Jewellery Designing  file photo
कस्तुरी

Jewellery Designing | ज्वेलरी डिझायनिंग ; करिअरची अनोखी संधी

पुढारी वृत्तसेवा

फॅशनच्या आजच्या जमान्यात आकर्षक आणि वैविध्यपूर्ण दागिन्यांची मागणी वाढतेच आहे, हे कुणालाही वेगळं सांगायला नको. त्यामुळे कला आणि नावीन्याची आवड असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, तर करिअरच्या दृष्टीने हे क्षेत्र म्हणजे संधींचा मोठा खजिनाच आहे. ( Jewellery Designing)

दागिन्यांची वेगवेगळी डिझाईन तयार करणं, दागिने घडवणं, ते दुरुस्त करणं आणि दागिन्यांचं ब्रँडिंग अशा नानाविध बाबींचा यात समावेश होतो. दहावी, बारावीच्या परीक्षेत प्रचंड गुण मिळवणं किंवा हाताशी मुबलक आर्थिक भांडवल असणं, ही काही या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठीची किंवा टिकण्यासाठीची अत्यावश्यकता व प्राथमिकता नाही, असं या क्षेत्रातले माहीतगार सांगतात.

हिरे, माणिक, पाचू यांसारख्या रत्नांचे आणि सोनं, चांदी, प्लॅटिनम यांसारख्या धातूंचे दागिने घडवताना कमालीची एकाग्रता असणं आवश्यक असतं. शिवाय या क्षेत्रात टिकण्यासाठी चिकाटी, कल्पकता, तंत्रज्ञानाची यथोचित माहिती व त्यावरची हुकूमत आणि अचूक कलाकुसर योग्य वेळेत पूर्ण करण्याचं कौशल्य हवं. मार्केटमध्ये चालू असलेल्या फॅशन, ग्राहक वर्गाची मानसिकता, त्यांची पसंती, त्यांना काय हवंय काय नकोय याची नेमकी जाणदेखील डिझायनरपाशी असायला हवी.

नवी दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी डिझाईन, पुण्यातील ज्वेलरी डिझायनिंग जेमोलॉजी डायमंड ग्रायडिंग अँड फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट या आणि अशा विविध शासकीय, खासगी संस्थांमध्ये ज्वेलरी डिझायनिंग संदर्भातले लहान-मोठे अभ्यासक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम चालवले जातात.

इंटरनेटवर व्यवस्थित शोध घेतला, तर ज्वेलरी डिझायनिंगच्या अभ्यासक्रमासंदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकते.तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या हाताखाली शास्त्रशुद्ध आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्वेलरी डिझायनिंगबाबत निर्माण झालेला आत्मविश्वास पुढील काळातल्या नोकरी-व्यवसायासाठी आधार ठरू शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT