉवेलने टिपावेत. जोरजोरात चोळू नये. हळूवार पाणी काढावे, अन्यथा केस तुटू शकतात.

शाम्पू घेताना आपल्या केसांना योग्य असा शाम्पू निवडावा. अलीकडे बर्‍याच ठिकाणी बोअरवेलचे पाणी असते. या पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असते. हे क्षार डोक्यास राहिल्यास यामुळे केस गळतात. हे क्षार निघून जाण्यासाठी शाम्पूमध्ये टेट्रासोडियम इडीटीए असल्याची खात्री करावी आणि तोच शाम्पू वापरावा. कारण या शाम्पूमुळे क्षार केस धुताना पाण्याबरोबर निघून जातात आणि पाण्याचा केसांवर जास्त परिणाम होत नाही. शाम्पू घट्ट होण्यासाठी त्यामध्ये डीइए, एमइए किंवा टीइए ही रसायने घातलेले असतात. या रसायनांमुळे शाम्पूला एकप्रकारचा फेस येतो. तसेच ही रसायने केसांचे रक्षण करतात. विंचरताना यामुळे केस कंगव्याला चिटकत नाही.

बर्‍याचदा चांगला शाम्पू म्हणून आपण हर्बल शाम्पू विकत घेतो. अशा शाम्पूचे लेबर नीट वाचावे. कारण यामध्ये वनस्पतीजन्य अर्कांसोबतच इतर अनेक रसायने फेस येण्यासाठी आणि सुगंधासाठी घातलेली असतात. त्याचा केसांवर विपरीत परिणाम होतो. शाम्पू निवडताना तीव्र सुगंधाचा निवडू नये तर सौम्य सुगंधा असावा. काही वेळा सुगंधामुळे अ‍ॅलर्जी येऊ शकते. धुतलेले केस ओले असताना विंचरू नयेत ते तुटण्याची भीती असते.

SCROLL FOR NEXT