एकमेकांच्या मनातील भावना समजून घेण्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा असतो. बोलले नाही तर आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि आपल्यालाही दुसर्यांच्या भावना समजत नाहीत. हे खरे असले, तरीही किती बोलावे याची काही मर्यादा असते. बर्याच महिलांना नको तितकी बडबड करायची सवय असते. केवळ महिलांनाच नव्हे, तर काही पुरुषांनाही अशीच सवय असते. मात्र, गरजेपेक्षा जास्त बोलण्यामुळे केवळ शारीरिक नुकसान होत नाही, तर शब्दांची ताकद आणि महत्त्वही कमी होते. शिवाय, आपल्या बोलण्याचे वजनही कमी होते. (talk)
जास्त बोलण्याचा परिणाम घसा आणि फुफ्फुसावरही होऊ शकतो; पण त्यापेक्षा जास्त नुकसान आपल्या व्यक्तिमत्त्वाचे होते. एखाद्या विषयावर गरजेपेक्षा जास्त बोलत राहिल्याने समाजात, कुटुंबात आदर, मोठेपणा आणि स्वत:बद्दलचे गांभीर्य नष्ट होते. आपल्या शब्दाला किंमत राहत नाही. (talk)
याउलट कुठल्याही गोष्टीबद्दल मत व्यक्त करण्यापूर्वी विचार करून योग्य शब्दांची मांडणी केली, तर कमीत कमी शब्दांत आपण आपला आशय समोरच्यापर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे आपल्या शब्दाला किंमत राहते. बोलताना नेहमी चांगल्या शब्दांची निवड करणे हे वैचारिकतेचे लक्षण मानले जाते.
तसेच यामुळे सभ्यताही व्यक्त होते. जास्त घाईत बोलणे, एखाद्या प्रसंगाबद्दल त्वरित तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करणे, या गोष्टी वैचारिक अपरिपक्वतेचे लक्षण मानले जाते. असे बोलणार्या व्यक्तीला फारसे काही समजत नाही. असाच अर्थ काढला जातो. जी माणसं हुशार आणि विचारी असतात, ती मोजकेच बोलतात. बोलताना योग्य शब्दांचा वापर करतात.