चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई! पपई स्वादिष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही लाभदायक आहे. हे सहज पचणारे आणि सगळीकडे उपलब्ध असणारे फळ आहे.
पपई आजारपणातदेखील खाता येते. पिकलेल्या पपईत खनिजं, पोषक गुणधर्म आणि जीवनसत्त्वं मोठ्या मात्रेत उपलब्ध असतात. आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणं गरजेचं ठरतं, त्यासाठी पपई उपयुक्त! पपईमध्ये व्हिटामिन ‘सी’ व फायबर अर्थात तंतूमय घटकांचं प्रमाण भरपूर असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो.
अर्थातच कोलेस्टेरॉल साचल्याने संभवणारा हृदयविकाराचा धोका टाळण्यास पपईचे सेवन फायदेशीर ठरते. वजन कमी करणे किंवा नियंत्रणात ठेवणे यासाठी ज्या व्यक्ती प्रयत्नशील असतात, त्यांनाही पपईचा आहारात नियमित समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
पपईतील डाएटरी फायबर्समुळे वेळी-अवेळी लागणार्या भुकेवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. मानवी शरीरातील प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि काविळीसारख्या आजारांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे.
अनियमित मासिक पाळी तसेच मासिक पाळीच्या काळातील त्रास दूर करण्यासाठीही पपई उपयुक्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पपई चवीला गोड असली तरीही पपईमुळे रक्तातली साखर वाढत नाही. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकर आहे.
पपई खाल्ल्याने मधुमेह चार हात लांब ठेवणेही शक्य होते. पपईमध्ये व्हिटामिन ‘ए’ मुबलक प्रमाणात आढळतं. डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी व्हिटामिन ‘ए’अत्यंत गरजेचं आहे. वाढत्या वयानुसार द़ृष्टी कमी होण्याची शक्यता असते. या समस्येपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पपईचा आहारात समावेश करणं इष्ट!
पपईमध्ये वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांच्या द़ृष्टीने पपईचे सेवन फारच हितकारी मानले जाते. पपईतील घटक सांध्यांना मजबुती देण्यास तसंच सूज कमी करण्यास मदत करतात. अरबट-चरबट खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम टाळण्यास पपई मदत करते तसंच ती पचनकार्यही सुधारते.