पुढारी ऑनलाईन: महिला तसेच सध्या अनेक पुरूषांचा आवडीचा विषय म्हणजे वेगवेगळे पदार्थ बनवणे. आणि तो चवीचा बनला तर व्हा... क्या बात हैं. घरात आई, बहिण किंवा बायकोने बनवलेले पदार्थ अधिक चवदार झाले की, त्याचे कौतुकही होते आणि मन तृप्त देखील होते. चला तर पाहूया चवदार पदार्थ बनवण्याच्या भन्नाट युक्त्या...
ग्रेव्हीसाठी मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा. त्यामुळे ग्रेव्हीला रंग आणि स्वाद चांगला येईल.
ग्रेव्हीमध्ये चिमूटभर साखर टाकल्यास ग्रेव्हीची चव वाढते.
पालक करी तयार करताना पालक गरम पाण्यात ब्लांच केल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाका. पालकाचा हिरवेपणा टिकून राहील.
टोमॅटो संपले असतील, तर ग्रेव्ही करताना टोमॅटो केचपचा वापर करता येतो.
भाज्या खूप बारीक चिरू नका कारण त्यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात.
रश्श्यासाठी बटाटे आणि वांगी चिरल्यावर त्यांच्या फोडी लगेच पाण्यात टाका म्हणजे फोडी काळ्या पडणार नाहीत.
ग्रेव्हीत घालण्यासाठी बदाम चिरण्यापूर्वी पाण्यात भिजत ठेवा, त्यामुळे ते सोलणं आणि चिरणं सोपं जाईल.
शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचं दूध, काजूची पूड आणि खसखशीची पेस्ट मिसळा.
ग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी कच्चे किंवा अर्धकच्चे टोमॅटो वापरण्याऐवजी पिकलेले टोमॅटोच वापरा.
आलं-लसणाची पेस्ट तयार करताना लसूण जास्त आणि आलं थोडं वापरा.
ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्या.
कोणतीही करी करताना मसाल्याला तेल सुटलं की, मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्यात टाका.
रश्श्यात मीठ जास्त पडलं तर त्यात उकडलेला बटाटा टाका. पाच मिनिटांनी बटाटा काढून घ्या. बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि रश्श्याचा खारटपणा कमी होतो.
करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटं ते कोमट पाण्यात बुडवून ठेवा.
ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करा.