गुलाबाचं फूल आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं. सुंदर दिसणारं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सार्यांचं मन मोहून टाकणारं. कुणाच्या शेतमळ्यात, कुणाच्या बागेत तर कुणाच्या घरच्या गॅलरीतल्या कुंडीत विराजमान होत दिमाखाने मिरवणारं हे लहानसं झुडूप. जरी आपल्या परिचयाचा असला गुलाब, तरी या नेहमी दिसणार्या फुलाचे गुणधर्म, त्याचे दैनंदिन जीवनात होऊ शकणारे उपयोग हे आपल्यातल्या बहुतेकांना ठाऊक नसतात.
खरंतर गुलाब बहुगुणी आहे, असं म्हणता येण्याइतपत पोषणतत्त्वं या फुलात एकवटली आहेत. गुलाब मानवी शरीराला थंडावा देण्याइतपत गुणकारी आहे. हृदयासाठी बलकारक आहे. गुलाबाचं फूल पचनाला हलकं आणि रक्त शुद्ध करणारं आहे, असं मानलं जातं. त्याच्या मधुर रसात रक्तातील उष्णता कमी करण्याची क्षमता आहे.
जेवल्यावर पोट जड होऊन अनेकांना गॅस होतो, आंबट ढेकर येतात, छातीमध्ये जळजळतं, आग आग होते. काहींचे हातापायाचे तळवे जळजळल्यासारखे होतात. त्यांच्यासाठी गुलाब उपकारक मानला जातो. गुलाबापासून तयार केला जाणारा गुलकंद आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाचा आहे. गुलकंद जर औषध म्हणून वापरायचा असेल तर हल्ली बाजारात तयार गुलकंद बर्याच ठिकाणी उपलब्ध असतो. अर्थात, गुलकंद बनवता येऊ शकतो.
घरच्या घरी गुलकंद बनवण्यासाठी सगळ्यात आधी फुलापासून गुलाब पाकळ्या सोडवून मोकळ्या करा.
पाकळ्यांच्या दुप्पट साखर घ्या आणि एकत्र करून स्वच्छ व सुक्या बरणीत भरा.
बरणी उन्हात ठेवा. एक-दोन महिन्यापर्यंत ती उन्हात तशीच राहू द्या आणि नंतर वापरायला काढा.
गुलकंद शक्यतो चैत्र महिन्यात बनवा.
असा घरच्या घरी बनवलेला गुलकंद शरीरासाठी विशेष उपयुक्त ठरू शकतो.
मुख्य म्हणजे गुलकंदामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
कारण, तो एखाद्या रेचकाप्रमाणे काम करतो.
रक्तदोष, खरूज किंवा खाज गुलकंदामुळे दूर होऊ शकते.
कांजण्या किंवा गोवर आल्यानंतर शरीरातील उष्णता बाहेर काढण्यासाठी गुलकंद फायदेशीर मानला जातो.
भूक लागण्यासाठी आणि रक्तदाब नियमित व संतुलित ठेवण्यासाठीही गुलकंदाचं सेवन उपयुक्तठरतं.