Drumstick Benefits File Photo
कस्तुरी

वजन कमी करण्यासाठी शेवग्याची भाजी खा, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

पुढारी वृत्तसेवा

मानवी शरीरातील हाडं मजबूत करण्यासाठी, रक्तदाब व मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी, वाढीव वजन कमी करण्यासाठी, चयापचय क्रिया सुरळीत राखण्यासाठी शेवगा उपयुक्त असतो. शेवग्यात प्रथिनं, जीवनसत्त्वं, खनिजं, फायबर, आणि अँटिऑक्सिडंटस्चा समृद्ध साठा असतो.

(Drumstick Benefits)

अँटी एजिंग, अँटी फंगल, अँटिबॅक्टेरियल गुणधर्मही त्यात आढळतात. त्यामुळे विविध संसर्गाशी लढण्याकरिता शरीराला मजबूत बनवण्याची क्षमता शेवग्याच्या नियमित सेवनातून वाढू शकते. घसा, छाती, त्वचेचे संसर्ग रोखण्यासाठी शेवग्याच्या भाजीमधले अँटिऑक्सिडंट गुणकारी ठरतात. याखेरीज शेवग्याची भाजी डोळ्यांच्या विकारापासून संरक्षण करण्यासाठीही फायदेशीर मानली जाते.

शेवग्याच्या शेंगांचा आहारातील नियमित समावेश हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. यातले पौष्टिक गुणधर्म व प्रथिनं नेहमीची सर्दी, ताप या संदर्भातल्या संक्रमणापासून आपल्या शरीराचं संरक्षण करतात. खोकल्यावर आराम मिळण्यासाठीही शेवग्याच्या शेंगा अतिशय गुणकारी मानल्या जातात.

शेवग्याच्या भाजीमध्ये अ आणि क याशिवायही अनेक महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वं आढळून येतात. तसंच कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, मॅगनीज, पोटॅशियम, सोडियम, झिंक, फॉस्फरस अशी खनिजंही शेवग्यात मुबलक प्रमाणात आढळतात. हे सर्व घटक आपलं शरीर सुदृढ राखण्यासाठी आवश्यक ठरतात.

शेवग्याच्या सात्विक भाजीच्या सेवनाने एकंदरीतच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मुतखडा, कोलेस्ट्रॉल, पचनक्रिया, सांधेदुखी अशा समस्या नियंत्रणात येण्यास किंवा दूर होण्यास मदत मिळते. चयापचय, आतड्यांचे आजार, रक्तदाब, मधुमेह, वृद्धत्वाची अकाली लक्षणं, रक्तक्षय आणि अशक्तपणा, जीवनसत्त्वं आणि खनिजांची कमतरता, अशा नानाविध समस्या दूर ठेवायच्या असतील किंवा त्यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर शेवग्याचं नियमित सेवन लाभदायी ठरू शकतं.

थोडक्यात सांगायचं तर अगदी सहजपणे आमटीत, भाजीत शेवग्याच्या शेंगांचा सढळ हस्ते वापर करून अनेक लहान मोठ्या त्रासांपासून आपण आपल्या शरीराला सांभाळण्याचं काम सोपं करू शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT